गझल हा काव्य प्रकार अरबी भाषेत जन्माला आला . कालानुक्रमे संक्रमण होऊन फारसी , उर्दू आणि हिंदी भाषा ह्या काव्य प्रकाराने सहज काबीज केली . खरेतर श्रृंगार - प्रेम , आशिक - माशुक , शराब - शबाब, मिलन-विरह, जाम - साकी हे स्थायी भाव असणारी गझल मराठी वाङमय सृष्टीला खुणावू लागली . विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अनेक कवी , कवयित्री गझलेच्या प्रेमात पडले . त्याला श्रीकृष्ण राऊत सर अपवाद कसे असतील . त्यांचा गझलसंग्रह हाती पडला... वाचताना बरेच प्रसंगायाम जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहत गेले . त्यांच्या विषयी मज पामराने काय लिहावे... अनेक लिहित्या मात्तबर हाताना उभं करणारा माणूस ! माणसं वाचणारा माणूस... पण मग आपल्याला वाचायला - शिकायला मिळालेलं ते लिहायचं म्हणून हा प्रयत्न .
जन्मजात प्रगल्भ प्रतिभा आणि साचेबंद अभिव्यक्तीचा शिस्तबद्ध प्रयास म्हणजे कारुण्य माणसाला संतत्व दान देते '. इतकंच काय तर मानवी सृजनाच्या तत्त्वज्ञानाचे अनोखे रसायन म्हणजे - 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते ' . ज्यांनी गझलेला मराठी प्रांतात रुजवले ते कविवर्य सुरेश भट म्हणायचे ,
" जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही"
त्यांच्या पश्चात गझलेची कावड खांद्यावर लीलया पेलून तीर्थाटन करणारे श्रीकृष्ण राऊत . 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते ' या गझल संग्रहात पाहायला मिळतात . त्यांच्या गझला , गझलेतील खयाल और खयालो की कसीली खुशबू... व्यक्तीला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही . आतापर्यंत गझल विशिष्ट चौकटीत अडकून होती .
हिंदी में कहे तो कुछ खास घरानो की विरासत थी। कुछ खास भाषाओं की बंदीश थी । या सगळ्यांच्या उलट बोलीभाषेशी घट्ट नाळ असलेले राऊत आपल्या बोलीभाषेतील वाक्प्रचार , म्हणी मोठ्या खुबीने गझलेत हाताळताना दिसतात . जे कसब आजवर बड्या बड्या गझल गुरूंना जमलचं नाही . भट साहेबानंतर गझलेच्या कक्षेत बोलीभाषा जशीच्या तशी आणणाऱ्या श्रीकृष्ण राऊतांचे धडे येणाऱ्या पिढीला घ्यावेच लागतील .
'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' या गझलसंग्रहातील प्रत्येक गझल ही समाजमनाच्या तळाशी गोठलेल्या संवेदनांचा ठाव घेते . राऊत यांच्या अथक तीन तपाचा अर्क असलेल्या गझलांचा रसास्वाद घेताना आपल्याला आपल्यातील माणूस सापडत जातो . तो जसा आहे तसा सहज उलगडत जातो इतकी जादू या गझलकाराच्या प्रतिभेत आहे . सूक्ष्म निरीक्षण आणि सर्वव्यापी बलस्थाने किती ताकदीचीआहेत हे त्यांच्या शेरातून कळते -
" येथे परस्परांची या पाठ खाजवाया
बेट्या नवोदितांना वेठी धरा कुठेही...
वाह्यात कारट्याला शिक्षा करा गुरूजी
बापास लेक म्हणतो जा! जा! मरा कुठेही
मैत्री असो कि प्रीती नाती असो घरोबा
पाहून मतलबाचा घे चेहरा कुठेही... ( पृ. क्र.०७)
मिलीभगत करून आपली पोळी भाजण्यासाठी नवोदितांना वेठीस धरले जाते . वरील शेरातील 'कुठेही ' हा रदीफ़ each and every place of universe या अर्थाने विश्वातील हरेक ठिकाणी होणाऱ्या नवोदितांच्या गळचेपीचे प्रतिनिधीत्व करतो . त्यामुळे तो एक-दोन ठिकाणचा न राहता वैश्विक बनतो . राऊत यांच्या गझलेत कुंपण असलेला एकच विषय वाचायला मिळत नाही ; तर वास्तविकता आणि सर्वसमावेशक प्राणतत्वात प्रसवून जन्माला आलेली ही गझल एखाद्या विषयात अडकून न पडता स्वतंत्र आणि बेधडकपणे व्यक्त होणारी आहे . बरं खंत व्यक्त करताना राऊत किती सौम्य आणि मार्मिकपणे अहमपणाला सोडण्याचा संकेत देतात. त्यासाठी त्यांचा एक शेर-
मानतो जो मीच मोठा , तुच्छ सारे
थोर होणे त्या जिवाला शक्य नाही ... (पृ. क्र.०७)
रोजच्या दु:खाला कुरवाळत न बसता काहीतरी धडपड करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा गझलकार निर्वाणीचा इशारा देताना जराही कचरत नाही . स्पष्टता आणि सत्यता बयाँ करण्याची जुजबी भाषा टाळून अव्वलता काय असते ती त्यांच्या खालील शेरातून कळते -
बदलतो आहे ऋतू तू पेरणी बदलून घे
कोरड्याठण पावसाचे खूप झाले सांगणे... ( पृ. क्र.०९)
किंवा
संध्या झाली कधी कुणाची
दुपार वाया का घालवतो... ( पृ. क्र.१०)
'मैं सच कहूँगी मगर फिर भी हार जाऊँगी ।
वो झूट बोलेगा और ला-जवाब कर देगा । '
पाकिस्तानच्या मशहूर शायरा ' परवीन शाकिर' यांच्यासारखी तक्रार न करता राऊत यांचे शेर बेधडक सुटतात मग ते स्वानुभव असो की परानुभव . स्वतःच्या अनुभवातून सूचक इशारत देताना ग्रामीण ठसक्याची लकब सांभाळून म्हणी , वाक्प्रचार गझलेत खुबीने वापर करण्याचे कसब राऊत किती सहज हाताळतात हे त्यांच्या या शेरातून जाणवते .
प्रस्ताव ठेवताना फुंकून ताक प्यावे
जाळून ओठ माझे पस्तावलो कधीचा.... ( पृष्ठ क्र.११)
एक खरा साहित्यिक आणि त्यांचे साहित्य विश्व काय असते . खरा साहित्यिक नशा करतो ती त्याच्या साहित्य जगताची . एखाद्या नेणत्याला साहित्यिक अभ्यासायचा असेल तर त्याला वेगळा असा खटाटोप करण्याची गरज नाही . त्यासाठी राऊत यांच्या चार ओळी सहज समजावतील इतक्या ताकदीच्या आहेत .
जन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे
एक प्याला अंगुराचा एक ही साली गझल... ( पृष्ठ क्र.१२)
किंवा मृत्यु पश्चात पश्चाताप करण्यासारखी बाब म्हणून ह्या गझलकारांची प्रतिभा गझलेकडे अंगुली निर्देश करते. इतके अप्रुप गझलेचे हे वाचकाच्या अंतर्मनाला भिडल्या शिवाय राहत नाही .
पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल... ( पृष्ठ क्र. १२)
अवतीभवतीचे भयाण वास्तव गझलेत मांडताना हा उमदा गझलकार व्यवस्थेच्या किती जवळ जातो . बरं नुसता जवळ जात नाही तर आयुष्याच्या अखेरच्या वळणावर होणारी फरफट बैचेन करून याला कारणीभूत कोण ? असा सवाल करत पाहिलेल्या जीवंत प्रसंगाच्या लवलवत्या नागफण्या तलवारी जेव्हा काळजावर बेमालूमपणे सप् सप् वार करतात तेव्हाच एखादा शेर कागदावर उमटतो -
बाबास ठेव येथे , आई तुझ्याकडे ने
वृध्दापकाळ त्यांचा पोरात वाटलेला... ( पृष्ठ क्र.२३)
इतके होऊनही जर मन भरले नसेल तर त्यांच्या मृत्यु पश्चात मागे सोडलेल्या स्थावर ,जंगम मालमत्तेची वाटाघाटी करायला उतावीळ झालेल्या पिढीच्या डोळ्यांत लज्जेचे अंजन घालणारा शेर राऊत किती मार्मिकपणे मांडतात हे वाखाणण्याजोगे आहे .
हिस्से -वाटी , भांडा-भांडी
प्रेत उचलून नेऊ तर द्या... ( पृष्ठ क्र.५८ )
नव्या पिढीने काळाचे पडसाद पाहून खंबीरपणे समस्या सोडवायला उभ राहावं . न डगमगता झुंजत राहण्याची अपेक्षा व्यक्त करताना राऊत त्यांना योग्य दिशा दाखवतात . युवा मनाला उभारी देऊन , जगण्यासाठी लागणारे कसब सांगणारे त्यांचे काही शेर सद्सद् विवेकाला नजरेआड करून कसे चालेल.
जीवन नसते देत कुणाला दुसरी संधी
सोने करण्याची ती किमया शिकून घे तू...( पृष्ठ क्र.२४ )
नैराश्य आणि नकारात्मकतेने ग्रासलेल्या जीवाला राऊत पुन्हा उभे राहण्याची उमेद देतात. ढासळलेल्या हातापायात नवी ऊर्जा भरतात . व्यक्तीच्या जीवनाला उभारी देण्याचे काम त्यांची गझल किती लिलया पेलते . ते खालील शेरातून उमजते .
तू सूर्य उगवतीचा आकाश जिंकणारा
गातोस तू कशाला पोरा उदास गाणी... ( पृष्ठ क्र.६७)
मनात सकारात्मकतेची ऊर्मी पेरताना राऊत एक खूणगाठ बांधायला लावतात . बाह्य जगाच्या फसव्या हव्यासापाठी लागून तू स्वतःच्या विनाशाला निमंत्रण देऊ नकोस . हे जाणीवपूर्वक सांगण्यासाठी राऊत सरळ नि साध्या शब्दात मांडतांना परिचयाची प्रतिके वापरून समजावतात.
ती नोट काय कामी , जी फाटते कुठेही
सांभाळ आपले तू कलदार एक नाणे... ( पृष्ठ क्र. ३५)
विदर्भातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबाच्या विचारांना कुरवाळून छातीशी धरणारा हा गझलकार त्यांच्या विचारांचा खरा पाईक आहे . म्हणून त्यांच्या गझलांचा विषय कर्मकांड आणि दैववाद ह्यातील फरक सांगणारा दिसतो . नव्हे आहेच म्हणणे वावगे होणार नाही . देवाच्या नावे जाती-जातीची अराजकता माजवणाऱ्यांना टाळून आस्तिक-नास्तिक ह्यामध्ये न अडकता समाजाला विकसित करायला हातभार लावणारी नवी विज्ञानवादी देव संकल्पना सत्यपित करताना राऊत , समाजातील जे स्वतःच्या स्वार्थासाठी धर्म आपली मक्तेदारी समजतात अशा मार्तंडांना वेठीस धरतात . इतक्यावर न थांबता ते त्यांना किडे संबोधतात .
वैश्विक झाला देव कधीचा
किडे मोजती अपुल्या जाती... ( पृष्ठ क्र. १८)
तुम्ही पोथी - पुराण, बायबल-कुराण वाचू नका . काशी मक्का- मदीना कुठेच जाऊ नका त्याऐवजी आपल्या उपाशी लेकरांना सुखाचे दोन घास खाऊ घाला . त्यातच तुम्हाला तुमचा ईश्वर अल्लाह भेटेल . इतकी महान संतांच्या विचारांनी भारलेली शिकवण राऊत आपल्या गझलेत साध्या शब्दात मांडतात. जे देव आपण दैनंदिन व्यवहारात पाहतो . ते मेले तर मरू द्या ,त्याने फारसा फरक पडणार नाही . पण माणसं वाचवा तो समाजाचा - देशाचा कणा आहे . हे सांगताना त्यांची गझल किती ताकदीची आहे हे खालील शेर वाचल्याविना कळणार नाही.
नको वाचू कधी पोथी , नको जाऊस तीर्थाला
उपाशी लेकरांना तू तुझ्या दे घास थोडासा...( पृष्ठ क्र.१४ )
देव मेले तरी द्या मरू
माणसे वाचवा शेवटी...( पृष्ठ क्र.३०)
ईश्वर , देव ही सावयव अशी संकल्पना नाही . त्यामुळे त्याविषयी स्पृश्या-अस्पृश्य असे काहीच नसते . काही घातक रूढी आणि परंपरा समाजावर लादून आपली पोळी भाजणाऱ्या दलालांनी स्त्रियांवर आजतागायत अनेक निर्बंध लावून अन्याय केला आहे . त्याचे खंडण करताना राऊत यांची कलम तलवारीला लाजवेल इतकी धारदार होते . ते बयाँ करणारा एक शेर -
तो देव एक सच्चा बाकी दुकानदारी
होताच स्पर्श स्त्रीचा जो बाटणार नाही... ( पृष्ठ क्र. ७९ )
खानदेशातील बहिणाबाईं चौधरी आपल्या एका कवणात विठ्ठलाविषयी लिहितात , " सोन्या चांदीनं मढविला सिरीमंताचा बालाजी , शेतकऱ्यांचा ईठूबा पाना- फुलामंदी राजी..." त्याच्या पायावर पाऊल टाकत त्याच काहीशा आशयाचे आपले विचार राऊत गझलेत मांडतात , गरीब श्रीमंत ,थोर-सान ह्या बुरसट विचाराला खरडताना समाजरचनेला भेदणारी त्यांचे वैचारिक बलस्थाने किती समाजशील आहेत ते जाणवते . आमचे आम्हास मान्य आहे . तुमचे तुम्हास लखलाभ असू दे मग ते कितीही मौलिक असो . इतकी निराग्रही शाश्वत भावना त्यांच्या या शेरातून कळते .
सोन्यास काय चाटू, खाऊ कसे हिऱ्याला
श्रीमंत देव तुमचे लखलाभ ते तुम्हाला...( पृष्ठ क्र.८०)
भक्ती कशी आणि किती श्रेष्ठ असते . त्यातला अधिकार आणि कर्तव्यासोबत नातं कसं असावं याचे उदाहरण ते किती मार्मिकपणे देतात . त्यासाठी शब्द योजना प्रतीके योजताना त्यामागे असलेला अभ्यास आणि चिंतन विशाल आहे . हे एका भक्ताचे मागणे किती रास्त समर्पणाचे आहे .
लाव विठ्ठला हात जरासा ह्या जात्याला
जगणे दळता पीठ पडू दे शुभ्र निरंतर... ( पृष्ठ क्र. ४३ )
श्रीकृष्ण राऊत हे एक गझलेचे साधक आणि गाढे अभ्यासक आहेत . धर्म -अधर्म एक मानवी संवेदना जपणारा सच्चे गझलकार आहेत. त्यांच्या गझलात समाजिक भान आहे. लय - ताल -सूर- छंद आणि आकृतीबंध तर आहेच पण त्याही पुढचा एक आशय आहे जो नव्या पिढीला जगण्याचे बळ देतो. लेखनाचे प्रोत्साहन देतो . त्यांच्या गझलेत छत्रपती शिवाजी,फुले , शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रभावशाली बैठक आहे . त्यांच्या आचार-विचाराचा पैलू त्यांचा एक शेर वाचकाला सहज देऊन जातो .
दु:खास धर्म नसतो , ना जात वेदनेला
हे मर्म जाणणारा सर्वज्ञ मानतो मी...( पृष्ठ क्र.२७ )
आपल्या दु:खाचा बाजार करणारा हा गझलकार नाही उलट वाट्याला आलेले आपले आपण निमूटपणे सहन करताना इतरांवर दोष न देता सहन करायचे...
भोगतो मी एकट्याने भोग माझा
मी कुणावर दोष त्याचा देत नाही...( पृष्ठ क्र. ७६ )
अखेर उर्दू शायर 'फिराख गोरखपुरी' यांचा शेर आठवतो ,
" हज़ार बार ज़माना इधर से गुजरा है ।
नई नई सी है कुछ रहगुज़र फिर भी ।
श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गझल संग्रहाचा नव्या पिढीला नक्कीच फायदा होईल अशी आशा बाळगणे योग्य ठरेल . अशाच अफलातून अविष्काराचे साहित्य राऊत यांच्या लेखणीतून साकार होऊन वाचकांना वाचण्यास मिळावे... एवढी अपेक्षा करून त्यांच्या पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा...!
कारूण्य माणसाला संतत्व दान देते
गझलसंग्रह
श्रीकृष्ण राऊत
सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड
आवृत्ती - मे २०१९
मुखपृष्ठ - श्रीधर अंभोरे
किंमत - १००/-
रसग्रहण/अभिप्राय
प्रा. तान्हाजी खोडे
नाशिक
मो.९८२३३१६८३८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा