गुलाल आणि इतर गझला : विनोद गहाणे






मराठी गझलेचे खलिफा गझलश्रेष्ठ सुरेश भटांनंतर मराठी गझलेचा वारसा समृद्धपणे पुढे चालविणारे एक महत्वाचे नाव म्हणजे जेष्ठ गझलकार  डॉ.श्रीकृष्ण राऊत सर.

नुकताच वाचनात आलेला जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत सरांचा ७६ गझलांचा समावेश असलेला प्रसिद्ध गझलसंग्रह म्हणजे 'गुलाल आणि इतर गझला'. २०२० साली आलेली या संग्रहाची दुसरी आवृत्ती आहे.पहिली आवृत्ती २००३ साली निघाली होती.

प्रस्तुत लेखात उल्लेखिलेल्या शेरांचे पृष्ठ कमांक हे  दुसऱ्या आवृत्ती मधील आहेत.

राऊत सरांच्या एखाद्या काव्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही.तरीही मोडक्या तोडक्या शब्दात या पुस्तकाचा घेतलेला हा धांडोळा.

यात पु.ल.देशपांडे,वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज),डॉ.अविनाश सांगोलेकर,डॉ.मधुकर वाकोडे यांचे अभिप्राय  तर आहेतच. पण त्या सोबत ह्या गझलसंग्रहाचे    योगदान अधोरेखित करणारी  कविवर्य ना.घ.देशपांडे व मंगेश पाडगावकर यांची पत्रे समाविष्ट आहेत.गझल संग्रहात आकर्षक व नेहमी नेहमी वाचाव्यात अशा गझला आहेत.मानवी मुखवट्याचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक असे मुखपृष्ठ तर मलपृष्ठावर गझल अभ्यासक डॉ.राम पंडित सर यांची तोलामोलाची पाठराखण आहे.गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे आणि वृत्ती जपण्याचे कार्य चपखलपणे राऊत सरांनी  केले आहे. 

मानव-स्वतःच्या अस्तित्वाचा नेहमी शोध घेणारा एक सजीव. आदी-अनादी काळापासून मानवाचे जगणे विसंगतवादी राहिले आहे,स्वतःच्या आत्मसुखासाठी तो पशुसारखे कृत्य करायलाही धजावतो.

श्रीकृष्ण राऊत सरांचे खालील शेर बघा....


माणूस तू कसा रे खातोस शेण वेड्या

इतका नको पडू तू सांभाळ तोल काही

(पृष्ठ क्र.८६)


अस्वस्थ एक आत्मा सांगून जात आहे

अद्याप माणसाला माणूस खात आहे

(पृष्ठ क्र.२९)


सोबतीचे जरी सर्व झाले पशू

तू तरी वागना माणसासारखा

(पृष्ठ क्र.४८)


सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू

तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे

(पृष्ठ क्र.२४)


वरील शेरातून राऊत सरांनी चपखलपणे मानवी मुखवट्यांवर घणाघाती प्रहार केला आहे.


पंढरीचा सावळा विठू अन् संत तुकाराम हे राऊत सरांचे आवडीचे विषय.राऊत सर हे आपल्या गझलेतील शेरांच्या माध्यमातून विठू अन् संत तुकाराम  महाराजांचा दाखला देऊन वैश्विक विचार करायला भाग पाडतात.हे खालील शेर बघा -


हृदयापाशी कवळ विठोबा

तुझ्या जनीची विरही वाकळ

(पृष्ठ क्र.३३)


खरे खरे तू बोल विठ्ठला

कोण कुणाचा 'मोठ्ठा' भाऊ

(पृष्ठ क्र.५६)

.

भक्तांच्या हातात बाहुला विठ्ठल

नाच म्हणू तसे नाचला विठ्ठल

.

मंदिरात नाही,नाही हृदयात

अज्ञातवासात धाडला विठ्ठल

(पृष्ठ क्र.७१)

.

जसा तो बोलतो आहे तसा तो चालला नाही

तुकारामास नव्हता रे कुणीही पाठचा भाऊ

(पृष्ठ क्र.२८)

.

तुकारामा अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा

मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी

(पृष्ठ क्र.७५)

.

सर्व आशा आकांक्षा जेव्हा लोप  पावतात,हे जीवन नकोसे वाटते.उदासीनता/नकारात्मता हे स्वच्छंदी जीवन आतून पोखरत असते.हे जीवन नकोसे वाटते. त्याचा प्रत्यय देणारे खालील शेर 

बघा -

.

असे आयुष्य झाले की मिठाने दूध नासावे

कशाचा धूर दाटे हा धुराला श्वास त्रासावे

(पृष्ठ क्र.१९)


असे जीवना तू किती घाव केले

मला तू खरेदी लिलावात केले


तुला एक साधे कमळ दे म्हणालो

किती खून तू या तलावात केले

(पृष्ठ क्र.२०)


वरील शेर नकाराकडे छुकलेले असले तरी उद्याच्या सूर्य नक्कीच उगवेल या आशेवर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून बंडाची/विद्रोहाची भाषा ते आपल्या शेरातून मांडतात. असे म्हणतात की,शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात. शस्त्रासारखी तीच धार राऊत सरांच्या शेरात आली आहे 

खालील शेर पहा -

.

मी स्पष्ट बोलणारा,मी न्याय मागणारा

डोळ्यात हीच त्यांच्या, माझी सले मुजोरी

(पृष्ठ क्र.५३)

.

नाही दिवा जरीही,पडक्या घरात माझ्या

मी सूर्य पाळलेला,आहे उरात माझ्या

(पृष्ठ क्र.६२)

.

रक्तात स्फोट करतो,ज्वालामुखी कधीचा

तू मानतोस तितकी,छाती मवाळ नाही

(पृष्ठ क्र.८५)

.

चांडाळ पाखरांनो,घ्या ओळखून कावा

रक्तात चेतवूनी,तेजाब व्हा शहाणे

(पृष्ठ क्र.६५)


.

प्रेम हा गझलेचा स्थायीभाव.उर्दू-फारशी गझलेच्या काळापासून गझलेचा प्रमुख बिंदू प्रेम हाच राहिला आहे.त्यात मग मराठी गझल कशी मागे राहील. असेच काही राऊत सरांचे हिरवे नाजूक शेर बघा उत्क८ प्रेमाची परिसीमा गाठतात.

.

तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी

चंद्र असावा मिठीत अन् धुंदीत रहावे ओठांनी

.

नाजुक कोमल मऊ पाकळ्या तारुण्याने मुसमुसल्या

फूल सुगंधी ओठांचे ते खुडून घ्यावे ओठांनी

(पृष्ठ क्र.५०)

.

एखादी व्यक्ती आपल्या जीवनात आली की संपूर्ण जीवन परिपूर्ण असल्यासारखे वाटते.जगण्याची नवी उमेद निर्माण होते.

.

भेटली तू मला वादळासारखी

प्रेरणेने दिलेल्या बळासारखी

.

मोकळे बोलणे हासणे मोकळे

पारदर्शी प्रिये तू जळासारखी

(पृष्ठ क्र.४७)

.

तुझा हात साधा न हातात माझ्या 

मला भेटली तू घबाडाप्रमाणे

(पृष्ठ क्र.२७)


प्रेम म्हटले की विरह,दुःख, दुरावा अन् रुसवे फुगवे येणारच.एकदा विरहात काठोकाठ बुडल्यानंतर हे जीवन नकोसे वाटते,फक्त आठवणीच तेवढ्या सोबतीला असतात.

.

आठवे ती भेट तेव्हा चांदण्या रात्रीतली

तो सुगंधी संगतीने डाव होता रंगला

(पृष्ठ क्र.३९)

.

तसा न चंद्र राहिला तशी न रात राहिली

अजूनही तशीच तू तनामनात राहिली

(पृष्ठ क्र.४७)

.

दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू

घाव सांगतात ना आजही पसंत तू

(पृष्ठ क्र.५८)

.

तिची आसवेही न होती खरी अन्

तिचे हासणेही लबाडाप्रमाणे

(पृष्ठ क्र.२७)

.

भूतकाळात डोकावून बघतांना असे वाटते तथाकथित राज्यकर्त्यांनी,सनातनी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी नव्या पिढीसमोर चुकीचा इतिहास मांडला. त्यालाच प्रमाणित इतिहास म्हणून आपण वर्तमानात जगत आहोत.याच घटनांचा धांडोळा घेऊन 'खूप गोष्टी 'हा रदिफ घेऊन लिहिलेली राऊत सरांची मुसलसल प्रकारातील गझल बघा -

.

उल्लेख टाळलेल्या आहेत खूप गोष्टी

शास्रोक्त गाडलेल्या आहेत खूप गोष्टी

.

द्यावा कसा पुरावा नाही ठसा कुठेही

साद्यंत गाळलेल्या आहेत खूप गोष्टी

.

डोळ्यात धूर जाता केकाटली स्मशाने

संपूर्ण जाळलेल्या आहेत खूप गोष्टी

.

अर्ध्यात संपलेल्या समजून घ्या कहाण्या

ग्रंथात फाडलेल्या आहेत खूप गोष्टी

.

नादार लक्तरांची भांबावते उधारी

मुद्दाम नाडलेल्या आहेत खूप गोष्टी

.

निर्माल्य जीवनाचे शोधू कुठे कसा मी

पाण्यात  सोडलेल्या आहेत खूप गोष्टी

(पृष्ठ क्र.२९)

.

आपण २१ व्या शतकात कितीही तंत्रज्ञानाच्या किंवा आधुनिकतेच्या गप्पा मारत असलो तरी गर्भलिंग परीक्षण, हुंडाबळी किंवा स्त्री अत्याचार असे नाना प्रकारे स्त्रियांवर अत्याचार आजही सुरू आहेत. ह्याकडे लक्ष वेधणारे राऊत सरांचे खालील शेर पहा -

.

कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पूजा

जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते

(पृष्ठ क्र.३०)

.

काय झाले सांग पोरी सोसणे आहे गुन्हा

फाटलेले पोलके अन् देह का हा कापरा

(पृष्ठ क्र.५५)

.


एवढी भीती कशाची वाटते ह्या लेकरांना

भूत नाही प्रेत नाही माणसाचे चित्र आहे

(पृष्ठ क्र.७७)

.

कुणाची आर्त किंकाळी ? कसा आवाज हा आला ?

कशी ही पेटली होळी ? नभाला झोंबती ज्वाला !

.

नव्या या उंबऱ्यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे

कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला

.

नखाने दाबला नाही गळा तान्हेपणी आई

अता हा फास सोन्याचा भिडे शोभून कंठाला

.

क्षणाची ही कशी पत्नी ? अनंताची कशी माता ?

कसे सौभाग्य हे आहे ? दुधाचा कोळसा झाला !

(पृष्ठ क्र.३६)

.

वर्तमान आणि उद्याचा भविष्यकाळ येणाऱ्या पिढीसाठी फारच वाईट आहे.

प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत असतो.ही 'चिंता ' पदोपदी आपला पिच्छा सोडत नाही.राऊत सरांनी खालील शेरातून भविष्याची वेगवेगळी चिंता मांडली आहे.

.

कपाळावरी हात मारुनी बसली चिंता 

चिंतेमध्ये मला एकदा दिसली चिंता

.

एकांताच्या कुशीत सगळे विदुषक रडती

सर्कशीस ह्या विषन्नतेने हसली चिंता

.

केली होती  जरी परीक्षा गर्भजलाची

चौथ्यानेही मुलगी होउन डसली चिंता

(पृष्ठ क्र.३१)

.

स्त्री ही साऱ्या जगाची जननी. जिच्या असल्याने मानवाचे अस्तित्व आहे.पण बदलत्या कालानुरूप स्त्रियांचे स्वरूपही बदलले की काय असा प्रश्न राऊत सर आपल्या शेरातून मांडतात.

.

सौंदर्य आपले ती सांभाळते असे की

नाहीच लेकराला पाजीत माय आता


वात्सल्य कोणते हे आहे मला कळेना

ही वासरास खाते,दररोज गाय आता

(पृष्ठ क्र.४१)

.

या जगात काही  लोकांचे जगणे एवढे मर्यादित असते की या जगाशी त्यांना काही देणे घेणे नाही.समाजात,देशात घडणाऱ्या सकारात्मक अथवा नकारात्मक घटनांचा यांच्यावर काडीचाही परिणाम होत नाही.याच वळणावरचे राऊत सरांचे काही 

शेर -

.

तुझ्या रक्तात ओलावा कधी रे आटला मित्रा

तुझ्या हाडात वाळूने पसारा थाटला मित्रा

.

तुझे हे कान गोट्याचे तुला ऐकू कसे यावे

किती देऊ तुला हाका घसाही फाटला मित्रा

(पृष्ठ क्र.५१)

.

वरील शेरांतून राऊत सरांनी हाडामासाच्या निर्जीव माणसांवर अप्रत्यक्षपणे वार केला आहे.

देशात कितीही सत्तांतरे झाली तरीही  आजही भाकरीचा प्रश्न अनुत्तरित आहे.देशात इंडिया अन् भारत अशा दोन प्रकारची प्रजा नांदत आहे.शायनिंग इंडियाच्या कितीही गप्पा मारल्या तरी भूक अन् भाकरीसाठी आजही जनतेला संघर्ष करावा लागत आहे.

.

घाऊक आजचा हा बाजारभाव ताजा

स्वस्तात रक्त मिळते भाकर महाग आहे

(पृष्ठ क्र.४३)


जे शोध भाकरीचा,घेण्या घरुन गेले

हे वृत्त आज आले की ते मरून गेले

(पृष्ठ क्र.४४)

.

भूक पत्रावळी चाटते रे पुन्हा

थुंक तोंडातला घास नाही खरा

(पृष्ठ क्र.७३)

.

जीवनातील एक शाश्वत सत्य म्हणजे मृत्यू,जो कुणीही नाकारू शकत नाही.तरीही या मृत्यूला हसत हसत सामोरे गेले पाहिजे.आपल्याला मृत्यूचाही सोहळा साजरा करता आला पाहिजे.मृत्यूविषयी राऊत सरांचा अफलातून शेर बघा -

.

अशी ही कोणती मदिरा दिली पाजून मृत्यूने

उभा हा जन्म झिंगूनी खुशीने डोलतो आता

(पृष्ठ क्र.८९)


आणि हा मृत्यूमार्ग स्मशानाकडे जातो.जी वाट कुणी नाकारू शकत नाही.

.

तुझी वाट नाही जगावेगळी रे

पहा सर्व वाटा मिळाल्या स्मशानी

(पृष्ठ क्र.८४)


अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी मोर्चे किंवा चळवळी उभारल्या जातात. कधी ही देशव्यापी चळवळ व्यक्तिसापेक्ष होऊन जाते. स्वतःच्या फायद्यासाठी काही महत्वाकांक्षी  मूठभर लोकच त्या चळवळीचे प्रतिनिधित्व करू पाहतात पण या मोर्च्यात पिंजल्या जाते ती सामान्य जनता -

.

कसली क्रांती कसली चळवळ 

उथळ जळाला नुसती खळखळ

.

मी पोटाचे चटके मोजू

की मोजावे पाटीचे बळ

.

हूशार झाले नवीन मासे

ते ओळखती कुठे कसा गळ

(पृष्ठ क्र.३३)


या मोर्च्याचे किंवा चळवळीचे नेतृत्व नेते करतात.विरोधी बाकावर असतांना जे जहाल असतात तर तेच सत्तेवर आले की मवाळ होतात.

.

होता जहाल मागे,केव्हा तरी विषारी

तो दंतहीन सध्या पाळीव नाग आहे

(पृष्ठ क्र.४३)

.

आहे तसाच आणा काळा चहा गडे हो

येथील दूध सारे बोके पिऊन गेले

(पृष्ठ क्र.७०)

.

धर्म ही अफूची गोळी आहे.आज धर्माच्या नावावर जातीजातीत द्वेष निर्माण होत आहे.ही धर्मवेडी माणसांची लाट देशाला अधोगतीकडे नेत आहे.

.

घे दखल जनसागराच्या मंथनाची

येथ आहे धर्मवेडी लाट राजा

(पृष्ठ क्र.३५)


देवाचे अस्तित्व कुणी मानतो तर कुणी नाकारतो.देव पावण्यासाठी त्याचे भक्त नाना तऱ्हेचे नवस करतात,पण हाच भक्त देवाला उलट जवाबी प्रश्न विचारतो.

.

नको पाया पडू माझ्या तुला मी पावलो देवा

तुलाही रक्तमासाचा हवा का सांग देव्हारा

(पृष्ठ क्र.४२)


दुःख सोसल्याशिवाय सुखाची किनार लाभत नाही.दुःख जर नसते तर माणसाचे जगणे निरामय झाले नसते.वेगवेगळ्या प्रतिकाच्या माध्यमातून दुःखाचे महत्व विशद करणारे काही अप्रतिम शेर पहा -

.

दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना

आरती जी गात आहे तीच माझी वेदना

.

मी पुजारी माणसांचा दुःखितांचा भक्त मी

आंधळ्याना वाट द्यावी तीच माझी अर्चना

.

दुःख माझे एक राधा एक मीरा आणखी

व्याकुळांच्या गोकुळी मी करू कशाची वंचना

(पृष्ठ क्र.५९)

.

दुःखात नाचणाऱ्या असतील खूप वेश्या

माझ्यातरी व्यथेचा पायात चाळ नाही

(पृष्ठ क्र.८५)


राऊत सरांच्या या गझलसंग्रहातील मला भावलेले वेगळ्या धाटणीचे स्वतंत्र शेर ज्यामुळे ते मराठी गझलेत महत्वाच्या स्थानी आहेत. त्या शेरांनी या लेखाचा समारोप करतो.

.

कर्जात शेत गेले व्याजात बैल गेले

चालेल चाक गेले शाबूत आख ठेवा

(पृष्ठ क्र.६२)

.

रे दुःख माणसाचे अंतीम सत्य आहे

बाकी मवाळ साऱ्या आहेत जाहिराती

(पृष्ठ क्र.४५)

.

पाखरांच्या पहा बैसल्या पंगती

जहर दाण्यांवरी तू फवारु नको

(पृष्ठ क्र.४३)

.

तू राहतेस हल्ली कोण्या भ्रमात पोरी

वैरीण होत आहे काया तुझीच पोरी

(पृष्ठ क्र.५३)

.............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा