अपार करुणेसोबत एक दृष्टे जाणतेपण घेऊन आलेले हे संतत्व : संजय गोरडे

अभिप्राय जाणत्यांचा नाही खरा कुठेही प्रोत्साहनात होतो जो बोचरा कुठेही गायी तुला शहाण्या दिसतील लंगड्या त्या कळपात कोणत्याही जा वासरा कुठेही... अवती भोवती घडणाऱ्या अनेक प्रातिनिधिक गोष्टींचे वास्तविक चित्रण करतानाच त्यातले उपहासात्मक व्यंग व विरोधाभास मांडणे हा अंदाज-ए-बयाँ आहे श्रीकृष्ण राऊत सरांचा! 'कारूण्य माणसाला संतत्व दान देते' बाबत खरंतर अनेकांनी याआधी खूप काही लिहिलंय... त्यामुळे मी पुन्हा त्यावर आणखी काय लिहावं या विचाराने माझी पाटी कोरीच राहिली... 'कारूण्य माणसाला संतत्व दान देते' या शीर्षकाची समर्पकता संग्रह वाचताना अनेकदा प्रत्ययास येते. अपार करुणेसोबत एक दृष्टे जाणतेपण घेऊन आलेले हे संतत्व प्रत्यक्ष मुद्द्यांना हात घालते, मार्मिक प्रहार करते. "आणखी फुगणे फुग्याला शक्य नाही बैल होणे बेडकाला शक्य नाही मानतो जो मीच मोठा तुच्छ सारे थोर होणे त्या जीवाला शक्य नाही" भट साहेबांच्या व नंतरच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या गझलांचा अंदाज उपदेशक वाटला तरी तो तितकाच समर्पक व बंडखोर आहे! "कळला नाही शेर तुला तर चिंतन कर आपट डोके पाषाणावर चिंतन कर" लोकांना समजेल अश्या भाषेत शेर असावा असे असले तरी दरवेळी तो सर्वांपर्यंत पोचतोच असे नाही... अश्यावेळी ते रसिकालाही ठणकावून सांगतात, व तितक्याच अधिकाराने ते कवीलाही सुनावतात की... "किती भेटते गझल खरी अन गझलेचे भास किती? कला शीक तू जगण्याची मोजीत बसला श्वास किती?" हल्ली अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा सर्रास घेतल्या जातात! त्यांचा "घडविण्याच्या अविर्भावात बिघडवणारी प्रयोगशाळा" असा त्याचा एक वेगळा निष्कर्ष ते निदर्शनास आणून देतात. जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो! शिकणाऱ्यांना झाली घाई शिक्षकास तर त्याहुन घाई घडवत घडवत बिघडवणारी प्रयोगशाळा नवीन आहे! जिथे आपणच अजून विद्यार्थी आहोत व आपलीच समज अजून नीट पक्की नसताना आपण जाणकारांची मिशी धरायला जाणे किती हास्यास्पद आहे, यावर त्यांचा एक शेर छान उपरोधिक भाष्य करतो... "श्लोक शिकवू नको पंगतीचे मला बालका मी तुझे बारसे जेवलो!" आपल्या लेखन प्रवासाचंही एक वय असतं व त्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण कधी उथळ असतो, तर कधी नितळ होत जातो त्यातीलच एक छटा या शेरात त्यांनी कशी अधोरेखित केली पहा... "दोह्यात जीव नाही गझलेत जान नाही शायर जगात दुसरा माझ्यासमान नाही" एक समीक्षक जेव्हा आपल्यातल्या आस्वादकाचा खून करून टाकतो तेव्हा आपण एक बिनकामाची पांडित्यपूर्ण अडगळ बनून जातो हे नेमक्या शब्दात मांडताना ते म्हणतात की... "प्रेमभावना वाच शहाण्या व्याकरणाच्या चुका काढतो; संवादाची चव घालवली जेव्हा जेव्हा वाद घालतो!" असे असले तरी निंदकाबाबत त्यांची भुमिका कायमच प्रतिकुल किंवा पूर्वाग्रही आहे असे नाही... मिळतात ठोक येथे साबण तऱ्हेतऱ्हेचे दुनियेस स्वच्छ करती बाजार निंदकांचे एकीकडे हे वादंग आणि एक शायर म्हणून आपल्यावर संतापणाऱ्या गझलेचा संताप दुसरीकडे... "कधी संतापण्यासाठी, कधी गोंजारण्यासाठी गझल मैत्रीण झालेली मला समजावण्यासाठी" हे गझलेसोबतचं नातं किती वेगळ्या पातळीवर असतं ते सांगणं अवघड असतं... "पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल" जेवढं माझं वय नाही तेवढा त्यांचा व्यासंग आहे. त्यामुळे सरांच्या गझलेवर मी काही लिहिणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. त्यांच्या गझलेचे कौतुक करणेही मला शोभत नाही, त्यामुळे मी फक्त काही आस्वादात्मक निरिक्षणे मांडली आहेत... संग्रहातील जवळपास प्रत्येकच गझलेचा मतला विशेष दिलखेचक झाला आहे... जसे की... तुझ्या हासण्याचे दिवाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती..., तीच माझी दवा शेवटी जा, तिला बोलवा शेवटी..., तू जगाला दे झकोला छानपैकी मार त्याला मस्त टोला छानपैकी तू वागतो कशाला देवादिकाप्रमाणे साध्याच माणसाचे आहे तुझे घराणे शेकहॅण्ड त्याच्याशी केला पंजा माझा चोरी गेला लक्षात येत नाही आहे कशी कहाणी पाण्यात दूध हे की, आहे दुधात पाणी? रक्तात वाहणारे आई तुझेच गाणे प्रत्येक पावलावर करते मला शहाणे... गझल ही अप्रत्यक्षपणे शायराच्या जिंदगीचा लेखाजोखा मांडत असते. तर कधी हा आयुष्याचा जमाखर्च मांडतांना एखाद्या निष्कर्षाप्रतही येते... यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे आणून हसू उसने मी ओठ सजवले माझे सगळे कोळून पिल्यानंतर एखाद्या समिकरणाचे प्रमेय हाती लागते की... जीव घ्यायला सगळे टपले सतरा लफडी छप्पन नाती सर्व चेहरे एकसारखे गाय कोणती कोण कसाई घाव खोल अन जखमा ओल्या इतिहासाची हीच कमाई हे संतत्व कधी आपल्याच चुकांचे ऑडिट करते व त्यावर आत्मचिंतन, मंथन करते... पुन्हा झाली चुकी माझी पुन्हा मी फसविल्या गेलो पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा व्यवस्थेची दिरंगाई सुद्धा ते तितक्याच परिणामकारकपणे मांडतात... अन्याय सोसताना आजा मरून गेला कोर्टात नातवाला छळतो निकाल आता आपल्या तर्काधिष्ठीत प्रश्नांनी ते महापुरूषांनाही धारेवर धरतात... भ्रष्ट झाला राजवाडा, भ्रष्ट हा दरबार बापू थांबला गांधीगिरीने काय भ्रष्टाचार बापू? त्यांचा हा संवाद कधी मैत्रीच्या पातळीवर जातो व ते छानपैकी बापू किंवा तुकारामांच्या गळ्यात हात टाकून त्यांच्याशी या मसलती करतात... चोरलेला हार आहे, मारलेली शाल आहे गोड कर मोठ्या मनाने आमचा सत्कार बापू किनारी चंद्रभागेच्या विकत घ्या प्लॉट मोक्याचे तुम्हाला सांगतो तुमच्या भल्यासाठी तुकारामा त्यांनी गौतमाला केलेला हा प्रातिनिधिक प्रश्न अंत:करणाचा ठाव घेतो... कर दूर गौतमा तू शंका यशोधरेची नव्हते घरात का ते, जे शोधलेस दारी? माणूस हाच शेवटी अंतिम आहे हे अधोरेखित करताना राऊत सर म्हणतात की, घासतोस तू कपाळ रोज पत्थरावरी पावला कुणास देव ठोकरून माणसे तसेच काही उमदा सल्लेही सहज देतात की, नाते तुटले, सुटली मैत्री छान आपला ग्लास भरावा मन मेले तर मरो बिचारे खुशाल त्याला खांदा द्यावा... कथा लांबत चालली तर सांगणाऱ्याच्या लक्षात यायला हवी... अन्यथा 'माझा माईक आणि माझंच ऐक' असं व्हायला नको म्हणून ते म्हणतात की, सारख्या शेवटी कथा साऱ्या लांबली गोष्ट आवरू आपण त्याबरहुकूम सांगतेकडे येतो, शेवटी सुखाचा एक फंडा त्यांनी सांगितलेला आहे, तो त्यांच्याच शब्दात तुमच्या समोर ठेवतो व थांबतो! "एक साधा मंत्र सांगू का सुखाचा? आण गजरा बायकोला छानपैकी!" सलाम सरजी! या दिलखुलास संतत्वाला सलाम! दंडवत! आपल्या निरामय स्वास्थ्यासाठी मंगलकामना करतो व थांबतो! कळावे लोभ असावा. आपला, संजय 🌹💐👏🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा