कारुण्य माणसाला संतत्व दान देते : अमोल शिरसाट

*ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल*
*हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल*              मराठी गझलेवर गेल्या चार दशकांपासून प्रेयसी म्हणून नितांत प्रेम करणाऱ्या ज्येष्ठ मराठी गझलकार श्रीकृष्ण राऊत यांचा “कारुण्य माणसाला संतत्व दान देते”  हा दुसरा गझल संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १९८९ मध्ये “गुलाल” प्रकाशित झाल्यानंतर २००३ मधे ‘गुलाल आणि इतर गझला’ ही गुलालचीच विस्तारीत आवृत्ती प्रकाशीत झाली. १९८९ ते २०१९ या तब्बल ३० वर्षांच्या काळात केवळ दोन गझल संग्रह. इतका वेळ आजकाल कोणाकडे आहे ? त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ....

*शहराला मरणाची घाई*
*सवड काढ जगण्याला बाई*

              ....................शहरंच काय? सगळ्या जगाला मरणाची घाई झाली आहे. संयम नावाची गोष्ट कुठे मिळते हे शोधणे आजकाल फारच कठीण झाले आहे. ‘रेडिमेड’ च्या या युगात कोण वाट पाहतो इतकी ? खरं म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात आपण वावरतो आहोत. मोबाईल आपल्या आयुष्यावर हावी झालेला दिसतो की ....

*काढता लोकहो काय फोटो तुम्ही*
*हात द्या, वाचवा! मी बुडू लागलो*

                  बुडणार्‍याला वाचवण्याऐवजी फोटो काढण्याचं फॅड वाढलं आहे. हे फार विचित्र आहे. कुठे चाललो आहोत आपण नक्की? वरील शेरातून राउतांनी परिस्थिती खूपच नेमकेपणानं टिपली आहे. मानवी मूल्य कुठेतरी हरवत चालली आहेत. कोणाला कोणाचे घेणेदेणे नाही.

*नर्सरीतली नात मागते पिझ्झा बर्गर*
*जळे चुलीवर मनात माझ्या तेव्हा भाकर*

                              या शेरातून त्यांनी बदलणारी परिस्थिती चपखलपणे मांडली आहे. सोबतच बदलणाऱ्या परिस्थितीचा त्यांच्या संवेदनशील मनाला होणारा त्रास व्यक्त झाला आहे. राऊतांनी या संग्रहात त्यांच्या अनुभूतीच्या कॅलिडोस्कोप मधून विविध भावनांचा आविष्कार केला आहे. हा कॅलिडोस्कोप काल्पनिक जगात आपल्याला नेत नाही तर जीवनाचे वास्तवदर्शी चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे करतो. श्रीकृष्ण राऊतांनी 'गुलाल ' च्या माध्यमातून प्राप्त केलेलं ध्रुवतार्‍याचं अढळपद ‘कारूण्य माणसाला संतत्व देते’ मुळे अधिकच मजबूत झालं आहे.

                                मानवी संबंधांवर प्रकाश टाकणारे अनेक शेर त्यांच्या या संग्रहात आले आहेत -

*हिस्से वाटी भांडाभांडी*
*प्रेत उचलून नेऊ तर द्या*

                            वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीसाठी भांडणाऱ्या भावंडांचा स्वार्थीपणा किती खालच्या पातळीवर पोहोचला आहे हे दिसून येते. बाप मेल्यानंतर ही स्वार्थी भावंड आपल्या आईला जिवंतपणीच नरकात पाठवायला मागे पुढे पाहत नाहीत तेव्हा

*भरल्या घरात अडगळ ती शोभलीच नसती*
*वृद्धाश्रमात गेली आई किती शहाणी*

                          राऊतांच्या या शेरातून दिसलेली आई, तिची घरातली स्थिती आणि तिचं वृद्धाश्रमात निघून जाणं मन सुन्न करणार आहे. खरं म्हणजे आई ही प्रथम बाई असते आणि बाई आयुष्यभर चटके सोसते.  हे सोसणे पिढ्यानपिढ्या  चालत आलं आहे.

*लेक भोगते, माय भोगते, आजीनेही तेच भोगले*
*तपशीलाचा भेद जरासा मात्र सिनेमा नवीन आहे*

                      समाजात एकीकडे स्त्रीला देवी मानले जाते आणि दुसरीकडे मात्र ‘मुलगी वाचवा’ अभियान राबवावे लागते हा विरोधाभास त्यांनी पद्धतशीरपणे मांडला आहे.

*थेंबाथेंबासाठी वणवण मरता-मरता बायांनो*
*'मुली वाचवा मुलीस शिकवा ' ऐका नारे सटरफटर*

                  या शेरातूनही हा विरोधाभास अधिक चांगला दिसून येतो आणि मग खरोखरच स्त्रियांची समाजातली स्थिती बदलली आहे का? याचा विचार करावा लागतो. याला जबाबदार कोण ? स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारासोबतच समाजातल्या इतर अनेक गंभीर समस्याही जशाच्या तशाच आहेत....

*कवितेतल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका*
*वधू चांगली कमावती अन् वरून नगदी हुंडा घ्यावा*

                        काळ बदलला पण स्त्रियांचं समाजातलं स्थान बदललं नाही हे अधोरेखित होते. सोबतच हुंडा पद्धतीची कीड आजही अस्तित्वात आहे हे सुद्धा हा शेर सांगतो.

                            शेतकऱ्यांची समस्या, दुःख, दैन्य मांडणारे अनेक शेर या संग्रहात आले आहेत.

*निकाली निघाल्या किती आत्महत्या*
*विचारू कुणाला खरा आकडा मी**आत्महत्या पाप आहे खूप झाले सांगणे*
*पोट भरल्या चोचल्यांचे खूप झाले सांगणे**मन मातीचे रसायनाने खारवले*
*बाभळीस का लटके वावर चिंतन कर*

                      असे  अनेक चिंतन करायला लावणारे शेर या संग्रहात आहेत. या शेरात ‘बाभळीस वावराने लटकणे’ ही प्रतिमा जीव घेते. भ्रष्टाचारावर प्रहार करणारे शेर या संग्रहात आले आहेत.

*नाही कधीही कुणाची होणार राजनीती*
*वेश्येपरी बदलते आचार राजनीती*

*साडी असेल ह्याची चोळी असेल त्याची*
*मांडेन कुंकवाचा बाजार राजनीती*


                                       गलिच्छ राजकारण करणाऱ्या नेत्यांनी विकासाला आपल्या दावणीला बांधले आहे. असे नेते खालची पातळी गाठायला मागेपुढे पाहत नाहीत. ही शोकांतिका राऊतांनी मांडली आहे. सगळीकडेच नुसती ‘शोबाजी’ चालली आहे ....

*वर्षा मधूनी दोन-चारदा रस्ते झाडू फोटो छापू*
*संत गाडगेबाबा तुमचा रोज खराटा नको वाटतो*

                     स्वच्छता अभियानाचा  वरील शेरातून चांगलाच समाचार घेतला गेला आहे. संधीसाधू राजकारणी समाजाचा तीळमात्रही विचार करीत नाहीत.

                                  जीवनात येणारे कटू अनुभव सुद्धा श्रीकृष्ण राऊतांनी आपल्या शेरांमधून मांडले आहेत.

*पुन्हा झाली चुकी माझी पुन्हा मी फसवल्या गेलो*
*पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा*          या शेरातून राऊतांना आलेला हा अनुभव जीवनात प्रत्येकालाच येत असतो. रक्ताच्या नात्यातील लोकही दगा देऊन जातात तेव्हा आपोआपच हा शेर आठवतो. त्यामुळे हा शेर फक्त त्यांचा राहत नाही, तो प्रत्येकाचा होऊन जातो. अशा दगाबाज लोकांमध्ये राऊतांचा जीव रमत नाही आणि ते स्वतःलाच म्हणतात  -

*जमेल जेथे मैत्र जीवाचे*
*तिथे फुलांची लाव बाग तू*

                                      जिथे जीव रमतो, जिथे आपली माणसं भेटतात तिथेच जिवाला चैन पडते. जगाची ओळख त्यांना चांगलीच झाली आहे. अनेक कटू अनुभव गाठीशी आहेत. आपली मुलं घडली पाहिजेत यासाठी प्रत्येक आई-वडील नेहमीच जागृत असतात त्यांची काळजी घेतात त्यांना हवं ते देतात पण कॉन्व्हेंटी संस्कृतीत आजकालचे पालक अतिजागरूक असतात. म्हणूनच राऊत म्हणतात-

*कळाया चाल हेकोडी जगाशी द्या भिडू त्यांना*
*मुलांना घालता पाठी कशासाठी तुकारामा*

                    ‘कारुण्य माणसाला संतत्व दान देते’ मध्ये वापरलेल्या भाषेबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आलेली भाषा रोजच्या वापरातली भाषा आहे. अनेक शेर सुभाषिताप्रमाणे वापरले जावेत असे आहेत. रोजच्या वापरातील अनेक बोलीभाषेतील शब्दांबरोबरच इंग्रजी शब्दांचा वापर चपखलपणे झाला आहे.  स्वतः न अनुभवलेले अनुभव मांडण्याचा अट्टाहास श्रीकृष्ण राऊत करीत नाहीत. त्यांनी जे अनुभवलं आहे तेच ते मांडतात आणि त्यामुळेच गझलेची भाषा ही अत्यंत प्रवाही अशी झाली आहे. मराठी गझलेच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरावा असा हा संग्रह झाला आहे. संघर्षमय जीवन प्रवासातून व्यापक अशा अनुभवाच्या भट्टीत श्रीकृष्ण राऊतांची गझल तावून सुलाखून निघालेली आहे.  पाठीचा कणा ताठ करत दुःखाला सामोरे जाताना बुद्धाच्या डोळ्यातलं कारुण्य त्यांच्या गझलेत उतरलं आहे आणि म्हणूनच -

*कारुण्य माणसाला संतत्व दान देते*
*आपापल्या परीने हृदयात वाढवावे*• अमोल बी शिरसाट

• गझल संग्रह -  कारुण्य माणसाला संतत्व दान देते

• गझलकार – श्रीकृष्ण राऊत

•  प्रकाशन – सुर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड

•  मूल्य- १००/-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा