प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचा ‘गझल गौरव’...!



मुंबईच्या यू.आर.एल. फाऊंडेशनच्या वतीने मराठी गझल लेखनातील मौलिक योगदानाबद्दल जेष्ठ मराठी गझलकारांना दरवर्षी  ‘गझल गौरव’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येतं. यावर्षी  हा पुरस्कार, आमचा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचा प्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांना घोषित झाला आहे. यू.आर.एल. फाऊंडेशन, मुंबई व सुरेश भट गझल मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट यांच्या जयंतीला,15 एप्रिल रोजी पुणे येथे होणार्‍या एका खास समारंभात, ख्यातनाम समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते व सिद्धहस्त मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे मन:पूर्वक अभिनंदन ! त्यांच्या जीवन व गझल प्रवासाचा विषेशत: सामाजिक जाणिवा प्रखर करणार्‍या गझलांचा मागोवा घेण्याचा अल्पबुद्धीने केलेला हा मित्र प्रेमोपोटीचा शब्दप्रपंच !

खरं तर, अकोला जिल्ह्यातल्या पातूर या खेडेवजा शहरातला बहुजन समाजामधला श्रीकृष्णा हा पुढे एक  कवी  होईल,  विषेशत: गझल लेखनाच्या क्षेत्रात एवढं मोठं नाव कमावेल, असं आम्हा मित्रांना कधी वाटलं नव्हतं, पण हे घडलं खरं ! त्याचं काय झालं, श्रीकृष्णा हा माळी समाजातील सामान्य कुटुंबातला एक भाववेडा तरूण ! शालेय शिक्षण पूर्ण करून शिवाजी शिक्षण संस्थेने पातुरात नुकत्याच सुरू केलेल्या डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालयात त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला तेव्हा त्या महाविद्यालयातच प्रा. हिंमत सपकाळ मराठी विषय शिकवायचे. त्यावेळी, महाराष्ट्रात मराठी गझल लेखनाच्या क्षेत्रात चौकार व षटकार ठोकणारे कविवर्य सुरेश भटांचे ते पराकोटीचे चाहते होते. वर्गात शिकवत असताना ते सारखा सुरेश भटांचा उल्लेख करायचे. त्यांच्या गझलही ते विद्यार्थ्यांसमोर वाचायचे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या मनात सुरेश भटांबद्दल एक वेगळंच कुतुहल व आकर्षण निर्माण झालं. दरम्यान, त्याच्या हातात सुरेश भटांचं ‘रंग माझा वेगळा’ हे कविता व गझलांचं पुस्तक पडलं. श्रीकृष्णाने त्या पुस्तकाची अनेक पारायणे केली आणि नकळतपणे तो लिहीता झाला. पदवी प्राप्त केल्यानंतर श्रीकृष्णाने पुढील   शिक्षणासाठी  अकोला गाठत, श्री शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळात त्याचा संबंध लोककवी प्रा. विठ्ठल वाघ, प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर या कविजनांशी आला. भेटीगाठी वाढू लागल्या. कविता या साहित्य प्रकारावर मंथन होवू लागलं, चर्चा झडू लागल्या. संबंध दुढ होत गेले. तसतसा श्रीकृष्णाच्या कवितांना विषेशत: गझलांना विविधांगी घुमारे फुटू लागले. दरम्यान, श्रीकृष्णाला कविवर्य सुरेश भटांचा अल्पसा सहवास लाभला. त्यातच त्याची गझल हळूहळू प्रौढ, प्रगल्भ आणि आशय गर्भ होत गेली. आपली काव्यप्रतिभा अधिकाधिक प्रखर व्हावी यासाठी, त्याने गझलांच्या अंगाने काव्यनिर्मिती करणार्‍या उ.रा.गिरींपासून झाडून सारे मराठी कवी अभ्यासले. त्यातुनच आजचा प्रसिद्ध गझलकार श्रीकृष्ण राऊत घडत गेला.

‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असं म्हणतात. त्याप्रमाणे कुठल्याही कवीला, विषयाचं, कल्पनेचं असं कुठलंच बंधन नसतं. मात्र प्रत्येकाचा असा वेगळा ठसा, बाज असतो. त्या मार्गानेच तो आपला साहित्य प्रवास करत, त्यातच अधिकाधिक रमतो. तसंच काहीसं श्रीकृष्णाचं झालं. त्यानं आपलं काव्यविश्व गझलांच्या अंगानं फुलवलं. त्याचा १९८९ ला प्रकाशित झालेला ‘गुलाल ' शतप्रतिशत गझल संग्रह असला तरी, मुक्तछंद काव्यातही तो मागे राहिला नाही. हा प्रकारही त्याने मोठ्या सशक्त व समर्थपणे हाताळला. ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ हा २००१ मध्ये प्रकाशित झालेला त्याचा कविता संग्रह. या कविता संग्रहात बहुतांश कविता मुक्त छंदातल्या आहेत आणि त्याच्या ह्या कविता संग्रहाला आजपर्यंत वेगवेगळे असे  प्रतिष्ठेचे नऊ पुरस्कार मिळाले. आजपर्यंतच्या त्याच्या काव्य प्रवासात प्रेमकाव्य, भावकाव्य, निसर्गकाव्य तर आहेच, सोबतच सामाजिक भान असलेलं, सामजिक दांभिकतेवर वाक्बाण सोडणारं, प्रखर जाणिवेचं प्रतिक ठरणारं असं, गझल काव्यही आहे. ते त्याच्या प्रगल्भ जाणिवेचं द्योतकच म्हणावं लागेल!

२००३ साली प्रकाशित झालेल्या प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या ‘गुलाल आणि इतर गझला’ ह्या गझल संग्रहातील गझलांचे निवडक शेर इथे देणं मी क्रमप्राप्त समजतो. सांप्रत, लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. खरंतर या प्रक्रियेत मतदार राजा असतो. पण दुर्दैवाने निवडणुकीत उभा ठाकणारा नेताच राजा होवू पाहतोय, यावर भाष्य करताना प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत ‘राजा’ या गझलेत म्हणतात-

काय वर्णू ह्या स्तुतीचा थाट राजा;
पाळले तू मोठमोठे भाट राजा.

हे न सिंहासन कुणाच्या मालकीचे;
का हवा तुज सांग माझा पाट राजा.

मी किती श्रीमंत आहे काय सांगू?
जवळ माझ्या फक्त फुटके ताट राजा.

घे दखल जनसागराच्या मंथनाची;
येत आहे धर्मवेडी लाट राजा.

ह्या गझलेतून श्रीकृष्ण राऊत, राजकारणातील राजांचा थाट, अवतीभवती त्याची स्तुती करण्यात न थकणारे भाट. तसेच सिंहासन असूनही अतिस्वार्थापोटी ‘आम’ जनतेच्या बैठकी खालचा पाटही खेचण्याची तयारी हा राजा बेशरमपणे करतोय, असे म्हणतायंत. पुढे जाऊन ते ‘राजा’ जनसागराच्या मंथनाची दखल घे. समाजात धर्मवेडाची लाट येत आहे, असं ते राजाला नकळतपणे सुचित करतात. ‘राजा’ या गझलेतल्या प्रत्येक शेरातील प्रत्येक शब्द देषाच्या वर्तमान अवस्थेवर प्रहार करणारा आहे.

‘जाब’ या गझलेतही देशाच्या वर्तमान स्थितीची दखल घेत ते म्हणतात-

मोकळया हवेत श्वास घ्यावयास पाहिजे;
या इथून दूरदूर जावयास पाहिजे.

बैसले घराघरात भ्रष्ट ठाण मांडुनी;
वाचवून मज स्वत:स न्यावयास पाहिजे.

आणले महाग मद्य तो तरी रुसे-फुगे;
पाहुण्यास उष्ण रक्त प्यावयास पाहिजे.

ऐकला पिढयापिढयात तोच यक्ष प्रश्न मी;
आज मात्र त्यास जाब द्यावयास पाहिजे.

‘ शुभेच्छा’ या रचनेत प्रा. राऊत म्हणतात-

हा प्रश्न एकदा लावा धसास राजे;
टांगून ठेवले त्याला कशास राजे.

सांगू किती नवाई ह्या धूर्त कावळयांची;
ताटा मधून नेती काढून घास राजे.

सेतू तसा नवा पण हा कोसळेल केव्हा;
याचा अचूक, पक्का बांधा कयास राजे.

जेवण नसेल तर मग सांगा खुशाल चुटके;
जनता सभेत बसली आहे उदास राजे.

‘मंबाजी’ या गझलेत राजकारण्यांना ‘मंबाजी’ संबोधत. प्रा. राऊत त्यांच्या दुष्कृत्यांचा पाढाच वाचतात-

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी;
खिशाच्या आत घालुनी विठू नेतात मंबाजी.

तुम्हाला हालता यावे न साधे बोलता यावे;
पवित्रे टाकूनी ऐसे धरी पेचात मंबाजी.

मला भंडावती येथे, तुलाही गांजती तेथे;
पसरले दूरवर माझ्या-तुझ्या देशात मंबाजी.

कुणाचे फोडतो डोळे, कुणाचे ठेचतो डोके;
कुणाचे पाय तोडे तर कुणाचे हात मंबाजी.

तुकारामा, अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी.

समाजातील प्रस्थापितांची, नेत्या-राजकारण्यांची दुष्कृत्ये जाहीर करण्याचं काम, मोठ्या सामाजिक जाणिवेतून करताना प्रा. राऊत दिसतात. शेवटी तर, समाजात मुखोटा लावून फिरणार्‍या धेंडांना पैजारा हाणण्याची विनवणी ते जगत्गुरू तुकोबांना करताना दिसतात. देशातील एकूण समाजाचं दांभिक चित्रच प्रा. राऊत यांनी आपल्या गझलांमधून उभं केलं आहे. हे प्रकर्षाने जाणवतं प्रा. राऊत यांचा हा गझल प्रवास यापुढेही असाच होत राहो ! ‘गझल गौरव’ पुरस्काराबद्दल त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन!

मो. 9822225225

प्रा. मधु जाधव

लेखक हे ज्येष्ठ पत्रकार, रंगकर्मी व सामाजिक कार्यकर्ते आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा