कारुण्याची गझल : बदीउज्जमा बिराजदार



सुरेशभटांनंतरच्या पिढीतील मराठी गझलेला सर्वांगीण सुंदर बनवून आपल्या प्रतिभेचे स्वतंत्र आभाळ सतत विस्तारत ठेवणारे गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.

त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनं गझलेला नवा आयाम दिलाय्. साध्या सुलभ शब्दात नेमकेपणानं हृदयाला भिडणारी, जिवाला जडणारी नितळ गझल कशी लिहावी याचा जणू वस्तुपाठच राऊतांनी घालून दिलाय.

याकरिता कल्पनाविश्व समृद्ध असावं लागतं. विचारांवर जबरदस्त हुकुमत असावी लागते. अभिव्यक्तीची शक्तीही असावी लागते. राऊत हे ओघवत्या शैलीत सहजपणे व्यक्त होणारे गझलकार आहेत. नुसते शब्दांचे अवडंबर माजवून गझलेत निर्जीव शब्दांची आरास मांडण्याची कारागिरी राऊत करत नाहीत. भूलभुलैया निर्माण नाही करत.

गझलेचं खरं स्वरूप अन् शुद्धतंत्र अवगत असलं तरी ते भारंभर लिहीत नाहीत. सहज सूचतं म्हणूनही ते गझलेचा रतीब नाही घालत. जे सुचलं ते प्रभावी आहे का? सर्वसामान्यांच्या काळजाला भिडणार आहे का? याची मनोमन खात्री पटल्याखेरीज ते गझललेखनास हात घालत नाहीत. 

उत्तम काव्यमूल्य हा त्यांच्या लेखणीचा प्राण आहे.
ऊठसुट 'गझल एके गझल'चा कंठशोष करत निरर्थक गझलांची चवड रचण्याच्या फंदात ते नाही पडत. मागणी तसा पुरवठा करून सवंग लोकप्रियतेच्या नादीही ते नाही लागत. दीर्घकालीन चिंतनाची ऊर्मी अनावर झाल्यानंतरच ते लेखणी हातात घेतात मग त्या प्रगल्भ जाणिवेतून साकारलेली अस्सल गझल तुमची आमची अन् काळाचीही होऊन जाते.

उण्यापुऱ्या चाळीसवर्षांपासून गझललेखन करणाऱ्या राऊतांचा कारुण्यभाव प्रकट करणारा 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हा दुसरा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय.यावरून त्यांच्या दीर्घ चिंतनाचा, मंथनाचा मौलिक प्रत्यय येतो. गझलेबरोबरच त्यांच्या संयमालाही दाद द्यावीशी वाटते.

अवर्षणग्रस्त भागातील भेगाळलेल्या भूईचे जीवघेणे हाल पाहून धोरणकर्त्यांच्या काळजाला कधीच पाझर नाही फुटत. भुईचे तर हाल होतातच होतात. त्याचा शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसतो. शेतकरी पार गांजून जातो. कर्जबाजारी होतो. आत्महत्या करतो. हे दुष्टचक्र नित्यनेमानं सुरूच आहे. यात तसूभरही बदल नाही घडत. भेगाळलेल्या भुईवर आता नभानंच कृपेची बरसात करावी. त्याच्या डोळ्यातून कारुण ओघळावावं. अशी साद राऊत नभाला घालतात.

डोळ्यातुनी नभाच्या कारुण ओघळावे
भेगाळल्या भुईचे पाहून हाल आता

ज्या गझलकाराच्या हृदयात कारुण्याची गंगा निरंतर वाहत असते. त्याच्या गझलांची जातकुळीच निराळी असते.
स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्यासाठी जनतेला जाणीवपूर्वक संमोहनात टाकून संभ्रम निर्माण करणाऱ्या राजसत्तेला खडेबोल सुनावण्याचा प्रसंग येतो तेव्हा राऊत 'मौनात रंग सारे' म्हणून मौन नाही बाळगत. बघ्यांची भूमिका नाही घेत. उत्तरदायित्वानं अनेक प्रश्नांची, गुंतागुंतीची भीडभाड न ठेवता उकल करतात. सामाजिक अंगानं व्यक्त होताना ते दर्जाशी तडजोड नाही करत.

राजसत्तेनं माणसाला मुकं, ठार बहिरं करून टाकलंय्. कुणी काही बोलणार नाही. कुणी काही ऐकणार नाही. अशा पद्धतीनं त्याला कातरून टाकलंय्. विषयाच्या अनुषंगानं उपरोधिक शैलीत फटकेबाजी करायलाही राऊतांची लेखणी कुचराई नाही करत.

जीभ राहिली कुणा, न कान राहिले कुणा
टाकलीस काय छान कातरुन माणसे

आजकाल अनेकठिकाणी स्मार्ट सिटीच्या नावाखाली विविध स्वरूपाची कामे सुरू आहेत. परंतु त्या कामात व्यवस्थित नियोजनाचा, पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. महिन्यापूर्वी केलेला रस्ता पुन्हा खोदून आजूबाजूला वेडेवाकडे ढीग लावण्यात येतात. त्यामुळे सततची वाहतूक कोंडी होते. नागरिकांना चालणेही मुश्कील होऊन जाते. नियोजनाचा पार बोजवारा उडतो. नियोजनातील पोकळपणा चव्हाट्यावर येतो. नियोजनातील अनागोंदीमुळे शहराला बकाल स्वरूप येते. मग अशा नियोजनाचा उपयोग तरी काय, असा सवाल करत राऊत या विषयाकडं लक्ष वेधतात.

पोकळ नियोजन मातीत घाल आता
अवघा प्रदेश माझा झाला बकाल आता

शहरापेक्षा गावांची व्यथा वेगळीच असते. जो येतो तो गावावरच मनमानी प्रयोग करून जातो. गावं राहिली काय, ओस पडली काय, याच्याशी कुणालाच काही देणंघेणं नसतं. कित्येक गावं तर विकासाच्या नकाशावरच नसतात. त्यांना कुणीच वाली नसतो. ग्रामस्थ अनेक गैरसोयींच्या विळख्यात जगत असतात. आला दिवस ढकलत असतात. त्यांच्या समस्यांकडं पाहायला यंत्रणेकडं वेळ नसतो. ही आजच्या गावांची शोकांतिका आहे. गावांचा सर्वांगीण विकास झाला तरच देशाचा खऱ्या अर्थानं विकास होऊ शकतो. याची खूणगाठ मनाशी बांधूनच महात्मा गांधींनी 'खेड्याकडं चला' ची हाक दिली होती. परंतु त्याचा यंत्रणेला सोयीस्कर विसर पडलेला दिसून येतो. गावकऱ्यांच्या या संतापाला राऊत अशी वाट मोकळी करून देतात.

लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे

देशात वारेमाप वाढत चाललेल्या भ्रष्टाचारावर बापूंच्या गांधीगिरीची मात्रा कितपत प्रभावी ठरू शकते यावरही राऊत भाष्य नोंदवतात.

राजवाडा भ्रष्ट झाला, भ्रष्ट हा दरबार बापू
थांबला गांधीगिरीने काय भ्रष्टाचार बापू?

ही दुनियादारी हरामखोरी पूर्णतः विकसित झालीय्. ती सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. पोटात एक ओठात एक असा इथला दुतोंडी व्यवहार आहे. इथं कोण कुणाची फसगत करून परांगदा होईल, हे छातीठोकपणे सांगता नाही येत. नाकासमोर चालणाऱ्या माणसाचं जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय्. यापुढं त्याला भोळसट राहून चालणार नाही. दुनियादारी निभावताना त्याला प्रत्येक विद्या शिकून घ्यावी लागेल. किंबहुना त्यात त्याला पारंगत व्हावं लागेल. असंच राऊत सूचित करू इच्छितात.

इमानदारी, हरामखोरी, दुनियादारी
पडेल कामी हरेक विद्या शिकून घे तू

गझल हा घाईगडबडीत लिहिण्याचा काव्यप्रकार नाही. गझल अंत:स्फूर्तीनं, ऊर्मीनं, तब्येतीनं लिहिण्याचा काव्यप्रकार आहे. नुसती एकटाकी गझल लिहून नाही भागत. ती पुन्हा पुन्हा वाचावी लागते. त्यात काही नव्यानं दुरुस्त्या कराव्या लागतात. काल लिहिलेला एखादा शेर आज निरस, दर्जाहीन वाटू शकतो. त्या जागी कल्पनेची उत्तुंग भरारी घेणारा दुसरा शेरही सुचू शकतो. त्यासाठी अभिव्यक्तीमध्ये समृद्धी येईपर्यंत थांबावं लागतं. याची राऊतांना जाणीव आहे. म्हणूनच ते प्रसिद्धीची घाई नाही करत. प्रसिद्धीचा सोस गझलकारास खुळा बनवतो. हे वास्तव गझलकारांनी लक्षात घ्यायला हवं.

तुम्हाला बनवते खुळा जी कधीही
तिचे नाव आहे प्रसिद्धी कदाचित

विठूराया, तुकोबाराया यांच्याशी संवाद करत करत समाजजीवनातील अनेक गंभीर प्रश्न राऊत ऐरणीवर घेतात. जे राजसत्तेला झोंबणारे आहेत. वर्तमानानं केलेली सर्वसामान्यांची घोर फसवणूक, दिवसागणिक त्यांच्या वाट्याला येणारे दुःखाचे लोंढे, त्यांची हतबलता, सामाजिक मूल्यांच्या पडझडीतून येणारी निराशा, अस्वस्थता, माणसाचं जगणं हराम करणारी निर्दयी व्यवस्था, अक्राळविक्राळ रूप धारण करत अनिर्बंध फोफावत चाललेली असहिष्णुता अशा कितीतरी ताणतणावांचे विदारक दर्शन राऊतांची गझल घडवते.
गझलेच्या तंत्रावर राऊतांची विलक्षण पकड आहेच. शिवाय कल्पनेत, विचारात सुस्पष्टता आहे. त्यामुळे ज्यांच्या गझलेतील काव्याशय रसिकांपर्यंत थेट पोहोचतो.

त्यांच्या गझलांमध्ये वृत्त-छंदाचं वैविध्य आहे. नावीन्यपूर्ण  रदीफ-काफीयांचा विपुल वापर आहे. त्यांच्या गझलेतील विविधरंग रसिकांना खचितच मोहित करतात.


कारुण्य माणसाला संतत्व दान देते: गझलसंग्रह

गझलकार: श्रीकृष्ण राऊत
8668885288

सूर्यमुद्रा प्रकाशन: नांदेड
पृष्ठे: ८८ मूल्य: १०० रु.

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
sabirsolapuri@gmail.com.
□□
दै. सामना 'उत्सव ' पुरवणी / ११ जुलै २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा