जिंदादिल प्रा. श्रीकृष्ण राऊत

मराठी गझलेचे खलिफा सुरेश भट यांच्या स्मृतीनिमित्त बांधण जनप्रतिष्ठान, मुंबई आणि सुरेश भट स्मृति प्रतिष्ठान, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 'गझलोत्सव २०११’ चे आयोजन ९ जानेवारीला अमरावतीला,सुरेश भटांच्या जन्मगावी होत आहे. सुरेश भटांवर, त्यांच्या कवितेवर, गझलांवर प्रेम करणाऱ्या तद्वतच प्रत्येक अमरावतीकरांसाठी  ही एक अभिमानाची बाब म्हटली पाहिजे. या अभिमानात आणि आनंदात भर घालणाऱ्या काही विशेष बाबी या गझलोत्सवात होत असून त्यातली पहिली बाब म्हणजे एकुणच मराठी गझलेचे, हिन्दी -उर्दू शायरीचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. राम पंडित यांनी संपादित केलेल्या सुरेश भट गौरव ग्रंथाचे, 'गझलोत्सव २०११ ' स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय उर्जा मंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांचे हस्ते होत आहे आणि दुसरा दुग्धशर्करा योग म्हणजे विदर्भातील, महाराष्ट्रातील ख्यातनाम गझलकार, कवी प्रा. श्रीकृष्ण राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार गझलेवर फिदा असणारे रसिक मा. श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात येत आहे. या जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
कवी सुरेश भटांची गझल जेव्हा महाराष्ट्रात झंझावातासारखी पसरत होती, त्यावेळी या झंझावातात झपाटलेल्यांपैकी प्रा. श्रीकृष्ण राऊत आहेत. सुरेश भटांच्या प्रभावळीत परंतु आपला स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या गझलकारांमध्ये प्रा. श्रीकृष्ण राऊत हे एक होत. अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विषयाचा प्राध्यापक असणारा हा माणूस आकडेमोड करता-करता वृत्त आणि
छंदाच्या मोहात पडून आयुष्याचे गणित आपल्या गझलेच्या छंदातून मांडू लागला. मुक्तछंदाचा प्रभाव मराठी कवितेवर असणार्‍या काळात मराठी गझल सुरेश भट यांनी मराठी मातीत,मराठी मनात रूजविली,
फुलविली आणि त्या गझलेल्या प्रा. श्रीकृष्ण राऊत, अरुण सांगोळे, श्रीराम पचिंद्रे, गंगाधर पुसदकर, म. भा.चव्हाणांसारखे
अनेक धुमारे फुटले, सुरेश भटांच्या गझल प्रवासाला पुढे नेण्याचे काम या पिढीने केले. प्रा.श्रीकृष्ण राऊत हे त्यातील बिनीचे नाव म्हटले पाहिजे.
जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकीन्स म्हणजे अलौकिक प्रतिभेचे अद्भूत रसायन आहे. व्हील चेअरवर बसून या वैज्ञानिकांच्या प्रज्ञेने ब्रह्मांडाला गवसणी घातली आहे. अपंगत्वावर मात करून ! प्रा.श्रीकृष्ण राऊत यांची शारीरिक स्थिती ही तितकी वाईट नसली तरी बरीही नाही. पण स्वत:च्या शारीरिक अपंगत्वावर मात करून या कवीच्या प्रतिभेने आपल्या कवितेतून दंभाविरूद्ध उठून उभे राहण्याची जी जिद्द दाखविली आहे त्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. प्रा. श्रीकृष्ण राऊत यांनी आपला ‘गुलाल आणि इतर गझला’ हा गझलसंग्रह 'जीवनाशी सतत झुंज देत जगणार्‍या जगातील तमाम अपंगाच्या जिद्दीला ' अर्पण केला आहे. यावरूनच या कवीची मनोभूमीका स्पष्ट होते.स्वत:च्या आयुष्यातील उणीवांवर रडत न बसता-

‘ज्याला जमले हसणे त्याचे सुंदर झाले जगणे
आले नाही हसता त्यांचे जगणे फसते भाई’

असे जीवनातील आनंदाचे तत्त्वज्ञान हा कवी सांगतो. यापुढेही जाऊन -

‘लाख होउ दे सभोवताली उजाड बागबगीचे,
गाव फुलांचे मनात हसर्‍या अमुच्या वसते भाई’

असा दुर्दम्य आत्मविश्वास या कवीच्या अंतरंगातून प्रकट होतो.व्यक्तीगत
जीवनातील सुख-दु:खाचे सूर या कवीने आपल्या कवितेत आळवले नाहीत असे नाही. ते आळवले आहेतच पण जीवनातील आनंदही प्रा. श्रीकृष्ण राऊतांनी कवितेत तर मांडलाच पण आपल्या प्रत्यक्ष जगण्यातूनही तो अधोरेखित केला आहे. म्हणून प्रा. श्रीकृष्ण राऊत सरांशी भेट म्हणजे एका जिंदादिल माणसासोबत रंगलेली मैफिल असते. चेहर्‍यावर सदैव प्रसन्न भाव, मनापासून प्रगट होण्याची मनस्वी वृत्ती आणि कोणत्याही दंभाला जवळ फिरकू न देण्याचा स्वभाव यामुळे प्रा. श्रीकृष्ण राऊत हा कवी आणि माणूस वाचणार्‍याला आणि भेटणार्‍याला मनापासून भावतो.
प्रा.श्रीकृष्ण राऊत सरांनी कोरकू आदिवासीच्या पारंपारिक मौखिक गीतांचा लोकतत्वीय अभ्यास या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली. वाणिज्यातील पदव्युत्तर पदवी मिळविली. एम.फिल. केले. यावरून त्यांची धडपड आणि ज्ञानसाधना दिसून येते. कवितेच्या आणि गझलेच्या प्रांतात मुशाफिरी करणार्‍या प्रा. श्रीकृष्ण राऊतांचा १९८९ ला ‘गुलाल’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर
२००१ ला ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ हा कवितासंग्रह, २००३ साली ‘गुलाल आणि इतर गझला’ हा गझलसंग्रह, २००३ मध्येच ‘चार ओळी तुझ्यासाठी’ हा गाथासंग्रह प्रसिद्ध झाला.
‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ या कविता संग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा कवी शरच्चंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार, कवयित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार, असे अनेक पुरस्कार प्रा. श्रीकृष्ण राऊतांच्या खाती जमा आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. अंतिम वर्षाला त्यांची ‘जो जो रे’ ही कविता अभ्यासाला असून हैद्राबाद विद्यापीठात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद झाला आहे. साहित्य अकादमीच्या चर्चासत्रातही त्यांनी शोधनिबंध सादर केला.या शिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून त्यांचे लिखाण सतत प्रसिद्ध होत असते. साहित्य विचाराला त्यातही गझलेला वाहून घेणारे प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे व्यक्तीमत्व हे जीवन गौरवासाठी गझलोत्सवात सर्वार्थाने योग्य आहे.जीवन गौरव पुरस्काराने प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचा आशावाद दुणावणारच आहे. कारण परिवर्तनावर
या कवीचा प्रचंड विश्वास आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ ची भाषा हा कवी वेगळ्या शब्दात व्यक्त करतो. आपल्या 'बियाणे ' या कवितेत-

'वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे
तेव्हा कुठे इथेही उगवले पेरलेले’

कवीश्रेष्ठ सुरेश भटांच्या पिढीने जे पेरले ते प्रा. श्रीकृष्ण राऊत यांच्या रूपाने उगवले आहे. त्याफलश्रुतीचाच हा जीवन गौरव आहे. प्रा. श्रीकृष्ण राऊत यांचे पुनश्च अभिनंदन आणि यापेक्षाही कसदार लिखाणासाठी शुभेच्छा.

- डॉ. किशोर फुले

श्री शिवाजी कला व वाणिज्य
महाविद्यालय, अमरावती
( दै. हिन्दुस्थान/ दि.९ जाने. २०११ /जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्ताने )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा