कारुण्य माणसाला संतत्व दान देते : प्रतिभा सराफ



श्रीकृष्ण राऊत यांच्या रचना निर्दोष नि गोळी बंद आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या अनुभवाचे अनुभूती मध्ये संपूर्ण संक्रमण होईतो अभिव्यक्तीच्या मागे लागत नाहीत आणि हा कलात्मक संयम हे त्याचे खरे मर्मस्थान आहे.
     गझलच्या एखाद्या शेराला आतूनच 'वाह' निघावे तसे वसंत केशव पाटील यांनी गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते ' या संग्रहावर लिहिलेल्या ब्लर्बवरही सहजच निघते आणि मग त्यांनी जे लिहिलंय त्याची प्रचिती गझल वाचतानाही नक्कीच येते.
.
एवढी भीती कशाची वाटते ह्या लेकरांना भूत नाही, प्रेत नाही, माणसाचे चित्र आहे (पृ. ८८ )
.
आजच्या काळाचे तीव्र वास्तव एका शेरातून,सहज शब्दकळेतून व्यक्त झाले आहे. नेमका माणूस कसा वागतो की लहानग्यांना आता माणसाचीच भीती वाटते.
 सुरेश भटानंतरच्या पिढीतील बिनीचे गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊतांना आपण ओळखतो. खणखणीत शेर लिहिणाऱ्या राऊतांना पडणारा प्रश्न पहा -
.
किती भेटते गझल खरी
अन् गझलेचे भास किती
(पृ.२५)
निव्वळ चौदा मात्रांची गझल. एकीकडे गझल कृतक होत चालली आहे. याबद्दलचा हा खणखणीत शेर आणि एकंदरीतच गझलमध्ये चौर्यकर्म वाढले आहे त्याबद्दलचा शेरा पहा -
.
सहज मारतो आवडलेले
निपून चोरटा कलेत आहे
(पृ. ५७)
पादाकुलक छंदातील सोळा मात्रांची गझल. अशा छोट्या बहरातील गझला लिहिणे अवघड असते, जे राऊतांना सहल साध्य झालेले आहे.
 प्रेम हा गझलचा स्थायिभाव असला तरी श्रीकृष्ण राऊत राऊतांच्या या संग्रहात समाजभान राखत, गझलच्या माध्यमातून समाजव्यवस्थेवर,  राजकारणावर आणि समाजाच्या मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत -
.
निवडणुकीची शेका पोळी
पहा तापला तवा भयंकर
(पृ. ६६)

किंवा
.
भरल्या घरात अडगळ ती शोभली नसती
वृद्धाश्रमात गेली आई किती शहाणी
(पृ.६७)
 गझल वृत्तावर नुसती हुकमत असणे पुरेसे नसते. वृत्तामध्ये वैविध्य आणि शेरामध्ये गझलियत असणेही आवश्यक असते. 'अक्षरवृत्त ' 'मात्रावृत्त ' अतिशय उत्तम प्रकारे हाताळून राऊतांनी अठ्ठ्याहत्तर गझला लिहिल्या आहेत. त्याच बरोबर चोवीस सुटे शेरहि लिहिले आहेत. श्रीकृष्ण राऊतांना यातील कितीतरी शेरांना घेऊन गझला रचता आल्या असत्या, कारण यात कितीतरी काफिये सहज उपलब्ध आहेत. परंतु त्यांनी हा मोह टाळला, हे कौतुकास्पद आहे.
 'दुतोंडी -प्रसिद्धी गुलामी-निगर्वी ' 'कावा - कित्ता - विद्या ' यांसारखे नवनवीन स्वरांचे काफिये त्यांनी गझलेत वापरले आहेत. आपले अनुभव -विचार - अन्यायविरोधी चीड, नवीन पिढीचे वागणे असे कितीतरी विषय श्रीकृष्ण राऊतांनी आपल्या गझलेतून कधी हझलेतून मांडून समाजाला जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे ; तो स्तुत्य आहे.
 चाळीस वर्षे सातत्याने  गझल लिहून सुद्धा हा त्यांचा दुसरा गझलसंग्रह आहे. पण त्यांची गझल काय आहे, हे काळ ठरवेल ! त्यांच्याच गझलच्या शेरातून
त्यांनी आत्मविश्वासाने  हेच लिहिले आहे, ते रसिकही सहज मान्य करतील -
.
 मिटवीन अक्षरे माझी काळाची हिम्मत नाही
(पृ. ५५)

कारुण्य माणसाला संतत्व दान देते : श्रीकृष्ण राऊत
सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड.पृष्ठे : ८८ मूल्य : शंभर रुपये.

दृष्टिक्षेप- प्रतिभा सराफ
'ललित '
ऑक्टोबर २०१९
■■

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा