दुकान : अभिजीत पाटील

 

श्रीकृष्ण राऊत यांची

 ' दुकान '


ही गझल आज इथे-


दोह्यात जीव नाही ,गझलेत जान नाही ;
शायर जगात दुसरा माझ्यासमान नाही .


चोरून रोज खातो उर्दू मधील लोणी;
सायीवरी मराठी माझे इमान नाही .


गेली हयात सारी वाया तुझी गड्या रे ;
तू एक वाचलेला माझा दिवान  नाही .


गालीब झाडपाला, आहे कबीर कचरा;

माझ्यापुढे अशांची टिकणार शान नाही


आश्चर्य हे मला की झाली न
"अहम् "बाधा
माझ्याशिवाय आता कोणी महान नाही !


तू देणगी दिली ना जाहीर वा छुपीही;
वेड्या,तुला कधीही मिळणार मान नाही .


त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वतःला
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही .


- श्रीकृष्ण राऊत

या गझलेकडे आपण एक उत्तम उपहात्मक गझल म्हणून पाहायला हवे.
एकूणच स्पर्धेत आपण प्रत्येकजण स्वत:ला पुढे रेटायचा जो  प्रयत्न करीत असतो , त्यावर नेमके आणि टोकदार भाष्य ही गझल करते,
आपल्याजवळ आपले म्हणून काही आहे , ते अधिक चांगल्या पध्दतीने मांडायला हवे, उसने अवसान फार काळ टिकत नाही ,आत्मपौढी ,फुशारकी ,अहंकार या गोष्टी तकलादू आहेत , आपली निर्मिती छोटी असेल पण ती आपल्याला आनंद देते, कुणाचे अनुकरण करून किंवा नक्कल करून स्वतःचा चेहरा त्यात आपल्याला शोधता येत नाही , त्यासाठी स्वतःच म्हणून काही अस्सल असावे लागते.
बाजारात स्वतःला विकून चालणार नाही ,
भले आपली निर्मिती छोटी असेल, लहान असेल, पण ती आपली आहे ,त्याला स्वतःच म्हणून एक स्थान आहे , केवळ तंत्र समजून चालणार नाही तर त्यासाठी स्वतःचे शब्द आतून धावत यायला हवेत, अन्यथा हा सारा शब्दबाजार कोरडा राहील  , अशा विवेचनाची ही गझल सध्याच्या स्पर्धेच्या जगात स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते.

आवडलं ते निवडलं या निमित्ताने आपल्या समोर श्रीकृष्ण राऊत याची "दुकान" 
ही गझल ठेवावी वाटली त्या निमित्ताने तुमच्याशी संवादी होता आले,
सदर कविता काव्यमुद्रा संपादनातील संपादक आशुतोष पाटील यांनी संपादीत केली आहे .
असेच काही आवडलं तर ते निवडून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल...

अभिजीत पाटील सांगली
9970188661

'आवडलं ते निवडलं '

ह्या पुस्तकातून 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा