गझल - श्रीकृष्ण राऊतांची : सदानंद डबीर

`गुलाल आणि इतर गझला’ - ह्या श्रीकृष्ण राऊतांच्या गझल संग्रहाबद्दल ऐकलं होतं. कदाचित कु्ठे परीक्षण वाचण्यात आलं असेल, आता स्मरत नाही; कारण संग्रह १९८९ साली प्रकाशित झाला होता. मात्र ‘कविता-रती’च्या दिवाळी अंकात राऊतांची गझल दरवर्षी भेटत होतीच. एकूणच मराठी कविता संग्रहांचं वितरण नीट होत नाही, त्यामुळे इच्छा असूनही, संग्रह वाचता आला नव्हता. अखेर ‘श्रीकृष्ण’ - स्वतःच प्रसन्न झाले ! आणि २००३ साली प्रकाशित झालेली, संग्रहाची दुसरी आवृत्ती, त्यांनी स्वतःच धाडली-२०१० साली! त्यामुळे माझा अभिप्राय तसा ’वरातीमागून घोडं’ - असा झाला आहे; कारण १९८९ ते २०१० या एकवीस वर्षात, श्रीकृष्ण राऊतांच्या लेखन शैलीत निश्चित बदल झालेत. त्यांच्या ‘कविता-रती’ मासिकातल्या गझला उत्तरोत्तर अधिक प्रगल्भ व अधिक तरल होत गेल्या; आणि तसे होणे कु्ठल्याही जातिवंत कवीच्या बाबतीत स्वाभाविकच आहे. (हे वाक्य लिहिण्याचे कारण असे की, मुळात कवीच नसलेली बरीच मंडळी ‘झटपट रचना तंत्र’ शिकून, कृत्रिम व साचेबद्ध मराठी गझला लिहित आहेत. ज्यांना प्रा. पुरुषोत्तम पाटील ‘गझलची बाजारगर्दी’ - असं म्हणतात. असो.)

-तर, आता ’गुलाल आणि इतर गझला’ ह्या संग्रहाबद्दल. ज्याअर्थी ’गुलाल’ गझलचा उल्लेख पुस्तकाच्या शीर्षकात केला आहे, त्या अर्थी कवीची ही सर्वाधिक आवडती गझल असावी. मला मात्र ’आषाढ’ (पृ.१३) व ’सावळी’ (पृ. ७६) ह्या गझला अधिक आवडल्या. ह्या दोन्ही गझलांचे सर्व शेर मस्त जमून आले आहेत-
’आला असा फुलोरा गेली झुकून फांदी
पदरातही लपेना इतका उभार झाला’
हा शेर इष्किया गझलच्या नाजूक-तरलपणाचे, उत्तम उदाहरण आहे. यौवनात पदार्पण केलेल्या सुंदर युवतीचे ’पोट्रेट’ ही गझल रेखाटते. ते प्रत्ययकारी आहे. ही गझलच ’शब्दसरींचा’ ’सुगंधी वर्षाव’ करणारी आहे. ‘यौवनाचा आषाढ’ - कवीने आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने सजीव केला आहे. रसिक त्या वर्षावात पुन्हा पुन्हा चिंब भिजत राहतो.
’हासण्याची दे कला देवा
सोसणे झाले बला देवा’
ही छोट्या बहरची गझल आहे. छोट्या बहर मध्ये गझलियत निर्माण करणे अत्यंत अवघड असते. राऊतांनी ती किमया साध्य केली आहे. ह्या गझलच्या एका शेरात राऊतांनी एक निरीक्षण नोंदवले आहे-ते सहजपणे तात्विक विचार मांडून जातं. - वाचकालाही विचार करायला लावतं. तो ’हासिले-गझल’ शेर आहे-
‘मोडले ना ज्यास दुःखाने
तो सुखाने वाकला देवा’-
‘वा,क्या बात है!’ - असं म्हणायला लावणारा हा शेर आणि ही गझल आहे.
सामाजिक आशय/वक्तृत्वपूर्ण उपरोध, शृंगार/प्रेम, दुःख/वेदना, आणि तत्वचिंतनात्मकता अशा चारही अंगाने श्रीकृष्ण राऊतांची गझल - आणि त्यातले शेर वाचकाला भिडतात. त्याला आपलेसे करून घेतात आणि आपला आशय विनासायास संप्रेषित करतात. सुरेश भटांचा प्रत्यक्ष किंवा पत्ररूप सहवास आणि मार्गदर्शन लाभलेली मराठी गझलकारांची जी पहिली फळी आहे, त्यातले श्रीकृष्ण राऊत हे एक महत्वपूर्ण नाव आहे. प्रारंभीच्या काळात सर्वच मराठी गझलकारांवर भटांचा प्रभाव असणे साहजिक होते-कारण दुसर्‍या कुणाचे ‘रोल मॉडेल’ समोर नव्हतेच. मात्र यथावकाश काही कवींना आपली स्वतंत्र शैली गवसली. त्यातले श्रीकृष्ण राऊत एक आहेत. (दुर्दैवाने काही कवी अजूनही भटांना गिरवित तरी बसले किंवा काही गझला, वा एखाद्या संग्रहानंतर नाहीसे तरी झाले. असो.)

संगीतकार कौशल इनामदार यांची सोबत : ‘लाभले अम्हास भाग्य’


सामाजिक आशयाच्या बर्‍याच गझला ह्या संग्रहात आहेत. सामान्य माणसाचे दुःख - आपल्याच माणसांनी केलेली फसवणूक, -‘तिरडीस तेच माझ्या झाले फितूर वासे’- अबलांवर होणारे अन्याय इ. विषय त्यात येतात. ‘शिकार’ ह्या गझलेत राऊत म्हणतात-
’अभिजात तोतयांनी केली हवेत भेसळ
माझ्या मुक्या चुलीच्या देहात रक्त नासे.’
ह्यातला ’अभिजात तोतया’ हा शब्द प्रयोग जमून आला आहे. ‘प्रसंग’ ह्या गझलेतला शेर -
‘घेऊन ते मशाली येतील जाळण्याला
लाक्षागृहात आता खोदा भुयार आधी’
‘लाक्षागृह’ ह्या प्रतिमेने हा शेर थेट महाभारताशी संबंध जोडतो आणि आजही समाजात “सज्जन’ पांडवांवर कौरव कसे अन्याय करतात (जीवावर उठतात) - ते कमीत कमी शब्दात प्रभावीपणे सांगतो. चांगल्या शेराची हीच तर कसोटी असते.
‘औषधी’ गझलेतला हासिले-गझल शेर आहे-
‘जसा तो बोलतो आहे तसा तो चालला नाही
तुकारामास नव्हता रे कुणीही पाठचा भाऊ’
हा शेर थेट मनात उतरतो. मंबाजींनी भरलेल्या समाजात पुन्हा तुकाराम झालाच नाही!
ह्या संग्रहात नसलेली, पण मी वाचलेली ’दुकान’ ही गझल, वाङ्मयचौर्य करणार्‍या कवीवर उपरोधपूर्ण हल्ला चढवते. ह्या संग्रहातल्या ‘भोवताल’ गझलमध्ये त्याचे सूचन झालेले आहे. तो शेर असा-
’ऐकवू नकोस तू तुझी नवी नवी गझल
भोवताल मंडळी इथे महान चोरटी!’
आपलं जगणं दिवसेंदिवस यांत्रिक होते आहे. येणार्‍या दिवसांबद्दल कवी म्हणतो -
’काव्य रचतो संगणक अन् यंत्रमानव दाद दे
दूर नाही वेळ ऐसी, दूर हो रसिका जरा!’
सध्याची एकूणच विदारक अवस्था वर्णन करताना कवी म्हणतो-
’फाटून नष्ट झाला मागे कधीच झेंडा
हा उंच भीकमाग्या नुसताच हात आहे.’
असे असले तरी कवी निराश झालेला नाही. अंधारावर मात करायची जिद्द हरलेला नाही. तो म्हणतो-
‘नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या
मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या’
मंगेश पाडगावकरांनी आपल्या पत्रात-’’चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची शक्ती तुमच्या शैलीत आहे.’’ अशी जी दाद दिली आहे ती यथार्थ आहे.
सामाजिक वर्तनातली विसंगती टिपतांना - वटपूजेच्या संदर्भात, राऊत म्हणतात-
‘कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरुच पूजा
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते’
सौंदर्यासक्ती आणि अभिजात शृंगार अनेक गझलांतून मुखर झालेला आहे. ‘ओठ’ ह्या गझलेतला शेवटचा शेर पहा-
‘स्पर्श सांगती स्पर्शांना अन् डोळे वदती डोळ्यांना
अशा घडीला मूक राहुनी फक्त पहावे ओठांनी’
’रक्त’ गझल शृंगारिक सुरूवात करते खरी, पण मुसलसल न होता - दुःख वेदनांची मांडणी करत जाते. ह्या गझलेचा पहिला आणि शेवटचा शेर लक्षणीय आहेत.
’गोर्‍या तुझ्या रुपाने भलती कमाल केली
बघण्यास आरशाला दृष्टी बहाल केली.’
तर शेवटचा शेर आहे-
‘समजू नकोस पडला पाऊस कुंकवाचा
मी रक्त शिंपडोनी ही वाट लाल केली.’
फसलेल्या प्रेमाचा सल ही, राऊत सहज सांगून जातात. तो असा,
‘नाव आता तिचे तू विचारु नको
जीव गेल्यावरी बाण मारू नको’
दुःख, वेदना, वंचना, हा म्हटलं तर मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. राऊतांच्या संग्रहात ही भावना मुखर करणारे अनेक दादलेवा शेर जागजागी भेटतात. वानगीदाखल फक्त चार शेर नमूद करतो. आशय इतका थेट आहे की, त्यावर की काही मल्लीनाथी करायची आवश्यकताच नाही.
‘अर्ध्यात संपलेल्या समजून घ्या कहाण्या;
मध्येच फाडलेल्या आहेत खूप गोष्टी (पृ. २०)

‘डोळ्यात वीज माझ्या, ओठावरी निखारे
माझ्या उरात ताजे हंगाम पेटलेले’ (पृ. २१)

‘हुंदक्याचे फूल काढी अंतरंगी स्वस्तिके;
आज दिंडी आसवांची येत आहे लोचना.’ (पृ. ३९)

‘दुःखात नाचणार्‍या असतील खूप वेश्या
माझ्यातरी व्यथेच्या पायास चाळ नाही.’ (पृ. ५४)
जीवन विषयक चिंतनाचे शेरही, राऊत ताकदीने लिहितात-
’जीवना रे मला त्रास ह्याचाच की
कोणताही तुझा त्रास नाही खरा.’
सर्वच मायावी आहे. ’त्रास’ सुद्धा ! हा प्रगल्भ विचार आहे. आणि अंतिम सत्य हेच की-
‘तुझी वाट नाही जगावेगळी रे
पहा सर्व वाटा मिळाल्या स्मशानी’!
असो. अनेक शेर उद्धृत करता येतील. पण कु्ठेतरी थांबायला हवे. १९८९ साली प्रकाशित झालेला हा संग्रह मी २०१० साली वाचला आणि नमूद करायला आनंद होतो की २१ वर्षांनंतरही ह्या गझलांची वाचनीयता ‘टवटवीत’ आहे ! काळानेच, श्रीकृष्ण राऊतांना दाद दिलेली आहे. ह्याहून अधिक काय हवे? श्रीकृष्ण राऊतांच्या लेखणीला नवे धुमारे फुटत राहोत ही शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा