शब्द झाले प्रार्थना : गझलगंधर्व सुधाकर कदम



१९७५ ते २०१० या साडे तीन दशकात मराठा गझलाने महाराष्ट्राला समृध्द केले़ गझल हा काव्य प्रकार मराठीत आणण्याचे खरे श्रेय माधव ज्युलियन यांना जाते़ उगाच ओढून-ताणून मोरोपंत-अमृतराय ह्यांच्यापर्यंत ही नाळ ताणण्यात काही अर्थ नाही़. कारण त्यांच्या ज्या काही गझलसदृश रचना आहेत त्या त्यांनी गझल म्हणून लिहिलेल्या नाही़त. उगीच वडाची पारंबी पिपंळाला चिटकवण्यात काही अर्थ नाही़. असो़,तर, माधव ज्युलियनांनी गझल मराठीत आणली, सुरेश भटांनी रुजवली, वाढवली, सुरेश भटांनंतर गझल लिहीणार्‍यांची एक पिढी तयार झाली़. त्यात विदर्भातील श्रीकृष्ण राऊत हे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते़. त्याला मी नेहमी
श्रीकृष्णा म्हणतो़. श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कधीच भटांच्या मागे-मागे फिरला नाही़. त्याने भटांचा इस्लाह पण घेतला नाही़. स्वतः गझलच्या तंत्र-मंत्राचा अभ्यास करुन स्वतःची शैली
विकसित केली़.
श्रीकृष्णाला शालेय जीवनापासूनच वाचनाची व कविता करण्याची आवड होती, तो ज्या वातावरणात वाढला, मोठा झाला त्या वातावरणातील अज्ञान, अंधश्रद्धा, रुढीप्रियता पाहून वेदना होणे सहाजिकच आहे़. त्यामुळेच त्याच्या गझलांमध्ये यावर तीव्रपणे प्रहार केलेला आढळतो. जी व्यक्ती अथवा समाज जाचक रूढी, चालीरीती, अज्ञान यामध्ये गुरफटतो त्याची नेहमीच दुर्दशा होते. परावलंबत्व येते़. ह्या रुढी त्याला स्वावलंबी होऊ देऊ देत नाही़त. उत्कर्षाचा मार्ग नेहमीच खडतर, अवघड असतो़. हा मार्ग पार करायचा असेल तर अंगावरील रुढींचे सारे पाश आणि दुबळ्या विचारांचे दोरखंड तोडूनच वाटचाल करावी लागते़. ही बाब शिक्षण घेत असतांनाच श्रीकृष्णाच्या लक्षात आली़. त्यानुसार त्याने स्वतःला घडविले़. ह्या गोष्टीचा त्याला योग्य अभिमान असला तरी दुराभिमान नाही. समाजात ज्या नीती - कल्पना, परंपरा चालत आल्या त्या सदैव कल्याणकारीच असतात असे नाही हे त्याने बरोबर हेरले होते. त्याचे प्रतिबिंब गझलांमधूनही ठळकपणे दिसून येते. बालपणापासून ग्रामीण भागातील शेतकरी-कामकरी वर्गात वाढल्यामुळे त्याला या वर्गाची विचारसरणी प्रामाणिक आणि जवळची वाटल्यामुळे त्याचाही
प्रभाव श्रीकृष्णाच्या गझलांवर पडलेला दिसतो़
वस्तुस्थितीला सरळ जाऊन भिडणे आणि आलेल्या अनुभवाची संगती लावून स्वतःला बदलणे त्याला जमले आहे़. सुरुवातीच्या काळात भक्तिगीते, भावगीते, लावण्यापासून गझल पर्यंतचे सर्व प्रकार सक्षमतेने त्याने हाताळले़. कोरकूलोकगीतांवर
शोधप्रबंध लिहिला़.‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ज्न्म घेणार्‍या तान्ह्या मुला’ हे दीर्घ काव्यही लिहिले प्रत्येक काव्यरसिकाने ते वाचलेच पाहिजे.त्याच्या ‘राघू मैना’ चित्रपटातील ‘ठिणग्या ठिणग्यांची घुंगर बांधून, ह्या लावणीचे विश्वनाथ मोरे आणि आशा बाईनी सोने केले़ आहे.आता ह्या चित्रपटाची सीड़ी़ उपलब्ध आहे़ काव्यातील सर्व प्रकार हाताळूनही श्रीकृष्णा रमला तो मात्र गझलमध्येच. गझल म्हणजे वृत्त, अलंकार, आशय आणि तंत्र याचा संस्कारित मार्ग समजून त्याच्याशी समरसून जाण्याची वृत्ती होय़. गझल म्हणजे स्वतःला मुरवत मुरवत मुरणे होय़. हे कष्टसाध्य आहे़. पण हे कष्ट घेताना त्यातल्या निर्मितीचा जो अपूर्व आनंद मिळतो त्याला तोड नाही़. हा आनंद नेहमी मिळावा यासाठी तर श्रीकृष्णा गझल लिहीत नसेल? ते काहीही असले तरी हे मात्र खरे की त्याचे गझलवर प्रेम आहे! त्याची गझल माधव ज्युलियन आणि सुरेश भट यांच्याशी नेहमी संवादी राहिली आहे. माणसांविषयी आणि माणसांसाठीच आपण लिहितो हे तो कधीच विसरत नाही़. जगताना जे काही बरे वाईट अनुभव येतात त्याचा सजीव आविष्कार, त्यातील संघर्ष याचं कलात्मक आणि यथार्थ चित्रण म्हणजे गझल होय़. आपले दुःख आपल्याजवळ ठेवून लोकात आनंद वाटण्याचे शहाणपण त्याला जगण्याने शिकवले,त्यातूनच गझल निर्मिती झाली़. चारचौघांसारखे साधेपणाने जगून प्रगल्भ काव्य कसे करावे याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण राऊत! सोपी भाषा, सोपी उदाहरणे देऊन आपले म्हणणे मांडण्याची शैली त्याने संत तुकारामांकडून घेतली़.
प्रचंड कष्ट, शारीरिक व्याधी, सामाजिक संघर्ष अशा अनेक अडचणीत सौ.उषा वहिनीनी त्याला खूप प्रेमाने सांभाळले़. त्याच्यातील कवी जागता ठेवला़. लहान मुलाप्रमाणे त्याची काळजी घेऊन कलावंताला पोषक असे वातावरण कायम ठेवले़. यासाठी त्या माऊलीचे आभार मानावे तितके थोडेच आहेत़.
संसार, मुलेबाळे, नोकरी, येणारे जाणारे अशा व्यापातही नवोदित गझलकार तरुण-तरुणींना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करीत गेल्यामुळे त्याचा गोतावळा खूप वाढला़.
अभ्यासक्रमाबाहेरील सांस्कृतिक शिक्षण येथे मिळत गेल्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक गझलकार आज प्रसिद्धीच्या झोतात आहेत, दमदारपणे लिहीत आहेत. वास्तवाचं भान ठेऊन कसे जगावे,पाय जमिनीवरच कसे ठेवावे, यशापयशाचा विचार न करता
आपल्यातले उत्तमोत्तम लोकांना कसे द्यावे याचा परिपाठ आपल्या वागण्याद्वारे श्रीकृष्णाने दिला आहे़.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार नामदेव कांबळे यांच्याकडून सत्कार स्वीकारताना


श्रीकृष्णाला मी गेल्या चाळीस वर्षापासून ओळखतो़. अजातशत्रू एवढाच उल्लेख त्याची ओळख करून देण्यास पुरेसा आहे़. सध्याच्या जगातील जीवघेणी स्पर्धा, आकांक्षा,असूया, डावपेच यापासून अलिप्त राहून कायम उत्साही, आनंदी व सगळ्यांशी आंतरिक जिव्हाळ्याने वागण्याचे त्याचे ब्रीद वाखाणण्यासारखे आहे़. अतिशय हाल अपेष्टा सोसत शिक्षण घेतले़.नोकरी लागली. आता जीवनात आनंदी आनंद भरेल असे वाटत नाही तोच त्याच्या पायाच्या दुखण्याने पुन्हा तोंड वर काढून हा आनंदही हिरावून घेतला़. पण शारीरिक व्यथा झेलतांनाही त्याच्या चेहर्‍यावरचे हास्य मात्र कधीच लोप पावले नाही़. प्रत्यक्ष भेट असो, दूरध्वनीवरील संभाषण असो, आवाज खणखणीत. चेहरा हसरा, मिश्किल बोलणे, हलका फुलका विनोद करून वातावरणात जिवंतपणा आणून मुक्तपणे हसणे, नवीन काही ऐकवणे़. ह्या सगळ्यात आपली व्यथा लोकांना दिसणार नाही़.ह्याची तो काळजी घेतो.आपल्या व्यथांना समजावताना
तो म्हणतो़-
‘व्यथे तू जराशी अता हो शहाणी;
नको आठवू तू पुन्हा ती कहाणी’

श्रीकृष्णा व्यथेला शहाणी होण्याचे सांगत असताना दुसरीकडे -
‘दुःख माझे देव झाले’ असेही म्हणतो़. दुःखाला देवत्व बहाल करून ते स्वीकारणे हे खंबीर मनाचा माणूसच करु शकतो. त्यामुळे ना़घंऩी म्हटल्याप्रमाणे या कवीची मनोभूमिका शोकात्मक आहे,या विधानाशी मी सहमत नाही़ कारण दुःखाला देव मानून त्याचे स्वागतच नाही तर पूजा करणार्‍या माणसाची मनोभूमिका शोकात्मक राहूच शकत नाही़ उलट परिस्थितीशी लढण्याची, दुःखाला सामोरे जाण्याची खंबीर भूमिका अशी माणसे घेतात़. दुसरे असे की प्रचंड शारीरिक वेदना होत असतानाही त्याने आपले दुःख लोकांना दाखविले नाही किंवा आपल्या दुःखाचे भांडवल करुन दुकानदारीही मांडली नाही़.

‘दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी वेदना.’

(गझलगंधर्व सुधाकर कदम यांच्या स्वरात ऐका :

‘दु:ख माझेच देव झाले’ ही श्रीकृष्ण राऊत यांची गझल-)


ही गझल मी मा्झ्या प्रत्येक कार्यक्रमात गात असे. १९८१ मध्ये कोल्हापूरला झालेल्या एका कार्यक्रमात तेथील सुप्रसिद्ध गायिका करवीरकोकिळा रजनी करकरे उपस्थित होत्या़. त्यांना ही रचना इतकी आवडली की त्यांनी ती माझ्याकडून शिकून घेतली. तशा माझ्या बर्‍याच रचना त्या गायिल्या परंतु अपंगांकरिता काम करणार्‍या नसिमा हुरजुक पीड़ी़देशपांडे आणि रजनी करकरे ह्यांनी ‘दुःख माझे देव झाले’ चा प्रार्थनेसारखा उपयोग करणे सुरू केले़. यातच श्रीकृष्णाच्या लेखणीचे मर्म सापडते़.

दुःख माझे एक राधा, एक मीरा आणखी;
व्याकुळांच्या गोकुळी मी करु कशाची वंचना?’

‘हे दुःख झेलताना झालो विराट इतका
पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती.’

‘निखार्‍यातून दुःखाच्या सुखाने चालतो आता
हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता.’

वरील शेर दुःखाला गोंजारणारे नाहीत़ तर आव्हान देणारे आहे़. एका ठिकाणी तो म्हणतो

‘तुला जर प्रेम आहे तर उरी कवटाळ जखमांना
असा लांबून काडीने नको तू औषधे लाऊ.’

यावरुन समजणार्‍यानी काय ते समजून घ्यावे़.मनोहर रणपिसे म्हणतात़
‘दुःखाशी नाते जडता जडता जडते
हे मैत्र अनोखे घडता घडता घडते.’

असे मैत्र घडल्यावरच़-
‘तुझी वाट नाही जगावेगळी रे;
पहा सर्व वाटा मिळाल्या स्मशानी.

अशा अंतिम सत्यदर्शन घडविणार्‍या ओळी जन्म घेतात़. भीषण वास्तवाला सामोरे जाऊन तोंड द्यावे लागल्यामुळे त्याचे लिखाण ए़सीरुममध्ये बसून दुष्काळी परिस्थितीवर किंवा शेतकर्‍यांच्या मृत्यूवर लिहिलेल्या लिखाणासारखे पोचट नाही़. जळजळीत सत्य समोर आणून त्यावर कोरडे ओढणार्‍या खालील ओळी बघा़-

‘केली होती जरी परीक्षा गर्भजलाची;
चौथ्यानेही मुलगी होऊन डसली चिंता.’

‘ज्याने न कापसाचे विकलेत बोंडही
वटवून घेत आहे तो चेक भामटा.’

‘पिंडदानादी विधींनी घाण केली;
छान होता या नदीचा घाट राजा.’

‘मी स्पष्ट बोलणारा, मी न्याय मागणारा
डोळ्यात हीच त्यांच्या माझी सले मुजोरी.’

‘ऐकून शुभ्र ख्याती येऊ नका बघाया
बंबाळ घाण येते त्या सभ्य कोपर्‍याला.’

यातील ‘बंबाळ’ हा शब्द ‘सभ्य’ कोपर्‍याला कळला असेल का ?

‘पोथीत पेरती हे संदेश लाचखाऊ;
आत्म्यास राहण्याचे हे मागतात भाडे.’

‘कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पूजा;
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते.’

या सगळ्यात मला गायक म्हणून भावलेला श्रीकृष्णा वेगळाच आहे़. माझ्या कार्यक्रमातील ‘दुःख माझे़’ इतकीच कदाचित जास्ती लोकप्रिय असलेली ‘लाजली पौर्णिमा लोंपला चंद्रमा,चांदण्यानी तुझा चेहरा पाहिला’ही गझल टाळ्या-शिट्यांसह दाद घेऊन वन्समोअर घ्यायची, याचे श्रेय माझ्या चालीपेक्षाही श्रीकृष्णाच्या शब्दांना जाते़. अशीच दुसरी गझल आहे़-

लाजून चांदण्यांनी केला तुला इशारा
गंधात न्हात आहे रे असमंत गोरा.’
यातील दुसर्‍या ओळीत असलेला ‘गोरा’शब्द मला खटकल्यामुळे त्या ऐवजी ‘सारा’हा शब्द टाकावा किंवा टाकायला हवा असे मी म्हणालो़. पण त्याने हे ऐकले नाही़. ‘गोरा’हाच शब्द योग्य आहे असे म्हणून त्याने विषय संपवला़.
श्रीकृष्णाच्या ‘तुझ्या गुलाबी ओठांवरती’, ‘सांगू कशी फुलांचा देठास भार झाला’,‘गोर्‍या तुझ्या रुपाने भलती कमाल केली’ ,‘तसा न चंद्र राहिला,‘लाजू नको फुला रे मिटवून पाकळ्या रे’,‘वळणावरुन तूही जाशील दूर राणी, ‘भेटली तू मला वादळासारखी’,‘ना झोपतो ना जागतो,या रचनांमध्ये प्रेम, विरह, श्रृंगार वगैरे सर्व रसांच्या छटा बघायला मिळतात़
काही गझलांमधील त्याची विषयाची मांडणी आणि त्याला अनुरूप भाषा ज्वलंत पण आकर्षक आहे़ त्यात परिहास व उपहासाचा सुरेख वापर करून बारीक चिमटेही घेतले आहेत़. ‘मंबाजी’ या गझलमध्ये हे प्रकर्षाने जाणवते़.
‘निर्माल्य जीवनाचे शोधू कुठे, कसा मी ?
पाण्यात सोडलेल्या आहेत खूप गोष्टी!’

असे म्हणणार्‍या श्रीकृष्णाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्या जात आहे़ ही त्याच्या गझल क्षेत्रातील योगदानाची पावती होय़. ह्या ‘देखण्या व्यथेच्या ऐनेमहालाला’ माझा सलाम करतांना आज तीस वर्षानी मी पुन्हा गुणगुणू लागलो़-

‘दुःख माझे देव झाले, शब्द झाले प्रार्थना ;
आरती जी गात आहे तीच माझी वेदना.’
______________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा