श्रीकृष्ण राऊत यांची ग़ज़ल_एक आशयघन रसानुभव_डॉ. राम पंडित

‘कविता-रती’ ह्या केवळ कवितेला वाहिलेल्या द्वैमासिकाचा जाने.-फ़ेब्रु.१५ चा अंक कालच मिळाला.त्या अंकातील डॉ.राम पंडित यांचा लेख-
_______________________________________________________
हिन्दीचे प्रतिभावान ग़ज़लकार दुष्यंतकुमार ज्याप्रमाणे केवळ पन्नासेक ग़ज़लसृजनाच्या बळावर आपले स्वतंत्र स्थान राखून आहेत, त्याचप्रमाणे राऊत यांनीही प्रदीर्घ कालावधीत साठ-सत्तर वाङमयीन मूल्य असलेल्या ग़ज़ल सृजनाद्वारे आपली स्वतंत्र ओळख मराठी ग़ज़लक्षेत्रात निर्माण केली आहे. ज्येष्ठ मराठी कवी व साहित्यिक कुसुमाग्रज,  ना. घ. देशपांडे, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर सारख्यांनी राऊत यांच्या ग़ज़लांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. याला कारण राऊत यांच्या ग़ज़लेतील मौलिकता व अनुभवाधिष्ठित अभिव्यक्ती होय
_______________________________________________________

ग़ज़ल हा एक तंत्रानुगामी आकृतिबंध आहे हे सत्य नाकारण्यात काही अर्थ नाही. ग़ज़लेतील शेराबाबत दोन संज्ञा प्रचलित आहेत. आमद व आवुर्द, आमद म्हणजे उत्स्फूर्तपणे साकारणारा शेर व आवुर्द म्हणजे क्राफ्टमनशीपच्या अंगाने जाणारा कृत्रिम शेर. बहुसंख्य ग़ज़लात आमदचे शेर एक दोनच असतात त्यानंतर वृत्त काफिया यांच्या सहयोगाने ग़ज़लकार गणपूर्तीसाठी शेर रचतात यांना आवुर्दचे शेर म्हणतात. पण ग़ज़लकाराचे कौशल्य यातच असतं की त्याने आपले आवुर्दचे शेर देखील आमदचे वाटावेत. मोजक्याच मराठी ग़ज़लकारात हे नैपुण्य आढळतं. ग़ज़लला उर्दू समीक्षक डॉ. कलीमुद्दीन अहमद यांनी ‘नीम-ए-वहशी-सिन्फे-सुखन’ म्हणजे हा ‘अर्धश्वापद काव्यप्रकार’ संबोधले आहे ते याचमुळे. काही ग़ज़लकार मंडळी दर वर्षाला शंभर ग़ज़लांचा रतीब घालताहेत. हे पाहून वाचक/श्रोते खर्‍या ग़ज़लेची देखील उपेक्षा करतील असे वाटू लागले आहे, हेही खरे की खरा काव्यरसिक दर्जेदार ग़ज़ल कोणती व खरा ग़ज़लकार कोण हे जाणतो.
श्रीकृष्ण राऊत यांच्या ‘गुलाल आणि इतर गझला’ संग्रहातील एकोणसत्तर ग़ज़लांची अधिकृतता कोणताही रसिक प्रमाणित करेल. या ग़ज़लांचा सौंदर्यानुभव, त्यातील अर्थपूर्ण अभिव्यक्ती व किंचित प्रतिकात्मक असूनही संप्रेषणीय होणार्‍या कल्पना विचारात दडलेला आहे. कसा तो पहा-

घेऊन ते मशाली  येतील जाळण्याला;
लाक्षागृहात आता खोदा भुयार आधी.

महाभारतातील पांडवांच्या अज्ञातवासाचा एक प्रसंग आधुनिक संदर्भात किती प्रत्ययकारी शब्दात मांडला आहे.तसेच-

नाहीत शिष्य भोळे ते एकलव्य आता;
द्रोणास शक्य नाही शास्त्रोक्त भव्य डाका.

कलात्मक मर्मदृष्टी असलेल्या साहित्य रसिकाला यातील आशयाची सखोलता व विस्तृतता सहज कळेल. हीच ग़ज़लेची आंतरसंरचना होय. हीच ग़ज़लीयत होय.
माधवराव पटवर्धनांनी ग़ज़ल ही काव्य विधा मराठीत आणली तिला अनुरूप असे जवळपास शंभर अरबी-फारसी वृत्ते ‘छंदोरचने’द्वारे मराठीत परिवर्तीत करून म्हणजे त्या स्वरानुगामी छंदांना मराठीत लघु-गुरू वर्णप्रणालीत बसवून, नामकरणासह स्थापित केले. ही गणांच्या सलग आवर्तनांची वृत्ते/छंद काव्यसृजनास सुलभ व गेय होती. मराठी कवींनी त्याचा वापरही बराच केला पण ग़ज़ल ही विद्या मात्र त्यावेळी मराठीत फारशी तग धरू शकली नाही. कारण माधवरावांनी तिचे स्वरूप भावगीतांजवळ नेले तसेच तिचे एक यमकी स्वरूप, ग़ज़लेच्या शेरातून होणारे विषयांचे मार्गांतरण अन ग़ज़लेचे तंत्रानुसरण मानले गेले.
खर तर पद्य हे गद्यापासून विलग होते ते त्यातील गेयतेमुळे,लयबद्घतेमुळे, त्यातील छंदानुशासनामुळे; हे आपण विसरत चाललोय.छंदोविहीन कवितेला गद्य कवितेला, ‘काव्यात्मक गद्य’ संबोधणे जास्त सयुक्तिक ठरेल.शेरातील विषयांच्या वैविध्याने उर्दू रसिक वाचक/श्रोत्यांना रसोभंग जाणवत नसला तर तो प्रदीर्घ परंपरेचा परिणाम म्हणावा लागेल. मराठी काव्य रसिकांची अशा विषयांतरणाची आस्वादकवृत्ती अलिकडेच वाढीस लागली आहे. भटांच्या नंतर ज्या मोजक्या ग़ज़लकार कवींनी अशा विविध विषयांवरील शेरांच्या लक्षणीय ग़ज़ला लिहिल्या, त्यात श्रीकृष्ण राऊत यांचे नाव अग्रक्रमाने निश्चितच घ्यावे लागेल.

हिन्दीचे प्रतिभावान ग़ज़लकार दुष्यंतकुमार ज्याप्रमाणे केवळ पन्नासेक ग़ज़लसृजनाच्या बळावर आपले स्वतंत्र स्थान राखून आहेत, त्याचप्रमाणे राऊत यांनीही प्रदीर्घ कालावधीत साठ-सत्तर वाङमयीन मूल्य असलेल्या ग़ज़ल सृजनाद्वारे आपली स्वतंत्र ओळख मराठी ग़ज़लक्षेत्रात निर्माण केली आहे. ज्येष्ठ मराठी कवी व साहित्यिक कुसुमाग्रज,  ना. घ. देशपांडे, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर सारख्यांनी राऊत यांच्या ग़ज़लांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. याला कारण राऊत यांच्या ग़ज़लेतील मौलिकता व अनुभवाधिष्ठित अभिव्यक्ती होय. उदा.

पंचांग सांगते की होईल खूप वर्षा;
नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले.

जे मान्य पावले ते संपूर्ण सत्य नाही;
बाहेर येत आहे त्यातील पोल काही

संन्यास घेतल्याने बाहेर जिंकलो पण,
आतून वासनांनी हळुवार चाल केली.

 मंगेश पाडगावकरांनी राऊत यांना जे पत्र प्रस्तावनास्वरूप ‘गुलाल आणि इतर ग़ज़ला’ या संग्रहात लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘गझलला प्रेरणा देणारी एक मध्यवर्ती किंवा केंद्रवर्ती भूमिका असते. ही भूमिका म्हणजे निवेदन करणारा एक ‘मी’ असतो. या ‘मी’चे घटक असे: हा ‘मी’ संवेदनशील, उदात्त, दंभाची-असत्याची चीड असणारा, लौकिक हपापाने स्वार्थामागे न धावणारा, जीवनातील श्रेष्ठ मूल्यांवरील श्रद्घेमुळे एकाकी पडलेला आणि एकूण संदर्भात अवतीभवतीच्या जगाकडे काहीसे चिडून पाहणारा.एक प्रकारचे उदात्त दु:ख या ‘मी’ च्या वाट्याला येत असते. (आणि पुष्कळदा हे दु:ख तो काहीशा आत्मकेंद्रित समाधानाने कुरवाळीत बसलेला असतो.)
हे खरे की ग़ज़लकार हा निवेदक असतो, पण ग़ज़लेतला ‘मी’ हा ग़ज़लकार नसतो(जसे कथा, कादंबर्‍यातील निवेदक ‘मी’ हा स्वत: कथाकार अथवा कादंबरीकार नसतो.) ग़ज़लेतील ‘मी’हा वाचक,श्रोते एवढेच नव्हे तर समग्र समष्टीचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्याच्याद्वारे प्रतीत होणारे उपरोक्त नैतिक गुण, ग़ज़लकार अनुभव, अवलोकन इत्यादींद्वारे लेखणीबद्घ करतो. आत्मकेंद्रिता तर कवितेत व कवींतही प्रचुर मात्रेत आढळते. राऊत तर म्हणतात-

आत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसे
त्यात नाही स्पष्ट आता दु:ख माझे फारसे

राऊतांच्या ग़ज़लेतील दु:ख व्यक्तिगत नसून व्यापक रूपाने समुदायाचे बनते. तुकारामाला संबोधित केलेली ग़ज़ल वाचक व श्रोत्यांना आत्माभिव्यक्तीच वाटते-

तुकारामा, अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा,
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी!

हा शेर माझ्या वक्तव्याची साक्ष देईल.

श्रीकृष्ण राऊतांच्या शैलीत विसंगती व उपरोध जो आढळतो तो समाजाच्या ‘भोगा हुआ यथार्थ’ची समानानुभूती आहे.ग़ज़लमधे विरोधाभास, विलापिका अनिवार्य असते अशी काहींची धारणा आहे. हा अपसमज राऊतांच्या काही प्रणयरम्य ग़ज़ला दूर करू शकतील.

गोर्‍या तुझ्या रूपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरश्याला दृष्टी बहाल केली.

तू राहतेस हल्ली कोण्या भ्रमात पोरी;
वैरीण होत आहे काया तुझीच गोरी.

दु:ख देखणे तुझे,देखणा वसंत तू
घाव सांगतात ना आज ही पसंत तू.

विषयानुरूप शब्दयोजना अन लयात्मक वृत्त/छंदाची सहज योजना ही राऊतांच्या ग़ज़लेची वैशिष्ट्ये म्हणता येतील. याचमुळे या ग़ज़लांचे संगीतमूल्य वाढले आहे. ग़ज़लेतला स्वानुभव संक्रमित होऊन सर्वव्यापक व्हावयास हवा अर्थात हे कवीच्या चिंतनशक्तीवर अवलंबून असते. हा प्रतिकात्मक शेर किती अर्थ वैविध्याने साकारला आहे पहा-

पर्णात ओल नाही, झाल्यात जीर्ण शाखा;
वृक्षावरी युगाच्या लावा नवी पताका.

याने राऊतांच्या प्रातिभदृष्टी व कलात्मक मनोवृत्तीची कल्पना येते. अनेक संदर्भात हा शेर समर्पक ठरेल. समकालीन ग़ज़लेस कोणताही विषय वर्ज्य नाही. त्यामुळे ती आशय व अभिव्यक्तीच्या दृष्टीने वर्तमान कवितेबरोबर प्रवास करीत आहे. मात्र छंद, रदीफ, काफिया इत्यादी कलात्मक अपरिहार्यतेमुळे व प्रतिभावान ग़ज़लकारांच्या कमतरतेमुळे तिचा प्रवास धीमा आहे. हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच ग़ज़लकार भिडणारी ग़ज़ल लिहिताहेत त्यात मी श्रीकृष्ण राऊत यांचा समावेश करेन. त्यांचे काही शेर पहा किती समकालीन काव्यानुभूतीचे द्योतक आहेत-

रात्र उंदिरापरी काळजास कुरतडे
अन्‌ सुळावरी जसा रोजचा सरे दिवस.

उल्लेख टाळलेल्या आहेत खूप गोष्टी;
शास्त्रोक्त गाळलेल्या आहेत खूप गोष्टी.

एकांताच्या कुशीत सगळे विदुषक रडती,
सर्कशीस ह्या विषण्णतेने हसली चिंता.

जखमेस न्याय आता सांगा कसा मिळावा?
सामील रक्त झाले निर्ढावल्या सुर्‍याला!

हे शेर वाचल्यावर मी इथे ना. घ. देशपांडे यांच्या पत्र प्रस्तावनेतील (‘गुलाल आणि इतर गझला’ पृष्ठ सहा)चार ओळी उद्‍धृत करतो-
"या कवीची मनोभूमिका शोकात्मक आहे. जगाने या कवीवर अन्याय केला आहे. अशी त्याची तक्रार आहे. या भावनेने हा संग्रह भारलेला आहे." मी उदाहरणार्थ दिलेल्या समग्र शेरांवरून तरी ना. घं.च्या मताशी सहमत होणे कठीण आहे.
राऊतांच्या ग़ज़लेत काही ठिकाणी असलाच तर विषाद, खेद आहे तोही युगप्रवृत्तीच्या अनुषंगाने आला आहे. शोकात्मता विलापिकेत असते. उलट ते -

निखार्‍यातून दु:खाच्या सुखाने चालतो आता;
हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता.

असा सकारात्मक निर्धार व्यक्त करतात.

राऊतांसारखा संवेदनशील ग़ज़लकार जेव्हा तरल ग़ज़ल सृजनाकडे वळतो तेव्हा त्यांची एरव्ही किंचित लाऊड वाटणारी शब्दकळा (डिक्शन) देखील गीतांशी भावसाहचर्य साधते ती अशी-

स्पर्शात मोर आले, अंगांग फूल झाले;
नाजूक पाकळ्यांचा, फुलतो हळू पिसारा.

चुकवू किती सरींचा वर्षाव हा सुगंधी;
आषाढ यौवनाचा जर जाणकार झाला.

प्रत्येक पाकळीला मी व्यर्थ प्रश्न केले;
मी श्वास घेतला अन गंधात तू मिळाला.

वरील मोहक द्वीपदी ग़ज़लेप्रमाणे गीताच्याही वाटतात. ग़ज़ल हा आकृतिबंध शृंखला-पद्य असून त्यात कवितेची आशयगर्भता व गीताची लयनिष्ठ तरलता यांचा लालित्यपूर्ण समन्वय असतो,असायला हवा. राऊत यांच्या ग़ज़ला या निकषांवर सर्वतोपरी खर्‍या उतरतात.
ग़ज़लेतले ‘नाट्यतत्व’ मुशायर्‍यात दाद घेऊन जातं,हे तत्व विरोधाभास,(उदा. आग-पाणी, जमीन-आभाळ सुख-दु:ख) उपरोध इ.वर बेतलेले दिसते, पण अशा ग़ज़ला साधारणत: ‘कृतक’ या सदरात मोडतात,अन् मराठीत दुर्दैवाने अशा कृतक ग़ज़लांचा भरणा ऐंशी टक्के आहे. यासच पुरूषोत्तम पाटील यांनी ‘बाजारगर्दी’ ही संज्ञा दिली आहे. या बाजारगर्दीत राऊतांसारख्या व्यासंगी साहित्यिकाच्या ग़ज़ला आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहेत. राऊत ग़ज़लेत मिथकांचा वापर अत्यंत समर्पकपणे करतात. राधा,कृष्ण, गोकुळ, द्रोण, एकलव्य, द्वारका, द्रौपदी, गंगा, मीरा, कुबेर, सांजवात, देव्हारा, दिंडी, मंबाजी इत्यादिंचा प्रतिकात्मक विनियोग किती कलात्मक उत्कटतेने झालाय हे खालील शेरांवरून लक्षात येईल-

आयुष्य-द्वारका ही जाता अशी तळाला;
तुळशीस कृष्ण आता लागेल काय हाती?

दु:ख माझे एक राधा, एक मीरा आणखी;
व्याकुळांच्या गोकुळी मी करू कशाची वंचना?

ग़ज़लेवर नकारात्मक,नैराश्यपूर्णतेचा आक्षेप घेतला जात असे. आता ती स्थिती राहिली नसली तरी सकारात्मक विचाराच्या,दुर्दम्य प्रयत्न आशावादाच्या ग़ज़ला क्वचितच दृष्टीस पडतात. राऊत यांच्या खालील शेरांत ही सकारात्मक वृत्ती आढळेल. रसना व लवंगलता ह्या मात्रिक छंदातील हे शेर पहा-

बघतो अता कसा हा पाऊस येत नाही;
मी वीज पेरली रे ह्या वावरात माझ्या!

हसण्यावाचुन जगी आपले कोणी नसते भाई;
जगण्यासाठी आधाराला हसणे असते भाई.

लाख होउ दे सभोवताली उजाड बागबगीचे;
गाव फुलांचे मनात हसर्‍या अमुच्या वसते भाई.

राऊत यांच्या ‘गुलाल आणि इतर गझला’ या संग्रहात ‘भाई’ शीर्षकाची ग़ज़ल व अन्य दोनचार ग़ज़लाच क्रमबद्घ (मुसलसिल ग़ज़ल) आहेत. अन्य ग़ज़ला गैर मुसलसिल जरी असल्या (म्हणजे विविध विषयांवरील शेरांच्या ग़ज़ला) तरी त्यात प्रत्येक शेरात एका परिपूर्ण कवितेचा प्रत्यय येतो व त्यांच्या संवेदनक्षमतेची, चिंतनवृत्तीची  साक्ष पटते.
राऊतांच्या ग़ज़लेतील अनेक रंगात रोखठोकपणाचाही एक रंग आहे-

घासतोस तू कपाळ रोज पत्थरावरी
पावला कुणास देव ठोकरून माणसे?

दिसते जरी तुम्हाला ही फार छान वस्ती;
सेंटेड माणसांची भलतीच घाण वस्ती.

तुला शोभले का अरे ईश्वरा हे-
भिकार्‍याप्रमाणे पुढे हात केले.

मराठीत विविध वृत्त/छंदात ग़ज़ला रचणारे अनेक ग़ज़लकार आहेत. वृत्त/छंद, रदीफ, काफिया ही ग़ज़ल सृजनाची साधने आहेत. ‘उत्तम शेरांची ग़ज़ल’ हे साध्य आहे. अनेकांना नसलेला हा साधन-साध्य विवेक राऊत यांना आहे;त्यामुळे त्यांनी अकारण ग़ज़लेचा रतीबही घातला नाही की वृत्तांसाठी ग़ज़ला लिहिल्या नाहीत. मात्र त्यांची ज्या वृत्तांवर हुकुमत आहे त्या निवडक गेय वृत्त/छंदात त्यांच्या ग़ज़ला साकारल्या आहेत. त्यांनी रसना, लवंगलता, शुभगंगा, अनलज्वाला, देवप्रिया, वियद्‍गंगा, स्त्रग्विणी, भुजंगप्रयात, सोमराजी, हिरण्यकेशी, मेनका,देवराज,विद्युल्लता, सुकामिनी, द्विरावृत्ता, रमलमुसद्दस इ. कर्णमधुर छंद-वृत्ते सहजपणे वापरली आहेत. ही छंदात्मक संरचना शेरातील आशयाचा लयात्मक रसानुभव देण्यास सहाय्यक ठरते अन शेराची प्रभाव क्षमताही वाढण्यास मदत होते.
सुरेश भटांच्या प्रेरणेने ग़ज़लेकडे वळलेल्या कवींपैकी अनेकजण मौन झाले आहेत.काहींच्या सृजनाचा दर्जा खालावलाय. अशात श्रीकृष्ण राऊतांसारखे मंचीय प्रलोभनांना न भुलता, सातत्याने मोजक्याच पण दमदार ग़ज़ला लिहिणारे ग़ज़लकार व त्यांच्या ग़ज़लांमुळे मराठी ग़ज़लच्या उज्वल भवितव्याबाबत अंधुकशी आशा बळावते अन्‌ राऊत जेव्हा म्हणतात-

मला हा एकदा जेव्हा दिला आधार शब्दांनी;
बघा आकाश तार्‍यांचे कसा मी तोलतो आता.

तेव्हा ‘दिवस अमुचा येत आहे,तो घरी बसणार नाही’ असे आश्वस्तही होतो आपण!

('कविता-रती ' जाने.- फेब्रु. २०१५ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा