हास्यमहती : शिवाजी जवरे


हसण्यावाचून जगी आपले कोणी नसते भाई

जगण्यासाठी आधाराला हसणे असते भाई


पैसा-अडका, नाती-गोती, सगेसोयरे खोटे

मैत्र तेवढे हसण्याचे ते सच्चे दिसते भाई


ज्याला जमले हसणे त्याचे सुंदर झाले जगणे

आले नाही हसता त्याचे जगणे फसते भाई


वाण हसूचा छान जमवितो जगण्यासोबत सौदा

शिवले ज्याने ओठ तयाचे दुकान फसते भाई


लाख होऊ दे सभोवताली उजाड बागबगिचे

गाव फुलांचे मनात हसऱ्या अमुच्या वसते भाई !


ही गझल प्रा. श्रीकृष्ण राऊत सरांची आहे. कवितेत विलापिका असा एक आशयावरून प्रकार पडतो. कुणाच्या तरी विरहाने जे भाव उद्भवतात, ते भाव काव्यात व्यक्त केले तर त्या

कवितेला 'विला पपिका' म्हणतात. कवितेत विलापिका कशी - प्रस्तावना, विस्तार आणि समारोप अशा आकृतीबंधाने तीन कडव्यात किंवा चार-पाच कडव्यांतही लिहिली जाऊ शकते. गझल म्हटले की ती किमान पाच शेरांची हवी आणि उपरोक्त गझलेत विषय एक असला तरी त्या विषयाची जी उपांगे आहेत, त्या प्रत्येक उपांगाला स्वतःला एक निश्चित आणि स्वतंत्र आशय आहे. आधीचा शेर वाचणे पुढचा शेर समजण्यासाठी आवश्यक नाही. तसेच एक कोणताही शेर वेगळा काढला तरी तो हास्याविषयी समर्पक भाष्य व्यक्त करतो. हे पाचही शेर पु.ल. देशपांडेंच्या निधनानंतर त्यांच्या विरहातून लिहिले गेले आहेत. त्यांचे

स्वरूप इतके प्रवाही आहे, की जणू ते शेर कुणी लिहिलेले नाहीत. ते त्यांच्या ठिकाणी तयारच होते. केवळ ते उचलून राऊत सरांनी समोर मांडलेत. हे चांगल्या निर्मितीचे लक्षण असावे. पु. ल. देशपांडेंनी आयुष्यभर महाराष्ट्र आणि

मराठी मनाला हसविले. अहंकार गळावा, क्रोध विरुन जावा... तत्त्वज्ञानी, अध्यात्मवादी काय-काय सांगतात, पण ते प्रत्यक्ष वर्तनात भारी जाते. पु. ल. देशपांडेंनी हे सर्व हसत-हसत सांगितले आणि वर्तनातही आणले.

त्यांच्या नाटकाचे, भाषणाचे कसले-कसले कार्यक्रम चालायचे आणि ते उशीरा घरी यायचे. एकदा नाट्य परिषदेच्या या कार्यक्रमावरून ते उशीरा आले आणि सकाळी उशिरापर्यंत झोपूनच होते. सुनिताताईंचा दिनेश नावाचा लहानगा भाचा येऊन त्यांच्या पाठीवर चढून म्हणाला 'ए उठ भंप्या....' त्यावर देशपांडे म्हणतात, 'रात्रीच्या स्वागताचे हार सुकलेही नव्हते की या मुलाने मला माणसात आणले.' आपण तर रागाने म्हटले असते या पोराला सपशेल वळण नाही. लहान-मोठे न बघता काहीही

बोलते हे कार्ट वगैरे वगैरे ! पण पु.ल.नी त्या पोराच्या बोलण्याच्या निमित्ताने अहंकाराचा कापूर केला. त्या देशपांडेंवर विलापिका लिहताना राऊत सरांनी हास्याचे महत्त्व सांगितले. हास्याविना जगात काही शाश्वत आणि सुखकारक नाही.


ज्याला हसता आले त्याला काहीच कमी नाही. 'सुखाचा शोध' याविषयी आणिक काय सांगणार ?

अनादी अनंत असा हा शोध आहे. शेवटच्या शेरात कवी म्हणतो-अवतीभवती कितीही उजाड-ओसाड अवस्था असू दे पण आमच्या मनात फुलांचे हसरे गाव वसत असते. टॉम विल्सन म्हणतो- 'आनंद आपल्या नाकाखालीच आहे. ओठांची महिरप चंद्रकोरीसारखी वक्र झाली की कपाळावरचीआठी निघून जाते. ' ही मनोवस्था साध्य करण्याचे धडे भाईंनी आपणास दिले आणि उपरोक्त गझलेतून सरांनी त्या धड्यांना उजाळा दिला.


( सकाळ १० फेब्रु.२०१७ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा