गझलने मला समृद्ध केले : श्रीकृष्ण राऊत




विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील पातूर या छोट्याशा गावात माझा जन्म झाला. बाबा नारायण लक्ष्मण काठोटे. माय जनाबाई. आजोबांनी सुतारकाम करताना लाकडाची परात बनवली होती. ती पाहून भाटांनी आमचे नाव काठोटे पाडले. असं माय सांगायची. बऱ्याच वर्षांनी मी शब्दकोशात काथवटचा अर्थ पाहिला. काथवट म्हणजे लाकडी परात. आमचं मुळातलं आडनाव राऊत. जे पुढे शाळेतल्या दाखलखारीजमध्ये नोंदल्या गेलं. पोरगं पास-नापास होत बरोबरीत येईल. या धोरणाने साडेपाच वर्षाचा असताना बाबांनी मला पहिलीत घातलं. गुरुजींनी सहा वर्ष मागे मोजून माझी जन्म तारीख नोंदवली ०१/०७/१९५५. चौथीपर्यंत नगर परिषदेच्या शाळेत शिकलो. पाचवी ते दहावी तुळसाबाई कावल विद्यालयात होतो. परिसरात सगळे जण शाळेला टीकेव्ही म्हणायचे. या शाळेतून प्रथम श्रेणीत मॅट्रीक पास झालो. पुढील शिक्षणासाठी नॅशनल लोन स्कॉलरशीप मिळाली.

डॉ. एच. एन सिन्हा कला वाणिज्य महाविद्यालय हे आमच्या गावी नव्यानेच सुरू झाले होते. या महाविद्यालयात मी १९७१-७२ या शैक्षणिक वर्षात प्रि-कॉमर्सला प्रवेश घेतला. परीक्षेत प्रथम श्रेणी कायम ठेवली. मात्र या आनंदावर विरजण पडले. याच वर्षी 'प्रोग्रेसिव्ह हायपर ट्रॉफिक स्युडो मस्क्युलर डिस्ट्रफी' या जगाच्या पाठीवर औषध नसलेल्या, अत्यंत विरळ्या दुर्धर आजाराने मला गाठले. त्यातून शरीराला विकलांगता आली. मन खचलं. त्यातून सावरायला चार पाच वर्षे गेली. शिक्षण आणि साहित्य वाचनात मात्र मी खंड पडू दिला नाही.
अशातच माझे बी. कॉम. १९७४-७५ मध्ये मी पूर्ण केले. याच काळात माझ्या काव्याचा प्रवास सुरू झाला. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाविद्यालयाचे समृद्ध ग्रंथालय. डॉ. एच. एन. सिन्हा यांनी त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा कॉलेजला दिली होती. मला वाचनाची मनापासून आवड. बालकवी, बी, कुसुमाग्रज, संपूर्ण राम गणेश गडकरी, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वि. दा. सावरकर, विजय तेंडुलकर, आदिंचे साहित्य वाचण्यात आले. याच ग्रंथालयात माधवराव पटवर्धन यांचे छंदोरचना आणि रा. श्री. जोग यांचे काव्यविभ्रमही वाचण्यात आले. पण कॉमर्स शाखेचा विद्यार्थी असल्याने 'छंदोरचना' फार पचनी पडली नाही. रा. श्री. जोग यांच्या 'काव्यविभ्रम'ने मात्र कविता, त्यांचे प्रकार, वृत्त, मात्रा हे समजून घ्यायला मदत केली. सोबत हिंदी उर्दूतील नावाजलेल्या शायरांच्या हिन्दी चित्रपटातल्या गीत-गझला रेडिओवर ऐकत होतो. त्यात गझलेचा आकृतीबंध आवडत गेला आणि मी गझलेच्या प्रेमात पडलो.
माझी पहिली गझल
अजूनही वृत्त, लगावली, मात्रा, क़ाफिया, रदीफ याचे पुरेसे ज्ञान झालेले नव्हते. पण गझलेचा आकृतीबंध काळजावर ठसला होता. माझे गुणगुणणे शब्दरूप झाले आणि पहिली गझलेसारखी कविता १९७६-७७ या वर्षात जन्माला आली. ती अशी -

'स्वतःला मेलो इतकं सुतकी राहू नये कधी
व्यथेच्या ऐनेमहालात प्रिया पाहू नये कधी
येणार असते चांदणी अनाहूत अंधारात
निखळत्या उल्केच्या वाटेला जाऊ नये कधी
हरेक ओठांना चुंबित नसते रे गझल
खुशालीत तिच्या तिला गाऊ नये कधी
उमलत्या फुलांचे आहे निर्माल्य ठरलेले
उगाच दोष उन्हाला लावू नये कधी
आपसुक रंगत जाते मेंदी रक्तात पेटून
स्वतःच्या खांद्यावर चितेला वाहू नये कधी
.
नंतर ही कविता ऑगष्ट-सप्टेंबर, १९७८ च्या 'युगवाणी' यामध्ये प्रकाशित झाली. त्यामुळे उत्साह दुणावला. दरम्यान जोग यांच्या पुस्तकाच्या मदतीने वृत्तांचा अभ्यास सुरू होता. कवितेचे वेगवेगळे प्रकार समजून घेत होतो. त्यानुसार सरावही चालू होता. परिणती स्वरूप माझी पहिली आनंदकंद वृत्तातील मुसलसल गझल लिहून झाली. तिचा मतला होता-

'सांगू कशी फुलाचा, देठास भार झाला
हा बहर यौवनाचा देहास फार झाला’
.
ही गझल १९७९ मध्ये 'तरुण भारत 'ने छापली. आणि श्रीकृष्ण राऊत हे नाव संपूर्ण विदर्भात पोहचले. मानधन म्हणून १०/- रुपयांची मनीऑर्डर घरी पोचली. आनंद झाला. तेंव्हा त्याचे काय करू? कुठे ठेऊ? काय घेऊ? असे झाले होते. त्याचे कारणही तसेच होते- माझी आई अशिक्षित. आठवडाभर शेतावर रोजंदारी केल्यावर कुठे साडेचार रुपये मजुरी मिळायची. वडील भूमिहीन. उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करायचे. जुजबी अक्षर व अंक ओळख. फक्त राजंदेकरांचे पंचांग वाचण्यापुरती. लेखन केवळ सहीपुरते. जे आजोबांनी त्यांना घरी शिकवले होते. वडील शेती औजारे, बैलगाडी, चाकजोडीची कामे करायचे. चाकजोडी तयार करणे तसे जिकरीचे आणि कौशल्याचे काम. पण वडिलांचा त्यात हातखंडा. यातही मेहनतीच्या तुलनेने मजुरी कमीच. या कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर माझ्या गझलेस मिळालेले १०/- रुपये मानधन खूप मोठे वाटले होते. या मानधनाच्या पैशातूनच मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेला सुरेश भट यांचा 'रंग माझा वेगळा' हा काव्यसंग्रह पोस्टाने मागवला. मी विकत घेतलेले हे पहिले पुस्तक. ती सवय अजुनही कायम आहे. भटांच्या गझलेत काही संस्कृत शब्द अडायचे. त्यांचे अर्थ लागत नव्हते. त्यासाठी मी प्रा. हिम्मतराव सपकाळ यांची मदत घ्यायचो. सपकाळ सर सुरेश भटांचे जबरदस्त चाहते. त्यांनी मैफिलीत जशी गझल सादर केली, अगदी त्याच चालीत ते ऐकवायचे. माझ्यावर भाषिक संस्कार त्यांनीच केले. असे म्हणणेच योग्य होईल.
घरात कोणतीही शाहिरी, भजनी परंपरा नसतांना मी कवी कसा झालो? हा प्रश्न सारखाच पडायचा. पण आज जेंव्हा मागे वळून बघतो तेंव्हा आठवते - माझी आई मला झोपवतांना आठवणीने गोष्टी सांगायची. तिला लोकगीते तोंडपाठ होती. तिच्या नेहमीच्या बोलण्यात म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वारंवार उल्लेख असायचा. श्रावण महिन्यात चालणारे सप्ते, पोथ्या, काकड आरती, गावात असलेले गुरुदेव सेवा मंडळाची संध्याकाळची प्रार्थना, ई. हे सर्व नकळत संस्कार करीतच होते. तेंव्हाच कदाचित हे कवितेचे बीज रुजले असेल. ज्याने 'मान व धन', दोन्हीही मला दिले होते. 'मंदाकिनी' वृत्तातली गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना, त्याचे शब्द, त्याची लय अजुनही मनात झंकारत असते –
.
'है  प्रार्थना  गुरुदेव  से, यह  स्वर्गसम  संसार  हो ।
अतिउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ।
ना  हम  रहे  अपने  लिए, हमको  सभी से गर्ज है ।
गुरुदेव  यह  आशीष दे, जो  सोचने  का फर्ज है ।।
.
कविवर्य सुरेश भट यांची भेट
.
याच दरम्यान नागपूर आकाशवाणीवर एका कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले. आनंदाला पारावार उरला नाही. मराठी गझलेला सन्मान मिळवून देणाऱ्या सुरेश भटांची भेट झाली पाहिजे असे सारखे वाटायचे. त्यामुळे आकाशवाणीच्या कार्यक्रमापेक्षाही सुरेश भटांची भेट होणार याचाच आनंद अधिक. मग काय भेटीचे नियोजन सुरू झाले. बोरीअरबचे जावई योगेश बऱ्हाणपुरे भटांचे मित्र. त्यांचेशी संपर्क करून पत्ता मिळवला. शंकर बडे त्यावेळी बोरीअरबला रहायचे. त्यांना सोबत घेऊन नागपूरला पोहोचलो. आकाशवाणीच्या कार्यक्रमानंतर धंतोलीच्या रामकृष्ण आश्रमासमोर असलेले कविवर्य सुरेश भट यांचे घर गाठले. औपचारिक गप्पा झाल्यानंतर माझ्या काही गझला त्यांना ऐकवल्या. त्यांनाही आवडल्या. तुझ्या गझला वेगळ्या धाटणीच्या आहेत. लिहीत रहा. अशी शाबासकी मिळाली. अशी ही उर्जादायी पहिली भेट! ही ऊर्जा बरेच दिवस पुरली. सुरेश भट साहेबांना दुसऱ्यांदा भेटण्याचा योग आला तो अमरावतीमध्ये. अरविंद ढवळे भटांचे जिवलग मित्र. ढवळेंच्या घरी बऱ्याचदा भटांचा मुक्काम असायचा. मैफिली व्हायच्या. यावेळेस ही भटांचा पाच दिवसांचा मुक्काम त्यांच्याकडे होता. फक्त गझल आणि गझल-गप्पा. या प्रदीर्घ भेटीत बरेच शिकायला मिळाले. यातलीच एक मैफिल डॉ.मोतीलाल राठी यांच्याकडे पण झाली होती. यावेळी तेव्हाचे बरेच नवोदित उपस्थित होते. सुरेश भटांच्या 'रंग माझा वेगळा' या काव्यगायनाच्या निमित्ताने अकोल्यात आमची तिसरी भेट झाली. तोपर्यंत मला दुष्यंत कुमार यांच्या हिंदी गझला पाठ झाल्या होत्या. नसानसात भिनल्या होत्या. आपल्याला जे सर्वाधिक आवडते तीच गोष्ट आपण भेट दिली पाहिजे आणि मी सुरेश भटांना दुष्यंत कुमार यांचा 'साये में धूप’ हा गझलसंग्रह भेट दिला.

 
पहिल्या चित्रपटासाठी गीतलेखन

जिल्हा सहकारी बँकेत मॅनेजर  असणाऱ्या मोठ्या भाऊंची बदली बोरगाव मंजूला झाली. पुढच्या शिक्षणासाठी मी त्यांच्याकडे राहिलो.
माझे एम. कॉम. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात सुरू होते. त्यावेळी अकोल्यात प्रा. पद्माकर दादेगावकर ‘प्रयोग’ संस्था चालवायचे. ही संस्था प्रायोगिक नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायची. विदर्भातील कवींच्या रचनांना स्वरसाज चढवून त्यांनी 'स्वरयात्रा' नावाचा कार्यक्रम १९७९ मध्ये आयोजित केला होता. त्यावेळी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके हे प्रमुख पाहुणे होते. सुधाकर प्रधान यांनी माझ्या 'सांगू कशी फुलाचा, देठास भार झाला' या गझलेस स्वरबद्ध केले आणि जया खांडेकर यांनी ती अप्रतिम गायली. या गझलेला मिळालेल्या टाळ्यांनी अकोल्याचा प्रमिलाताई ओक हॉल बराच वेळ निनादत राहीला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॅडी देशमुख उपस्थित होते. धिप्पाड शरीरयष्टी, साडेसहा फूट उंची असलेले हे कलारसिक व्यक्तिमत्त्व. त्यांना ही गझल खूप आवडली. 'देवकी नंदन गोपाला' च्या घवघवीत यशानंतर डॅडी त्यांच्या 'राघू मैना' या चित्रपटाची तयारी करीत होते. बोरगावमंजूला माझ्या घरी येऊन त्यांनी मला गीतलेखनाची ऑफर दिली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजदत्त यांनी माझी तीन गीते निवडली. आशा भोसले, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर यांनी संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्या संगीत दिग्दर्शनात ती सुंदर गायिली. माझे एक स्वप्न पूर्ण झाले. त्याच वर्षी शिवाजी शिक्षण संस्थेत प्राध्यापक भरती निघाली. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात १९८१ या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षात प्राध्यापक म्हणून मला नोकरी मिळाली. रोजीरोटीचा प्रश्न सुटला. प्राचार्य डॅडी देशमुख यांना आवडलेली गझल अशी फळास आली.
मुलगा नोकरीला लागला त्याचे 'दोनाचे चार हात' करण्याची घाई जशी हरेक घरात होते. तशी आमच्याही घरात झाली. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड रूपराव येथील त्र्यंबकराव सूर्यभानजी वानखडे यांची चतुर्थ कन्या असलेल्या उषाने माझ्या गळ्यात वरमाला घातली. ती तारीख होती १९ मे १९८२. सौ. उषा ही माझ्या वहिनीची सगळ्यात धाकटी बहीण. वैवाहिक जीवनाचा 'उषःकाल' आनंदाने सुरु झाला. चि. संकेत, हर्षदच्या जन्मानंतर पुढे तिच्या धाडसाची दखल २००४ साली अहमदनगरच्या जानकीबाई आपटे या सामाजिक संस्थेने घेतली. अपंग व्यक्तीशी लग्न करून दहावर्षांहून अधिक काळ सुखी संसार केल्याबद्दल तिला 'माणिक-मंगल' पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रत्येक पुरस्काराच्या वेळी ती माझ्या शेजारी मंचावर बसलेली असायची. यावेळी मात्र मी तिच्या शेजारी बसलेला होतो.
गझल लेखन जोमाने सुरू झाले. पूर्ण झालेल्या गझलांपैकी मला उत्तम वाटलेल्या गझला मी तत्कालीन निखळ वाङ्मयीन नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांना पाठवीत होतो. 'आजन्म रोज ज्यांनी' ही गझल ‘युगवाणी’च्या एप्रील-मे, १९७९ च्या अंकात छापून आली. त्यानंतर धुळ्याहून प्रकाशित होणाऱ्या 'अनुष्टुभ'च्या दिवाळी अंकात ऑक्टोबर-नोव्हेंबर, १९७९ मध्ये माझी प्रसिद्ध झालेली गझल -
‘माझी भकास शिल्पे शोधीत काल होता
तो  देखण्या  व्यथेचा  ऐनेमहाल  होता.
सौभाग्य  रेखणारे  कुंकूच  भासले  जे
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता’.
ही गझल वाचून शाहीर सुरेशकुमार वैराळकर माझा पत्ता शोधत बोरगावमंजुला पोचले. जिवाभावाचा संवाद झाला. तेव्हापासून आमच्या मैत्रीचं जुळलेलं गोत्र आजवर घट्टपणे कायम आहे. ही मैत्री म्हणजे गझलेने माझ्या पदरात टाकलेलं सर्वश्रेष्ठ दान आहे. वैराळकरांनी त्यांच्या टपोऱ्या वळणदार अक्षरात 'माझी भकास शिल्पे' ही गझल त्यांच्या डायरीत लिहून घेतली. पुढे त्यांनी ही गझल सिंधुताई सपकाळ यांना लिहून दिली. सिंधुताईंना ती मुखोद्गत झाली. व.पु. काळे यांनी १९८५ ला 'माहेर' दिवाळी अंकासाठी सिंधुताईंची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत व.पुं.ना सिंधुताईंनी ऐकवलेली ती गझल दुसऱ्यांदा पूर्ण छापून आली.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या साहित्यिक, रसिक आणि प्रकाशकांपर्यंत पोहोचणाऱ्या 'अनुष्टुभ' मध्ये गझल प्रकाशित झाल्यामुळे अभिप्राय, अभिनंदन करणारी अनेक पत्रे येत होती. त्यातच जानेवारी, १९८० मध्ये आलेल्या एका पत्राने लक्ष वेधून घेतले. ते होते प्रदीप गुजर यांचे. श्री पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून माझा पत्ता मिळवल्याचा उल्लेखही त्यांनी त्या पत्रात केला होता. महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि नवोदित कवींच्या कवितांचा एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह ते काढणार होते. त्यासाठी माझ्या गझला पाठवाव्या, ही विनंती करणारे ते पत्र होते. किमान पाच कविता/गझला पसंतीस उतरल्या तरच प्रकाशित करण्यात येतील. ही सूचना वजा नियम अधोरेखित केलेला. तोपर्यंत लिहिलेल्या गझलांपैकी ८-१० उत्तम निवडून त्यांना लगेच उलट टपाली पाठवल्या. साधारण दोन महिन्यानंतर, 'किमान पाच कविता/ गझला पसंतीस पडल्या पाहिजे हा नियम मोडून आपल्या चार गझला संग्रहात समाविष्ट करतो आहे' असे गुजरांचे पत्र मिळाले. 'कविता' नावाने हा प्रातिनिधिक कवितासंग्रह १९८१ मध्ये प्रकाशित झाला. उत्तम दर्जाच्या हस्तनिर्मित मुखपृष्ठावर चित्रकाराने केलेली बहुरंगी चित्रकला हे या संग्रहाचे वैशिष्ट्य. त्यामुळे संग्रहाच्या प्रत्येक प्रतीचे मुखपृष्ठ वेगळे. हा प्रातिनिधिक कवितासंग्रह जाणकार वाचकांच्या पसंतीस उतरला.
एकंदरीतच, १९७८ मध्ये लिहिलेल्या गझल सदृश्य रचनेपासून सुरू झालेला प्रवास अल्पावधीतच तंत्रशुद्ध गझलेच्या माध्यमातून चोखंदळ रसिकांपर्यंत पोहचला होता. बोरगावमंजू येथे जन्मलेल्या गझलेला संपादक वामन तेलंग यांनी तरुण भारतच्या माध्यमाने संपूर्ण विदर्भात पोहचविले. 'युगवाणी', 'अनुष्टुभ' या नियतकालिकांनी आणि 'कविता' या प्रातिनिधिक संग्रहाने पश्चिम महाराष्ट्रात ‘श्रीकृष्ण राऊत’ या नावाला चांगली ओळख मिळाली.
याच काळात गझलगायक सुधाकर कदम आणि त्यांची तबल्यावर साथ करणारे शेखर सरोदे यांची भेट झाली. शब्द, छंद, सूर आणि ताल यांची घट्ट मैत्री जमली. सुधाकर कदम सालाबादप्रमाणे नवरात्रात माहूर गडावर हजेरी लावायला जाणार होते. दुर्धर आजाराने अपंगत्व आलेल्या माझ्यासारख्याला गड चढणे अशक्य होते. पण म्हणतात ना! मित्र आणि आत्मविश्वास काहीही करू शकतो. सुधाकर आणि शेखर यांनी त्यांच्या हाताची पालखी केली. मला बसवले आणि आम्ही मैत्रीचा माहूर गड सर केला. रेणुका मातेच्या चरणी पोहचलो. गड चढायला सुरुवात करतानाचे दुःख, शिखरावर पोहचता पोहचता देव झाले होते. भावना शब्दबद्ध झाल्या- ‘दुःख माझे देव झाले’.  पुढे हीच गझल सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केली. त्यांच्या हरेक गझल मैफिलीत ती आवर्जून गायली जायची. त्यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'भरारी' शीर्षकाच्या कॅसेट मध्ये ती समाविष्ट केली गेली. पुढे ही गझल 'लोकमत' च्या रविवार पुरवणीत १२ ऑगस्ट १९८४ ला प्रकाशित झाली. माझ्या गझलेचा प्रवास चिंतनातून लेखन, लेखनानंतर प्रकाशन, आणि त्यांचे गायन असा संथ गतीने सुरू होता. वाचल्या जाणारी गझल आता गुणगुणल्या जाऊ लागली होती.
सुधाकर कदमांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी गझल गायनाचे कार्यक्रम होत होते. आता नागपुरातील धनवटे रंगमंदिर गाजवावे अशी त्याची इच्छा होती. योग जुळून आला. दिनांक १५ जून १९८४ ला धनवटे रंगमंदिरात भारदस्त आवाजाचे धनी सुधाकर कदम यांनी सूर लावला-
'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी वेदना'
आणि माझ्या ‘दुःखाचा देव’ मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विराजमान झाला. ‘तरुण भारत’च्या ‘मध्यमा’ पुरवणीत या मैफिलीचा वृत्तांत वामन तेलंग यांनी सविस्तर लिहिला.
सुरेश भटांच्या गझलेसोबत माझीही गझल गायली जात आहे याचे समाधान होते. भेट घेऊन, पत्र पाठवून अभिनंदन करणाऱ्या रसिकांची, चाहत्यांची संख्या वाढत होती. एके दिवशी मनमाडच्या खलील मोमीन यांचे पत्र आले. त्यावेळी ते ‘अनुष्टुभ’च्या संपादक मंडळाचे सदस्य होते. माझ्या गझलांचे कौतुक करतांना ते लिहितात- ‘तुमच्या गझला मैफिलीत ऐकवून टाळ्या घेणे हा माझा आवडता छंद आहे’ या ओळीने मला प्रेरणा दिली. माझे मनोबल वाढवले. मोमिनांचे हे पत्र म्हणजे एका अर्थाने, मी माझ्या गझलेत वेगळेपण जोपासत आहे याची पावतीच होती.
पहिला गझलसंग्रह
साधारणतः १९७८ पासून गझल लेखन सुरू असल्यामुळे १९८५ पर्यंत जवळपास सत्तरेक गझला लिहून झाल्या असतील. एखादा गझलसंग्रह काढायला पाहिजे असे अनेक मित्रांनी सुचवले. मलाही वाटू लागले. तशी प्रकाशकांची माहिती मिळवणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे सुरू झाले. त्यावेळी नवोदित कवी साहित्यिकांना प्रोत्साहन म्हणून पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळायचे. फक्त ५० गझलांचा-कवितांचा संग्रह काढता येईल असा मंडळाचा नियम होता. निवडक ५० गझलांच्या संग्रहाला 'गुलाल' हे शीर्षक दिले. संग्रहाचे हस्तलिखित अनुदानासाठी मंडळास पाठवले. शासकीय कार्यालय आणि कामकाज पद्धतीचा सर्वसामान्यांचा जो अनुभव असतो तोच मलाही आला. पुस्तक प्रकाशनाचे काम तब्बल दोन वर्षे रखडले. अखेर मंडळाने प्रकाशक बदलवला. आणि पन्नास गझलांचा संग्रह 'गुलाल' श्रीरामपुरच्या ‘शब्दालय प्रकाशना’ने १९८९ साली प्रकाशित केला. हा गझलसंग्रह वाचून थोरामोठ्यांनी दिलेली दाद सुखावून गेली. त्यातील काही अंश असे-
पु. ल. देशपांडे-
‘तुम्हाला गझलरचनेची नस सापडली आहे.’

वि. वा. शिरवाडकर-
‘गझल प्रकारावर आपले चांगले प्रभुत्व आहे.’

ना. घ. देशपांडे-
‘रविकिरण मंडळ व त्यांच्यापैकी माधव ज्यूलियन यांनी मराठीत गझल बरेच रचले. त्यानंतर आता श्रीयुत सुरेश भट यांनी मराठीत गझल ब-याच प्रमाणात केले. आता हा श्रीयुत राऊत यांचा गझलांचा संग्रह मराठीत आला. या कवीची मनोभूमिका शोकात्मक आहे. जगाने या कवीवर अन्याय केला आहे अशी त्याची तक्रार आहे. या भावनेने हा संग्रह भारलेला आहे. `Our sweetest songs are those that tell of saddest thought' या शेलेच्या वचनाची आठवण हा संग्रह वाचताना येते.'

मंगेश पाडगावकर-
‘विसंगती हेरण्याची आणि चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती तुमच्या शैलीत आहे. तसेच, क्षुद्र स्वार्थाच्या, हपापाच्या पलीकडच्या उदात्त जगण्याचे खोल आकर्षण तुम्हाला आहे. ही सर्व तुमच्या या गझलांतील जमेची बाजू आहे. परंतु इथे एका गोष्टीकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. अशा त-हेच्या गझला वाचताना नंतर नंतर एकसुरीपणा जाणवतो. जीवन-दर्शनात तोचतोपण आल्यामुळे, शैलीतील वक्तृत्वाचे घटक काहीशा भडकपणे स्वत:कडे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करु लागतात! उपरोधामागची सात्त्विक प्रेरणा फिकी होऊन, त्यात एक प्रकारचा नाटकी आवेश शिरू लागतो; आणि हळूहळू यशस्वी लकबींची हुशारीने केलेली पेरणी असे स्वरूप लेखनाला येण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे असे झालेले नाही’.
'गुलाल' प्रकाशित झाला.अकोल्याचे सुप्रसिद्ध चित्रकार शक़ील एज़ाज़ यांनी रेखाटलेले रेखाचित्र मलपृष्ठावर झळकले.त्यावेळी श्रीरामपुरला ग्रामसेवक असलेले संतोष पद्माकर पवार. त्याला अवघा 'गुलाल' मुखोद्गत. 'संतोष पद्माकर' या नावाने कवी म्हणून त्यांना आज महाराष्ट्रातला जाणकार वाचक ओळखतो. बत्तीस  वर्षानंतर आजही त्याला माझे शेर पाठ आहेत. परिष्करणानंतर एखादा शब्द बदलून फेसबुकवर मी शेर पोस्ट केला तर संतोष मला आजही माझ्या शेरातील पाठभेद आणि मूळ शेर मला सांगतो. तसाच लातूरचा धनंजय कांबळे. त्यालाही माझ्या गझला तोंडपाठ आहेत. अकोल्याच्या माझ्या विद्यार्थांसह असे अनेक तरुण महाराष्ट्रभर भेटतात. माझी गझल  झिरपत झिरपत नव्या पिढीपर्यंत चांगल्या तऱ्हेने पोचते आहे, हे पाहून गझललेखनाचे चीज झाल्यासारखे वाटते.

.
दु:ख देखणे तुझे, देखणा वसंत तू

.

हिंदी चित्रपट, नट-नट्या, गझल-गीते याचे विशेष आकर्षण वाटायचे. तत्कालीन नट्यांमध्ये मीना कुमारी खूप आवडायची. तिच्याबद्दल काहीही लिहून आले की कधी एकदा वाचून काढतो असे व्हायचे. दुर्दैवाने मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ ला देहावसान झाले. हा माझ्यासाठी मोठा धक्काच होता. त्यानंतर बरीच वर्षे ती आठवत राहिली. दरम्यान मराठी गझलेचे वेड लागलेले होते. साधारणतः १९७७-७८ मध्ये मीना कुमारीचा 'पाकिजा' हा सिनेमा पाहण्यात आला. खूपच आवडला. तिची अदाकारी, संवादफेक, सौंदर्य आणि विशेषतः संगीत सारं काही अप्रतिम जुळून आले होते. ही सौंदर्यसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, हे दुःख झोपू देत नव्हते. एव्हाना गझलेच्या वृत्तांवर बऱ्यापैकी पकड आलेली होती. तिच्या करुण अंताने माझ्या शब्दांना वाचा फोडली. आणि गझल अवतरली-
‘दुःख देखणे तुझे , देखणा वसंत तू
घाव सांगतात ना, आजही पसंत तू’
'सुकामिनी' द्विरावृत्ता या अनवट वृत्तातली ही गझल. मराठीत या वृत्तात क्वचितच गझला आढळतात.
सुरेश भटांच्या २६३ गझलांपैकी एकच गझल या वृत्तात आहे. ती त्यांच्या निधनापूर्वी एक वर्ष आधी २००२ मध्ये
प्रकाशित झालेल्या 'सप्तरंग' या पाचव्या कविता संग्रहात. या वृत्तातील लगक्रमाने सिद्ध झालेली अंगभूत लय संगीतकारांना या गझलेची चाल बांधण्यासाठी आकर्षित करीत होती. ही गझल १५ जून १९८० ला 'तरुण भारत' मध्ये प्रकाशित झाली. या मराठी गझलेचे शीर्षक होते- 'महज़बिन'. जिचे कपाळ चंद्राप्रमाणे सुंदर आहे अशी ती- 'महज़बिन'. 'महज़बिन' हे मीना कुमारी यांचे खरे नाव. तिच्या अभिनयासोबतच तिच्या शायरीने सुद्धा वेड लावले होते. गुलजार साहेबांनी संपादित केलेले 'मीना कुमारी की शायरी' हे पुस्तक विकत घेऊन त्याची अनेक पारायणे झाली. भीमराव पांचाळे यांची 'स्वप्न तारकांचे' ही कॅसेट १९९४ मध्ये निघाली. त्यात माझी 'दुःख देखणे तुझे, देखणा वसंत तू' ही गझल त्यांनी स्वरबद्ध करून गायली. आजही ती गझल रसिकांना आवडते.
आचार्य पदवीकरिता कोरकु आदिवासींची मौखिक गीते गोळा करीत होतो. त्यासाठी शारीरिक मर्यादांवर मात करत मेळघाटात फिरत होतो. तेवढ्यात बडोद्याच्या चर्चासत्राचे निमंत्रण मिळाले. साहित्य अकादमी आणि महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ते चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 'मौखिकता आणि लोकसाहित्य' या विषयाच्या त्या चर्चासत्रात मी ‘कोरकुंची लोकगीते' हा निबंध सादर केला. लोकगीते मी टेपरेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केलेली असल्याने  निबंधातले एक गीत त्याबरहुकूम माझ्या आवाजात सादर केले होते. विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. सुषमा करोगल यांनी चर्चासत्रातील निबंधाचे पुस्तक संपादित केले. 'मौखिकता आणि लोक साहित्य' याच शीर्षकाने ते साहित्य अकादमीने प्रसिद्ध केले आहे. वर्ष २००० मध्ये मध्यप्रदेशातील आदिवासी कोरकूंच्या लोकगीतांचा अभ्यास करण्यासाठी मला साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त झाली. या निमित्ताने डॉ. किशोर सानप यांच्यासोबत मध्यप्रदेशात फिरता आले. आणि कोरकुंच्या संस्कृतीचा जवळून परिचय झाला.
पहिला काव्यसंग्रह : एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला
गझल हा तंत्रशुद्ध काव्यप्रकार. त्या अनुषंगाने वृत्तांचा अभ्यास आणि त्यांच्यावरील पकड आता बऱ्यापैकी मजबूत झाली होती. शेर लिहिताना जाणवणारी सहजता रसिकांना भावत होती. वर्तमानपत्रे, नियतकालिके, मुशायरे यामध्ये प्रकाशित वा सादर केलेल्या गझलांना रसिक भरभरून दाद देत होते. गझलकार म्हणून मी समाधानी होतो. परंतु माझ्यातला कवी मात्र अस्वस्थ होत होता. अनेक विषय ज्यांना समाजमनापर्यंत पोहचवणे गरजेचे होते, पण गझलेच्या तंत्रमर्यादांमुळे मनाप्रमाणे व्यक्त होता येत नव्हते. तसाही सुरवातीपासून मी अनेक काव्यप्रकार हाताळत होतोच. त्यामुळे गझलेसोबत मुक्तछंद, मुक्तके, अभंग, गीते, कविता यातूनही व्यक्त होत होतो. साधारणतः १९९० चा काळ असेल. त्यावेळी जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. कॉमर्सचा प्राध्यापक असल्यामुळे येणाऱ्या पिढीसमोरील आव्हाने आणि होणारे परिणाम डोळ्यासमोर तरळू लागले. २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर १९९१ ह्या तीन दिवसात 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' ही मुक्तछंदातील दीर्घ कविता लिहून झाली. गझलेची शिस्त आणि नेमकेपणाचा फायदा इथे झाला. पुढे ती १९९४ साली 'कविता-रती'च्या जुलै-ऑगस्ट ह्या अंकात प्रसिद्ध झाली. कवितेच्या सुजाण वाचकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला.
रसिक हा चोखंदळ असतो. त्यालाही वैविध्य हवं असतं. हे पटलं होतं. त्यामुळे कविमनाने मुक्तछंदाकडे मोर्चा वळवला. मर्ढेकर, सुर्वे, बालकवी, आदींचे वाचन संस्कार मनावर होतेच. त्यामुळे संख्यात्मक निर्मितीपेक्षापेक्षा गुणात्मक आणि मूल्यात्मक सृजन झाले पाहिजे हा विचार रुजलेला. मनातील भाव व्यक्त होण्यासाठी कोणता काव्यप्रकार योग्य असेल, याचे संकेत त्या क्षेत्रातील आपला अनुभव आपल्याला देत असतो. साधारणतः १९८१ ते १९९९ या कालावधीत गझलेसोबत मुक्तछंदातही बऱ्याच कविता लिहून झाल्या. परिणामस्वरूप १४ जानेवारी २००१ ला 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' या संग्रहाचे प्रकाशन झाले.
वाचकांचे उदंड प्रेम या काव्यसंग्रहाला मिळाले. काही नोंदी अशा-
 'ललित' मासिकाने केलेली मार्च २००१ च्या 'लक्षवेधी' पुस्तकात निवड.
 'कविता-रती'च्या 'मार्च-एप्रिल व मे - जून' २००१ ह्या अंकात डॉ. किशोर सानप यांनी संग्रहावर केलेली दीर्घ समीक्षा.
 नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या 'आजचा सुधारक' मासिकाच्या नोव्हेंबर २००१ च्या मुखपृष्ठावर या संग्रहातील ‘ग्रीटिंग कार्ड’ ही कविता झळकली.
 फेब्रुवारी २००२ मध्ये नागपूर येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुकर वाकोडे यांनी त्यांच्या छापील अध्यक्षीय भाषणात 'तान्ह्या मुला' ह्या कवितेच्या ओळी उद्धृत केल्या.
ह्या संग्रहाला मिळालेले पुरस्कार-
 वि. सा. संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध स्मृती काव्य पुरस्कार .
 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी यशवंत पुरस्कार.
 पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार.
 संजीवनी खोजे स्मृती काव्य पुरस्कार.
 भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार.
 यशवंतराव चव्हाण साहित्य प्रतिष्ठानचा पुरस्कार.
 'तुका म्हणे' काव्य पुरस्कार.
 बापूसाहेब ढाकरे स्मृती काव्य पुरस्कार.
 प्रसाद बन प्रतिष्ठानचा ग्रंथ गौरव सन्मान.

हे इथे सविस्तर सांगण्याचे कारण एकच की, १९८५ ते २००३ या १८ वर्षांच्या काळात मी फक्त १९ गझला पूर्ण करू शकलो. तरीपण माझ्यातला कवी आणि त्याची कविता वेगळ्या फॉर्म मधून तेवढ्याच ताकदीने व्यक्त होत होती. याच काळात मराठी विषयात एम. ए. केल्यानंतर कोरकु आदिवासींच्या मौखिक गीतावर पीएच डी करिता संशोधन कार्य करीत होतो. आदिवासींचे जीवनानुभव शब्दात बांधण्याचा प्रयत्न करीत होतो. लोकगीतांच्या आक्षरछंदातील 'मेळघाटच्या कविता' लिहीत होतो. संत तुकाराम पचविण्याचाही प्रयत्न चालूच होता. दैनिक लोकमत मधील 'चार ओळी तुझ्यासाठी' हा पहिल्या पानावरचा कॉलम २००२ मध्ये चालवीत होतो. या सर्व मुक्तकांचा संग्रह २००३ मध्ये प्रकशित केला. तरुणांमध्ये तो विशेष गाजला. स्वतः अंध असलेली कु. योगिता काळे हिला यातील मुक्तके अतिशय भावली होती. म्हणून २००७ मध्ये हा संग्रह तिने अंधांसाठी ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून दिला. ती सध्या अहमदनगर येथे बँकेत कार्यरत आहे. या संग्रहाच्या प्रकाशन समारंभात अभिनेते मिलिंद शिंदे आणि चित्रपटाचे कला दिग्दर्शक अरुण रहाणे यांची विशेष उपस्थिती होती.
एव्हाना माझा पहिला गझलसंग्रह 'गुलाल' जो १९८९ मध्ये शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केला होता, त्याची प्रथमावृत्ती संपून बराच काळ लोटला होता. प्रकाशक आणि वितरकांकडेही गुलालच्या प्रती उपलब्ध नव्हत्या. बरेच जण झेरॉक्स काढून दुधाची तहान ताकावर भागवत होते. अनेकांना गझला तोंडपाठ होत्या. कविसंमेलने, मुशायऱ्यांमध्ये गझलेचे शेर सादर करून सूत्र संचालक वाहवा मिळवत होते. मनस्वी भरून पावलो होतो. मागच्या १८ वर्षातल्या १९ गझलांना कुठे स्थान द्यावे हाही प्रश्न माझ्यासमोर होताच. त्यामुळे 'गुलाल आणि इतर गझला' हा संग्रह मी स्वतःच २००३ मध्ये प्रकाशित केला. त्यात 'गुलाल' नंतरच्या गझला, मान्यवर साहित्यिकांचे अभिप्राय आणि त्यांच्या पत्रांना अंतर्भूत केले. या संग्रहाच्या देखण्या मुखपृष्ठावर वि.वा. शिरवाडकर, पु.ल. देशपांडे, ना.घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर यांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय घेतल्यामुळे मुखपृष्ठही ‘वाचनीय’ झाल्याची बाब अनेक मान्यवरांनी कळविली. नाशिक येथे २००३ मध्ये झालेल्या गझलसागर प्रतिष्ठानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या हस्ते 'गुलाल आणि इतर गझला' हा गझलसंग्रह प्रकाशित झाला.
१४ मार्च २००३ ला सुरेश भट गेले. नव्याने गझल लिहायला शिकणारी पिढी एका मार्गदर्शकाला मुकली. भटांच्या समकालीन आणि मार्गदर्शनाखाली लिहिणारे मोजकेच गझलकार होते. बहुतेकांनी भट गेल्यानंतर खऱ्या अर्थाने गझलेची वाट शोधायला सुरुवात केली. काहींना वाट भेटली. काही भरकटले. गझलकार, कवी त्यातही पेशाने प्राध्यापक आणि वृत्तीने संशोधक असल्यामुळे गझलेचा इतिहास आणि प्रवास यावर अभ्यास सुरू होताच. सोबतच तुकाराम गाथा, उर्दू शायरांचे दीवान, मराठी गझलकाराचे संग्रह यांचा तुलनात्मक अभ्यास देखील चालू होता. अनेक वाङ्मयीन नियतकालिकांतून मराठी गझलेच्या विविध पैलूंवर लेख लिहिणे सुरू होते. सोबतच अभंग आणि गझलाही लिहिल्या जात होत्या. अर्थात माझ्या नेहमीच्या गतीने.
मराठी गझलेच्या प्रसारासाठी भटांनी 'गझलेची बाराखडी' दिली. गझलेचा आकृतीबंध आणि लेखनाचे नियम यावर समर्पक मांडणी त्यांनी ‘बाराखडी’ मध्ये केली. महाराष्ट्र लिहिता झाला. नवोदित कवी गझलेकडे वळत होते. मदतीला 'बाराखडी' होतीच. आकृतीबंधानुसार लेखन होत होते. अनेक गझल सदृश्य रचना पोस्टाने माझ्याकडे अवलोकन आणि मार्गदर्शनासाठी येत होत्या. 'गझल वृत्तात नाही. पुनर्लेखन करावे.' असा शेरा मारून मी त्या परत पाठवत होतो. त्यातले रविप्रकाश चापके, श्रीराम गिरी अकोल्याला येऊन प्रत्यक्ष भेटले. तसेच आमच्या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी सुधीर राऊत, अमित वाघ, रुपेश देशमुख, अमोल शिरसाट, अभिषेक उदावंत हे सर्व गझल लेखनाचे प्रारंभिक धडे गिरवत होते. सर्वांचे म्हणणे एकच होते - ‘बाराखडीत सांगितल्यानुसारच आम्ही लिहितो आहे. कुठे चुकले ते सांगावे’. मार्गदर्शनासाठी आलेल्यांना वृत्त आणि लगावली समजून सांगितली. समाधान केले. आणि पुन्हा बाराखडी वाचायला हाती घेतली. सूक्ष्म अवलोकन केल्यानंतर लक्षात आले की, कवीला मराठी व्याकरण, वृते माहीत असतातच असे गृहीत धरून कदाचित बाराखडी लिहिल्या गेली असावी. परत नवोदित कवीच्या भूमिकेतून बाराखडीचा अभ्यास सुरू झाला. गझल अभ्यासक म्हणून बाराखडीतील सुटलेल्या दुव्यांचा शोध सुरू झाला. नवोदितांसाठी आवश्यक पण बाराखडीमध्ये स्पष्ट न झालेल्या मुद्द्यांची नोंद घेत होतो. स्पष्टीकरणे लिहीत होतो.
याच दरम्यान २००४ मध्ये गझलसागर प्रतिष्ठानने अमरावती येथे तिसरे अ.भा. मराठी गझल संमेलन घेतले. 'मराठी गझल - तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला. यात सहभागी होऊन मार्गदर्शन करण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले. आणि ज्या विषयावर मी टिपणे काढीत होतो, त्याच विषयावर बोलण्याची संधी चालून आली. सुरेश भटांच्या 'गझलेची बाराखडी'वर शास्त्रशुद्ध, तर्कसंगत आणि विश्लेषणात्मक भाष्य करणारा 'मराठी गझल- तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ या शीर्षकाचा दीर्घ लेख तयार झाला. मुद्देसूद मांडणी आणि आकलनसुलभ भाषेमुळे हा लेख गझलेच्या क्षेत्रातील नवोदितांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरला. हा लेख पुरूषोत्तम पाटील संपादित 'कविता-रती' या केवळ कवितेला वाहिलेल्या निखळ वाङ्मयीन नियतकालिकाच्या 'दिवाळी विशेषांक-२००४' मध्ये प्रकाशित झाला. 'गझलकार' आणि 'माझी गझल मराठी ' ह्या दोन्ही ब्लॉगवर तो आजही अभ्यासकांसाठी ठेवला आहे. हा लेख संग्रही ठेवण्यासाठी पुस्तिकेच्या स्वरूपात अभ्यासकांना देखील उपलब्ध करून दिल्या गेला होता.
अकोला जिल्ह्यातील हातरूण या गावचे माझे आध्यात्मिक गुरू नाथमहाराज. त्यांच्यावर लिहिलेल्या गीतांना मुंबईचे गुणी संगीतकार कुंदन भालेराव यांनी सुश्राव्य चाली लावून स्वरबद्ध केलं. तो अल्बम 'नाथ माउली'. त्यात माझी पाच गीते सुरेश वाडकर, उत्तरा केळकर यांनी गायली आहेत. आमच्या पंचक्रोशीतले भक्तगण ती गाणी अजूनही म्हणतात. ते ऐकताना धन्य झाल्यासारखं वाटतं. त्यात नाथ बाबांवरची एक गझलही आहे-
‘घेतात दु:खीतांचा कैवार नाथ बाबा
देतात  दुर्बलांना  आधार  नाथ बाबा’
माझा पहिला ब्लॉग: माझी गझल मराठी
याच काळात इंटरनेट कॅफे बऱ्यापैकी अस्तित्वात आले होते. मोजक्या लोकांकडे मोबाईल दिसू लागले होते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे माझा कल होताच. कॉम्प्युटर, इंटरनेट, त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर हाताळणी नेटाने शिकलो. 'माझी गझल मराठी' हा माझ्या गझलांचा ब्लॉग २००७ मध्ये तयार केला. आजवर लिहिलेल्या माझ्या सर्व गझला त्या ब्लॉगवर आहेत. ज्यांच्या लेखनाच्या तारखा आणि पूर्व प्रकाशनाच्या नोंदी उपलब्ध झाल्या त्या संबंधित गझलांच्या खाली दिल्या आहेत. गझलसाठी मिळालेल्या पुरस्कारांचा आणि मान्यवर गायकांनी गायिलेल्या गझलांच्या व्हिडिओ क्लीप्स ब्लॉगवर आहेत. या सर्वांचे डिजिटल डाक्युमेंटेशन तंत्रस्नेही होऊ लागलेल्या नव्या पिढीला जगभरात कुठेही, कधीही आणि केव्हाही ह्या ब्लॉगच्या निमित्ताने उपलब्ध झाले. गझलसोबत मी लिहिलेल्या इतर कविता, लेख, माझ्या गझलांची-कवितांची समीक्षा असे स्वतंत्र ब्लॉग्ज करून ते 'माझी गझल मराठी' ह्या ब्लॉगला जोडले. हा ब्लॉग म्हणजे माझ्या साहित्यिक जीवनाचा आरसा म्हणल्यास वावगे ठरणार नाही. माझे साहित्य माझ्या चाहत्यांपर्यंत विनामूल्य आणि विनासायास पोहचावे हा एकमात्र विचार त्यामागे होता. आजपर्यंत त्या ब्लॉगची १,३१,००० पेक्षा जास्त पृष्ठदृश्ये झालेली आहेत.
अभ्यासू मार्गदर्शकांची वाणवा तेंव्हाही होतीच. त्यामुळे नवोदितांना मार्गदर्शन, गझलेचा प्रसार आणि प्रचार व्हावा या निखळ उद्देशाने एखादा ब्लॉग इंटरनेटवर असावा असे वाटले. माझे आवडते शायर सुदर्शन फाकीर १८ फेब्रुवारी २००८ ला वारले. वर्तमानपत्रात केवळ पाच-सात ओळीची बातमी होती. त्यांचे गझल क्षेत्रातील योगदान जगाला कळावे यासाठी त्यांच्यावर श्रद्धांजलीपर लेख तयार केला. आणि त्या लेखाने 'गझलकार' नावाचा दुसरा ब्लॉग १ मार्च २००८ ला अस्तित्वात आला.
गझलेसंबंधी सर्व काही एकाच ठिकाणी मिळावे या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. गझलेसंबंधी उपलब्ध लेखांचा शोध सुरू झाला. ते ब्लॉगवर टाकण्यात आले. गझलसम्राट सुरेश भट, मा. अहमद फराज, सुप्रसिद्ध उर्दू शायर सुदर्शन फाकीर इ. उर्दू आणि मराठीतील ख्यातनाम गझलकारांवरील महत्वाचे लेखही ब्लॉगवर ठेवले गेले. एकूणच गझलेसंबंधी सबकुछ एका क्लिक वर मिळाल्यामुळे अल्पावधीतच हा ब्लॉगसुद्धा वाचकांत लोकप्रिय झाला.
रसिकांच्या फीडबॅक मुळे ब्लॉगबद्दलचा आत्मविश्वास वाढत होता. लगेच सप्टेंबर मध्ये 'गझलकार' ब्लॉगचा विशेषांक काढायचे निश्चित केले. विजयादशमीच्या गोरज मुहूर्तावर प्रकाशन करायचे ठरवले. मदतीला कुणीही नव्हते. रात्र-रात्र जागून विशेषांक तयार केला. दसऱ्याला सीमोल्लंघनाचे विशेष महत्त्व. म्हणून 'गझलकार सीमोल्लंघन' असे नामकरण केले. ख्यातनाम संगणक तज्ज्ञ आणि चतुरस्त्र लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते विशेषांकाचे ९ ऑक्टोबर २००८ च्या विजयादशमीला मुंबईत ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. मराठी गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी खारीचा वाटा उचलल्याचे मनोमन समाधान वाटत होते.
त्यानंतर 'गझलकार सीमोल्लंघन'चे विशेषांक दरवर्षी नियमित प्रकाशित होत आहेत. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फक्त २०१६ आणि २०१७ ह्या दोन वर्षाचे अंक निघू शकले नाहीत. अशी अडचण भविष्यात येऊ नये म्हणून संपादक मंडळाचा विस्तार करायचे ठरवले. सोबतीला मित्रवर्य शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि उत्साही गझलकार विद्यार्थी अमोल शिरसाट आल्यामुळे या मोहिमेला बळ प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या २०२० मधील 'गझलकार सीमोल्लंघन' विशेषांकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या ब्लॉगची आजपर्यंत १,५०,००० पेक्षा जास्त पृष्ठदृश्ये झालेली आहेत.
'गझलकार' ब्लॉगला मिळालेल्या यशाची मी स्वतः तटस्थ मीमांसा करतो तेंव्हा असे लक्षात येते की, नव्याने गझल शिकणारे कवी तथाकथित गुरु परंपरेच्या वाटेला न जाता इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचवण्याचे कामही आमच्या पिढीला करायला पाहिजे. हाच दृष्टिकोन ठेऊन ब्लॉगवर विविध वृत्ते, त्या वृत्तातील लवचिकता, मराठी गझलांचे गुजराती अनुवाद, गझल गायकी पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. देश-विदेशातील मराठी काव्यरसिक आवडीने या ब्लॉगवरचे साहित्य वाचतात. जपान, सॅनफ्रान्सिस्को, स्टॅव्हेंजर, ते अर्जेंटिना पर्यंत आता 'गझलकार' पोहचला आहे.
वाङ्मयीन नियतकालिकांतून माझ्या गझलांना महाराष्ट्रभर मान्यता मिळत होती. तसेच 'मराठी गझल: तंत्रशुद्धता की तंत्रशरणता’ या संशोधनपर लेखामुळे गझल अभ्यासक म्हणून ख्याती सर्वदूर पसरली होती. अशातच विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या नागपूरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मिळाले. संमेलनात दुसऱ्या दिवशी गझलेचे स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले होते. कविवर्य स्व. सुरेश भट स्मृती गझलवाचन सत्राच्या
अध्यक्षपदाचा बहुमान माझ्याकडे चालून आला होता. ४ फेब्रुवारी २००७ ला नागपूरच्या दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या सभागृहात सायंकाळी ते सत्र होणार होते. त्या दिवशी सकाळीच अजून एक महत्वाची अनपेक्षित घटना घडली. योगेश बऱ्हाणपुरे माझ्याकडे आले. ते म्हणाले, साहित्य प्रसार केंद्राने नुकताच सुरेश भटांचा 'रसवंतीचा मुजरा' हा काव्यसंग्रह छापला आहे. त्याचे प्रकाशन आपल्या हस्ते व्हावे अशी इच्छा आहे. माझ्या सन्मानात आणखी एक तुरा खोवल्या जाणार होता. माझ्या कवितेच्या पहिल्या मानधनात ज्यांचा 'रंग माझा वेगळा' हा संग्रह मी विकत घेतला होता, त्या कविवर्य सुरेश भट यांच्या शेवटच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माझ्या हस्ते. हा योगायोग अद्वितीय होता. मी बऱ्हाणपुरेंना म्हटले, संयोजकांची रीतसर परवानगी असेल तर माझी काहीच हरकत नाही. माझ्यासाठी ही परमभाग्याची गोष्ट आहे. संयोजकांची रीतसर परवानगी मिळाली आणि सत्राच्या प्रारंभी प्रकाशन करण्याचे निश्चित झाले. 'रसवंतीचा मुजरा' या भट साहेबांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन स्व. सुरेश भट गझल वाचन सत्रात माझ्या हस्ते संपन्न झाले. गझलवाचन सत्र अत्यंत देखणे झाले. अध्यक्षीय समारोप करतांना मी माझी एक गझल सादर केली. गझलेचा मतला होता-
'ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल;
हात माझा  घेत  हाती  प्रेयसी  झाली गझल.'
या गझलेचा शेवटचा शेर मी कविवर्य सुरेश भटांना अर्पण केला. त्या शेराच्या सादरीकरणानंतर रसिकांच्या टाळ्यांनी दिलेला प्रतिसाद मी विसरू शकणार नाही. सात-आठ मिनिटे झालेला टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट आजही मला जसाच्या तसा आठवतो. सुरेश भटांना अर्पण केलेला तो शेर होता-
‘पोचलो  स्वर्गात  मी  पण खंत आहे अंतरी;
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल’
आपण जे लिहितो ते थेट रसिकांच्या काळजापर्यंत पोहचते आहे, हे पदोपदी अनुभवत होतो. मराठी गझल अभ्यासक जेंव्हा आपल्या गझलेवर वाङ्मयीन मूल्य आणि योगदानाच्या दृष्टिकोनातून लिहितात तेंव्हा गौरवान्वित प्रतीत होते. डॉ. अविनाश सांगोलेकर हे त्यापैकीच एक. माझा एकूणच गझलप्रवास त्यांनी जवळून पाहिला होता. त्यांच्या लेखात त्यांनी 'श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल' या मथळ्याखाली माझ्या गझलप्रवासाचा तपशीलवार लेखाजोखा मांडला. हा लेख महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेने ऑक्टोबर-डिसेंबर, २००७ च्या अंकात छापला. त्या लेखात डॉ. अविनाश सांगोलेकर लिहितात-
‘श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल ही तंत्रशुद्ध आणि अस्सल मराठमोळ्या मराठी गझलेचा जिताजागता नमुना आहे. विदर्भाने मराठी गझलसृष्टीला अमृतराय, उ.रा. गिरी, सुरेश भट ह्यांच्यासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार दिले; डॉ. राम पंडितांसारखे तळमळीचे गझल अभ्यासक दिले. श्रीकृष्ण राऊत हे ह्याच विदर्भातील आहेत आणि ते विदर्भाची ही उज्वल परंपरा पुढे नेतील, इतकेच नव्हे तर ही परंपरा अजून अधिक उज्ज्वल करतील असा भरंवसा त्यांच्या गझलेतून मिळत राहतो. त्यांच्या गझलेचे स्वागत सुरेश भट, वि.वा. शिरवाडकर, पु.ल. देशपांडे, ना.घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर अशा अनेक दर्दी ज्येष्ठांनी केलेले आहे’.
सुधाकर कदम, भीमराव पांचाळे यांच्यासह अनेक प्रथितयश गायकांनी माझ्या गझल आणि चित्रपट गीते गायली होती. अनेकांना गझलेतील लय आणि शब्द वेड लावीत होते. त्यातलाच एक म्हणजे गझलगायक रफिक शेख. लोकप्रभाच्या १९८६ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली आणि नंतर 'गुलाल आणि इतर गझला' या संग्रहात समाविष्ट केलेली-
'तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी
चंद्र असावा मिठीत  अन्  धुंदीत रहावे ओठांनी'
ही गझल त्यांना खूपच आवडली. इतकी आवडली की ते म्हणाले, सर, स्टुडिओच्या रेकॉर्डिंगचं सर्व मी बघतो, तुम्ही फक्त परवानगी द्या. मी परवानगी दिली. थेट काळजात उतरेल अशी तलम मुलायम चाल रफिक शेख यांनी लावली. या गझलेने तरुण पिढीला अक्षरशः वेड लावले.
गझलेसाठी ‘जीवन गौरव’ पुरस्कार
'तुझ्या गुलाबी ओठांवरती' या रफिक शेखने गायलेल्या गझलेची धुंदी अजून उतरायची होती. अशातच मौलिक मराठी गझल लेखनाकरिता बांधण जन प्रतिष्ठान, मुंबईचा 'जीवन गौरव' पुरस्कार मला जाहीर झाला. त्याचे वितरण ९ जानेवारी २०११ ला ठरले. मला मनोमन आनंद झाला. केंद्र सरकारचे तत्कालीन ऊर्जामंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार होता.
पुरस्काराचा दिवस उजाडला. हा कार्यक्रम अमरावतीच्या ज्ञानेश्वर संकुलात आयोजित करण्यात आला होता. मला एका गोष्टीचे नवल वाटले, पुरस्कार देणारी संस्था मुंबईची. ज्याला मिळाला तो अकोल्याचा. ज्यांच्या हस्ते मिळणार ते ऊर्जामंत्री दिल्लीचे. आणि समारंभ अमरावती मध्ये. यालाच योगायोग म्हणावा. 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आधीही पुण्याला एक पुरस्कार मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते घेतलेला होता. हे आठवले. पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला, तो असा- 'मा. सुशीलकुमार शिंदे साहेब, आपण ऊर्जामंत्री. आपल्या हातून दुसऱ्यांदा पुरस्कार स्वीकारतांना पुन्हा नवी ऊर्जा मिळाली आहे, ती भविष्यात अधिक चांगलं लिहिण्यासाठी.
पुरस्काराच्या रकमेचा विनियोग औचित्यपूर्ण व्हावा अशी इच्छा होती. वाङ्मयीन मूल्य जपतच काव्य चळवळीस बळ देणाऱ्या एखाद्या नियतकालिकास देणगी द्यावी हा विचार दृढ झाला. 'कविता-रती' या नियतकालिकाचे संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील व्रतस्थपणे केवळ कवितेला वाहिलेले व्दैमासिक १९८५ पासून चालवत होते. पुरस्काराच्या रकमेत काही स्वतःचे पैसे टाकून ते 'कविता-रती'ला देणगी म्हणून देत असल्याचे सत्काराच्या उत्तरात जाहीर केले. पुरस्कारानंतर रात्रीच्या मैफिलीत सुप्रसिद्ध गझल गायक मदन काजळे यांनी माझी एक गझल त्यांच्या अनोख्या ढंगात सादर केली-
‘तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
तुझे  चाहते  कोण  जाणे  किती’
गझल संपताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माझ्या गझलेवर अनेकांनी वृत्तपत्रातून भरभरून लिहिले. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. मधुकर वाकोडे , डॉ. किशोर सानप, वसंत केशव पाटील, बाबाराव मुसळे, सदानंद डबीर, डॉ.अशोक इंगळे, डॉ. राजेंद्र मुंढे, कमलाकर देसले, नरेंद्र लांजेवार, डॉ. किशोर फुले, प्रा. राहुल माहुरे, अभिषेक उदावंत आदींचा समावेश होता. यापैकी डॉ. मधुकर वाकोडे यांनी केलेले भाष्य मला अधिक प्रेरणा देणारे होते- ‘संतांचे अभंग असोत किंवा पंडितांचे श्लोक असोत. कविची कविता असो किंवा शायरची गझल असो; कालातीत असण्याचा एक मोठा मापदंड म्हणजे ह्या रचनांना लाभलेले सुभाषितांचे सामर्थ्य! श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेतील कितीतरी शेर, कितीतरी चरण सुभाषितांच्या पातळीवर वावरतात’.
पहिला गझल अल्बम : तसा न चंद्र राहिला
दिनेश अर्जुना हा हिन्दी सिनेमाचा आजचा प्रथितयश संगीतकार. माझ्या कॉलेजचा विद्यार्थी. वेगवेगळ्या भावगीत स्पर्धेतून हमखास पहिला नंबर घ्यायचा. एक दिवस तो म्हणाला, सर मला तुमची गझल द्या. मी कंपोझ करतो. ही गोष्ट असेल १९८३-८४ ची. त्याच्या डोळ्यात मला कमालीचा आत्मविश्वास दिसला. एक गझल दिली. दिनेशने कंपोझ केलेली पहिली गझल-
‘तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली
अजूनही  तशीच  तू  तनामनात  राहिली’
भारदस्त आवाज आणि लोभस व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दिनेशने २०१२ मध्ये याच गझलेच्या ओळीच्या शीर्षकाने ‘तसा न चंद्र राहिला' हा माझ्या सात गझलांचा सुरेल अल्बम काढला. रसिक श्रोत्यांना तो खूप आवडला. आजही त्या गझला वारंवार ऐकल्या जातात. गुणगुणल्या जातात. दिनेशने गझल गायन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतही केले आहे. अनेक अल्बम, चित्रपट, मैफली त्याने गाजवल्या आहेत.
मराठी गझलेला रसिक मान्यता मिळत होती. परंतु समीक्षेच्या अंगाने तिच्याकडे दुर्लक्ष होत होते. यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन मराठी गझलेचा प्रवास समोर ठेवणे गरजेचे होते. तसा आग्रह सर्व स्तरांतून होत होता. डॉ. राम पंडित यांच्यावर ही जबाबदारी साहित्य अकादमीने सोपवली. मराठी गझलेची वाटचाल उणीपुरी ५० वर्षांची. साहित्य अकादमीने २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या 'मराठी गझल अर्धशतकाचा प्रवास' या पुस्तकाला पंडितांची अभ्यासपूर्ण प्रदीर्घ प्रस्तावना आहे. पन्नास वर्षांतील एकेचाळीस गझलकारांच्या प्रत्येकी पाच गझलांचा समावेश यामध्ये केला आहे. मराठी गझलेच्या वाङ्मयीन प्रवासाची नोंद घेणाऱ्या या पुस्तकात माझ्या पाच गझलांचा समावेश करण्यात आला आहे. साहित्य अकादमीच्या नियमाप्रमाणे जन्मतारखेनुसार गझलकारांचा क्रम या पुस्तकात लावला आहे. मराठी गझलच्या इतिहासात हा प्रातिनिधिक संग्रह अत्यंत महत्वाचा आहे.
‘ज्ञानगंगेचा भगीरथ’ साठी पटकथा, संवाद आणि गीतलेखन 
एक महत्वाची जबाबदारी २०१४ मध्ये माझ्यावर येऊन पडली. ती होती डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते लिहिण्याची. या चित्रपटाची निर्मिती अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त करणार होते. आणि संगीत दिग्दर्शन सुप्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक यांच्याकडे सोपवले होते. भाऊसाहेबांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे क्षण चित्रित केल्या जात होते. भाऊसाहेब आणि विमलाबाई यांच्या लग्नापूर्वीच्या भेटीचा प्रसंग. परस्परांना समजून घेण्यातली दोघांची ध्येयनिष्ठ समर्पणाची भावना चित्रित करायची होती. पंजाबरावांनी १९२७ मध्ये मुंबईच्या विमलाबाईंशी आंतरजातीय विवाह केला होता. पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यांत त्या हिरिरीने भाग घेत असत. हे सर्व सांगणारे गीत राजदत्तांना हवे होते. अशा आशयाची एक गझल मी आधीच लिहिलेली होती-
'समर्पणाची  पूर्ण  तयारी  प्रेम  मागते
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते'
ती त्यांना ऐकवली. त्यांना खूप आवडली. मोडकांना ऐकवली गेली. भाऊसाहेबांचा काळ म्हणजे नाट्यगीतांचा काळ. त्यामुळे त्या काळाच्या संगीतानुरूप चाल असावी यासाठी दिग्दर्शक राजदत्त आग्रही होते. मोडकांनी तशीच अप्रतिम चाल लावली. सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे यांनी ती गायली. हा माझ्या गझलेचा सन्मान होता.
यू आर एल फाऊंडेशनचा 'गझल गौरव' पुरस्कार
माझ्या गझलप्रवासातील २०१४ हे वर्ष मैलाचा दगड ठरण्याचे अजून एक कारण म्हणजे याच वर्षी यू आर एल फाऊंडेशन, मुंबई कडून मिळालेला 'गझल गौरव' पुरस्कार. साहित्यप्रेमी श्री उदयदादा लाड यांची ही संस्था. मराठी गझल या काव्य प्रकारातील विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिल्या गेला. पुण्याच्या एस एम जोशी सभागृहात १५ एप्रिल २०१४ रोजी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. सिंधूताईंबद्दल माझ्या मनात विशेष आदर. अनाथांसाठी कार्य करीत असताना त्यांना भरपूर फिरावे लागायचे. कार्यक्रम असायचे.
अकोल्यातल्या भेटीत माईंनी माझ्या वहीतून एक गीत लिहून घेतले. त्यांना ते इतके आवडले की, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या आवर्जून लोकगीताच्या ढंगाने ते गीत सादर करायच्या. या पुरस्कार सोहळ्यातही त्यांनी ते गीत माझ्या विनंतीवरून सादर केले-
'गेला फुटून ऐना स्वप्नात जीवनाचा
हा स्वप्नभंग ऐसा होऊ नये कुणाचा'
आणि हा सोहळा अविस्मरणीय झाला. या अपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होते दिग्दर्शक राजदत्त, गझलगंधर्व सुधाकर कदम, संगीतकार स्व. रवि दाते, रामदास फुटाणे, स्व. अनंत दीक्षित आणि इतर अनेक मान्यवर. या निमित्ताने प्रा. मधु जाधव यांनी अकोल्याच्या 'सिटी न्यूज' मध्ये लेख लिहिला. त्याचे शीर्षक होते - 'श्रीकृष्ण राऊत यांचा गझलगौरव'.
गझलकार म्हणून मिळत असलेली प्रसिद्धी दिवसेंदिवस जबाबदारी वाढवत होती. नवी पिढी जोमाने गझल लेखनाकडे वळली होती. उत्तम लिहिणाऱ्या हातांना गती देण्याची गरज होती. अशातच दै. सामना कडून गझलेवर एखादे सदर सुरू करता येईल का अशी विचारणा झाली. विचाराला दिशा मिळाली. तरुण गझकारांच्या उत्तम शेरांवर आस्वादात्मक समीक्षेच्या अंगाने भाष्य करावे असे ठरले. सामनाच्या 'फुलोरा' पुरवणीत प्रकाशित होणाऱ्या या सदराचे शीर्षक होते 'गझलाई’. २०१५ या वर्षात केलेल्या या स्तंभलेखनाच्या माध्यमातून सकस लिहिणाऱ्या गझलकारांच्या उत्तम शेरांचे
विश्लेषण करता आले. वर्तमानपत्र स्तंभलेखनाच्या माध्यमातून केलेला हा अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग होता.
‘तुको बादशहा’ आणि ‘चकव्यातून फिरतो मौनी’चे संपादन
गेल्या अनेक वर्षांपासून संत तुकाराम यांची गाथा वाचत होतो. अभ्यासत होतो. त्यामुळे  अभंग लिहिण्याची प्रेरणा मिळत होती. दरवेळी तुकाराम नव्याने कळत होते. शब्दरुपाने माझ्या अभंगातून कागदावर उतरत होते. अभंग संग्रह निघू शकेल एवढ्या अभंग रचना तयार होत्या. सन्मित्र शामनाथ पारसकर, श्रीधर अंभोरे, सुरेशकुमार वैराळकर यांनी अभंग संग्रह काढायलाच हवा. असा आग्रह धरला. शेवटी माझा नाईलाज झाला. आणि ‘तुको बादशहा’ चे काम सुरु झाले. एकूण १०० अभंग रचना या संग्रहात घेतल्या. पुण्याच्या अक्षर मानव प्रकाशनाने प्रकाशनाची जबाबदारी उचलली. आणि २०१५ मध्ये संग्रह प्रकाशित झाला. श्रीधर अंभोरे यांनी मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे काढली. भालचंद्र नेमाडे, सदानंद मोरे आणि किशोर सानप या तुकाराम भक्तांना अर्पण केलेल्या या संग्रहास डॉ. सदानंद मोरे याची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. 'तुको बादशहा' अभंगसंग्रहाला वर्ध्याच्या दाते संस्थेचा ‘संत भगवानबाबा काव्य पुरस्कार’ २०१९ मध्ये देण्यात आला. मी हा पुरस्कार तुकारामांनी दिलेल्या जीवनानुभवांना अर्पण केला. 
माझ्या गझलेचे पहिले रसिक आणि गझलगायक सन्मित्र गझलगंधर्व सुधाकर कदम याच्या सांगीतिक कारकीर्दीवर आधारित 'चकव्यातून फिरतो मौनी' या सन्मान ग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी मी स्वीकारली. जवळपास ५८ लेखकांचे लेख संपादनाची महत्वाची जबाबदारी कदमांनी माझ्यावर सोपविली होती. अक्षर मानव प्रकाशनाने २०१८ मध्ये तो प्रकाशित केला. प्रकाशनानंतर कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडल्याचे समाधान लाभले होते.
‘गझलाई’ आणि ‘कारुण्य माणसाला संतत्व दान देते’
प्रत्येक पुरस्कार माझी जबाबदारी वाढवत होता. पुन्हा गझल लेखनाकडे वळलो. मागील १३-१४ वर्षात लिहिलेल्या गझला पुस्तकरूपाने याव्या असा अनेक मित्रांचा तगादा होता. पण संथ गतीचा माझा स्वभाव नेहमी आडवा यायचा. याच दरम्यान मी ज्यांच्या शेरांवर दै. सामना मधील ‘गझलाई’ स्तंभातून लिहिले होते असे नवोदित गझलकार मित्र भेटायचे. सर, 'गझलाई'चे पुस्तक करा असा आग्रह धरायचे. नव्या पिढीला गझलेतील शेर, प्रतीके, प्रतिमा आणि त्यावरील भाष्य या अंगाने 'गझलाई' हे वाचकप्रिय सदर होते. सकस मराठी गझल लिहिणाऱ्या ४९ नवगझलकारांच्या १९० शेरांवर साध्या, सरळ, सोप्या भाषेत केलेले भाष्य अभ्यासकांनाही उपयुक्त ठरणार होते. विचार पक्का झाला. माझा गझलसंग्रह आणि 'गझलाई' या दोन पुस्तकांच्या तयारीला लागलो. नांदेडच्या सूर्यमुद्रा प्रकाशनाने दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली. 'गझलाई' चे शीर्षक आणि लिखाण तयार होते. वर्ष २००३ ते २०१९ या दरम्यान लिहिलेल्या एकूण ७६ गझलांचा समावेश गझलसंग्रहात करावा असे ठरले. गझला तयार होत्या पण शीर्षक अजून ठरले नव्हते. विचारांती एका गझलेतील ओळ घेऊन 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हे शीर्षक नक्की झाले. 'गझलाई' ची पाठराखण गझल अभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी केली. त्यामध्ये ते लिहितात -
‘मराठी गझलांच्या सुमारे दोनशे निवडक शेरांवर भाष्य करणारं हे मराठीतलं पहिलंच पुस्तक असावं. गझलचा शेर केवळ दोन ओळींचा.पण ह्या दोन ओळीत सामावलेले असते एक अनुभवविश्व. हे अनुभुतींचं जग आपल्या रसाळ अभिव्यक्तीने उजागर केलं प्रख्यात  गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी. नव्याने  लिहू लागलेल्या  गझलकारांचं हार्दिक  स्वागत एका नामवंत ज्येष्ठ गझलकाराने करावं. त्यांना दिलखुलास दाद द्यावी. तरुणाईच्या ह्या गुणवत्तेला जाहीर मान्यता प्रदान करावी. यासाठी फार मोठं मन लागतं. उमदं व्यक्तिमत्व लागतं. राऊतांना ते  लाभलं आहे. 'गझलाई' ह्या पुस्तकाचं कोणतंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा. माझ्या म्हणण्याचा तुम्हाला प्रत्यय येईल. दै. 'सामना'च्या ‘फुलोरा' पुरवणीत दर आठवड्याला वर्षभर प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या ह्या संग्रहाला संदर्भग्रंथाचे मूल्य आहे.’
'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' या संग्रहाची पाठराखण सुप्रसिद्घ कवी, अनुवादक, समीक्षक वसंत केशव पाटील यांनी केली आहे. पाठराखण करतांना वसंत केशव पाटील म्हणतात-
‘सुरेश भटांनंतरच्या पिढीतील बिनीचे गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत यांचे स्थान उल्लेखनीय आहे. हे निर्विवाद. ‘प्रेम’ हे गझलेचे प्राणतत्त्व असले तरी राऊत त्यालाच कवटाळून बसले नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीयादी क्षेत्रांतील वास्तवामधली विसंगती व विषमता, अन्याय-अत्याचार नि वैर-विरोध अशा विविध गोष्टींचा गझलेच्या माध्यमातून ते धारदार आविष्कारही करताना दिसतात. त्यांची रचना निर्दोष नि गोळीबंद आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्या अनुभवाचे अनुभूतीमधे संपूर्ण संक्रमण होईतो अभिव्यक्तीच्या मागे लागत नाहीत आणि हा कलात्मक संयम हे त्यांचे खरे मर्मस्थान आहे’.
'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' या गझलसंग्रहावर अनेकांनी रसग्रहण आणि परीक्षणात्मक लिखाण केले आहे. प्रतिभा सराफ यांनी त्यांच्या 'दृष्टिक्षेप' या 'ललित' मधील सदरात या गझलसंग्रहाचा उत्कृष्ट परिचय करून दिला. त्याशिवाय नरेंद्र लांजेवार, अमोल शिरसाट, बदिउज्जमा बिराजदार, डॉ. गणेश गायकवाड, सतीश जामोदकर, संजय गोरडे, तान्हाजी खोडे, निलेश कवडे, विनोद गहाणे अशा अनेकांनी वृत्तपत्रात-फेसबुकवर उत्स्फूर्तपणे लिहिले.
२०१९ या वर्षी माझा विद्यार्थी सुप्रसिद्ध संगीतकार दिनेश अर्जुनाला एक मराठी चित्रपट मिळाला 'तू तिथे असावे'. त्यासाठी त्याने माझ्या एक गीताला स्वरसाज चढवला. त्या गीताचा मुखडा-
'दाराघरात माझ्या हे  सौख्य नांदणारे
आता मनात माझ्या भरती सुगंध वारे'
आजच्या आघाडीच्या गायिका वैशाली माडे आणि चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील यांनी ते गायले आहे. लेख लिहून होईपर्यंत त्या गीताला यू ट्युबवर ४,३७,००० पेक्षा जास्त वेळा पाहिल्या-ऐकल्या गेले. या गीतावर रसिकांनी भरभरून प्रेम केले.
‘गुलाल आणि इतर गझला’ची दुसरी आवृत्ती
२००३ ला प्रकाशित झालेल्या 'गुलाल आणि इतर गझला' या संग्रहाच्या प्रती संपल्या होत्या. रसिकांना तो उपलब्ध करून देणेही गरजेचे होते. या संग्रहाची सुधारित आवृत्ती २०२० मध्ये संवेदना प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली. या आवृत्तीची पाठराखण ज्येष्ठ गझल समीक्षक डॉ. राम पंडित यांनी केली आहे. ते लिहितात-
‘हिन्दीचे प्रतिभावान गझलकार दुष्यंत कुमार ज्याप्रमाणे केवळ पन्नासेक गझल सृजनाच्या बळावर आपले स्वतंत्र स्थान राखून आहेत, त्याचप्रमाणे राऊत यांनीही प्रदीर्घ कालावधीत साठ-सत्तर वाङ्मयीन मूल्य असलेल्या गझल सृजनाद्वारे आपली स्वतंत्र ओळख मराठी गझलक्षेत्रात निर्माण केली आहे. ज्येष्ठ मराठी कवी व साहित्यिक कुसुमाग्रज,  ना.घ. देशपांडे, पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर सारख्यांनी राऊत यांच्या गझलांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. याला कारण राऊत यांच्या गझलेतील मौलिकता व अनुभवाधिष्ठित अभिव्यक्ती होय’.
‘कविता-रती’ जानेवारी-फेब्रुवारी, २०१५ च्या अंकात डॉ. राम पंडित यांनी पहिल्या आवृत्तीवर लिहिलेल्या समीक्षा लेखातून वरील उतारा घेतला आहे. 'गुलाल आणि इतर गझला' ह्या संग्रहाची ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना अगोदरच्या आवृत्तीमधील काही गझला वगळल्या आहेत. तर १९७८ ते १९८५ ह्या कालखंडातील अलीकडे सापडलेल्या काही गझला ह्या आवृत्तीत पहिल्यांदाच समाविष्ट केल्या आहेत. प्रस्तुत आवृत्तीत गझलांचा क्रम पहिल्या ओळीनुसार अकारविल्हे घेतला आहे. गझल आणि काव्यक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वर्ष २०२० मध्ये अमरावतीच्या पोटे चॅरिटेबल ट्रस्टने ‘साहित्यव्रती पुरस्कार’ देवून गौरविले. या प्रसंगी झी टिव्हीचे हास्यसम्राट, तुफान विनोदी कवितेचे बादशहा, 'जांगळबुत्ता' 'मिर्झा एक्स्प्रेस' फेम मित्रवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांची विशेष उपस्थिती होती.
संकेत माझा मोठा मुलगा. त्याच्या नोकरीसाठी १३ जुलै २०२० ला अकोला सोडून पुसदला रहायला आलो. पुसदच्या कवयित्री, लेखिका निशा डांगे यांनी माझी सविस्तर मुलाखत घेतली. नाशिकहून निघणाऱ्या 'अक्षरबंध' मासिकाच्या जून २०२१ च्या अंकात ती दीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली. तिचे शीर्षक होते - 'समाजमनाचा अचूक वेध घेणारे गझलकार, कवी, गीतकार, ब्लॉग डेव्हलपर श्रीकृष्ण राऊत'.
अभ्यासक्रमात कविता आणि गझल
शैक्षणिक वर्ष २००१ ते २०१२ या काळात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात माझी 'जो जो रे बाळा' ही कविता नेमलेली होती. शैक्षणिक वर्ष २०१२ ते २०१४ पर्यंत इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमात 'नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या’ ह्या गझलचा समावेश केल्या गेला होता. तसेच शैक्षणिक वर्ष २०१२ मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग २ च्या अभ्यासक्रमात माझी 'मुकुट' ही कविता अंतर्भूत झाली. शैक्षणिक वर्ष २०१३ पासून  'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर' ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. एस्सी. भाग १ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०१७ पासून बी. एस्सी. भाग १ च्या आवश्यक मराठीसाठी नेमलेल्या 'इशारा' ह्या पुस्तकात ‘दु:ख माझे देव झाले’ ही गझल समाविष्ट करण्यात आली आहे.
आगामी : एक चित्रपट, एक अल्बम, एक कवितासंग्रह
 ऑनलाइन मिस्टेक
'ऑनलाइन मिस्टेक' या चित्रपटासाठी संगीतकार दिनेश अर्जुनाने माझी तीन गाणी रेकॉर्ड केलीत. स्वप्नील बांदोडकर, वैशाली माडे, मयुर शिंदे, खुशबू जैन अशा नामवंत गायकांनी ती गायली आहेत. लवकरच तो चित्रपट प्रदर्शित होईल.
 प्रेयसी झाली गझल
अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभागातील गायक-संगीतकार प्रा. हर्षवर्धन मानकर यांनी स्वरबद्ध केलेला एक व्हिडिओ अल्बम येत्या दिवाळीपर्यंत रसिकांच्या भेटीला येईल. त्यात माझ्या तीन गझला आहेत. 'प्रेयसी झाली गझल' हे अल्बमचे शीर्षक माझ्याच गझलेतल्या ओळीवरून घेतले आहे.
 मेळघाटच्या कविता
कोरकु लोकगीतांसाठी मेळघाटमध्ये फिरताना आदिवासींचं खडतर जीवन जवळून बघत होतो. संवेदनेच्या पातळीवर कमालीची अस्वस्थता जाणवत होती. लोकधाटीच्या आक्षरछंदात व्यक्त होऊ पहात होती. त्यातून लिहून झालेल्या दहा कविता 'अनुष्टुभ' मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. इतर कविता 'मौज', 'महाराष्ट्र टाइम्स',  'कविता-रती ', 'साधना' इ. नियतकालिकातून आल्या होत्या. त्या कवितांचा संग्रह 'मेळघाटच्या कविता' या वर्षात प्रकाशित होईल.
अजून चालतोचि वाट
मराठी गझलेच्या प्रेमापोटी, नवोदितांना मार्गदर्शनासाठी संथ गतीने का होईना गझल विषयक लिखाण सुरूच आहे. गेल्या चाळीस वर्षाचा हा गझलप्रवास डोळसपणे न्याहाळताना मनात उचंबळून आलेल्या भावनांचा आणि ठळक घटनांचा हा ताळेबंद. मराठी गझलेने मला लौकिक मिळवून दिला. मीही गझलेचे देणे लागतो हा कृतज्ञता भाव मला सारखा अस्वस्थ करत असतो. सुरेश भटांनंतरच्या पहिल्या पिढीतील शिलेदार म्हणून लिहित्या हातांना, अभ्यासकांना, समीक्षकांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने काही प्रकल्प हाती घेतले आहेत. ज्यामध्ये –
१. गझलविषयक माझ्या लेखांचे संकलन आणि संपादन.
२. माझ्या गझलेवर मान्यवरांनी केलेल्या समीक्षापर लेखांचे संपादन.
३. गझलकार-सीमोलंघन मधील निवडक लेख आणि गझलांच्या खंडांचे संपादन.
४. नवोदितांना मराठी गझललेखन शास्त्र समजून सांगणारी अद्ययावत मार्गदर्शिका.
५. केवळ मराठी गझलेला वाहिलेले वाङ्मयीन नियतकालिक.
यांचा उल्लेख करता येऊ शकेल. रसिकांचे आणि अभ्यासकांचे वैचारिक पाठबळ पूर्वीप्रमाणेच अपेक्षित आहे. माझ्या गझल लेखनासोबतच, हे सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण करावेत अशी इच्छा आहे. म्हणजेच गझलेचा प्रवास अजून सुरू आहे.
अजून बरेच पडाव बाकी आहेत. हे सर्व लिहित असतांना एकाबाजूने अगदी सुरवातीपासून मला प्रोत्साहन देणारे नियतकालिकांचे संपादक अकोल्याचे स्व. गो.रा. वैराळे, नागपूरचे स्व. वामनराव तेलंग, धुळ्याचे स्व. पुरुषोत्तम पाटील, पुण्याचे स्व. आनंद अंतरकर, यांच्याविषयी  माझ्या काळजात अपार कृतज्ञता दाटून आली आहे. तर दुसऱ्याबाजूने माझ्या मनात अल्लामा इक़बाल यांचे शेर सारखे रुंजी घालत आहेत.
'सितारों से आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं
तू शाहीं है  परवाज़ है  काम तेरा
तिरे सामने  आसमाँ  और भी हैं'


(शब्दांकन: प्रा. डॉ. विनोद देवरकर, उमरगा. मो. ९४२१३५५०७३)

श्रीकृष्ण राऊत,
पंडित महाजन यांचे घर, बंजारा कॉलनी,
मु.पो.ता. पुसद  जि. यवतमाळ - ४४५२०४
भ्रमणध्वनी : ८२७५०८७३७०; ८६६८६८५२८८
ईमेल : dr.shrikrishnaraut@gmail.com

( 'नायक ' दिवाळी अंक २०२१ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा