□ □
कारुण्य माणसाला संतत्व दान देते
□ □
डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचा गझलसंग्रह
□
सतीश म. जामोदकर
□
प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत हे मराठी गझलेतील एक अग्रगण्य नाव. पातूर (नानासाहेब) हे अकोला जिल्ह्यातील त्यांचे गाव. मराठीतील ज्येष्ठ गझलकार सुरेश भटांनंतर स्वतंत्र बाजाची गझल लिहिणाऱ्या श्रीकृष्ण राऊत यांनी अभंग आणि मुक्तछंदात सुद्धा दर्जेदार कविता लिहिल्या आहेत. १९८९ साली त्यांचा 'गुलाल' हा सुप्रसिद्ध गझलसंग्रह प्रकाशित झाला, तर 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' हा काव्यसंग्रह २००१ मध्ये प्रकाशित झाला. 'गुलाल आणि इतर गझला' (२००३), 'चार ओळी तुझ्यासाठी' (२००३ ) तर 'तुको बादशहा' हा अभंगसंग्रह २०१५ साली प्रकाशित झाला आहे.
श्रीकृष्ण राऊत यांच्या कविता अमरावती व नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तसेच अकरावीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यांनी 'राघू मैना' या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. त्यांच्या गझला आशा भोसले, उत्तरा केळकर, उषा मंगेशकर, भीमराव पांचाळे, सुधाकर कदम, सुरेश वाडकर इत्यादी प्रसिद्ध गायकांनी गायिल्या आहेत. २०१९ ला त्यांचा 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हा जवळपास
८० गझलांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.कवीचा हा दुसरा गझलसंग्रह आहे. खऱ्या अर्थाने कारुण्य माणसाला संतत्व प्राप्त करून देते. येशू ख्रिस्त, महात्मा गौतम बुद्ध आणि तुकाराम ह्या
महात्म्यांना कारुण्यानेच महात्मेपण प्राप्त करून दिले आहे. तुकाराम तर कवीला वारंवार छळत आहे; त्याच्या अंतःपेशींना झिणझिण्या आणत आहे. त्या दृष्टीने कवीचा 'तुको बादशहा' हा लक्षणीय अभंगसंग्रह आहे.
'अभिप्राय जाणत्यांचा' ही 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते या गझलसंग्रहाची
पहिली गझल आहे. या गझलेत श्रीकृष्ण राऊतांनी मोठ्या म्हणणाऱ्या, 'मी मी ' करणाऱ्या बडेजावी साहित्यिकांची फिरकी घेतली आहे. त्यांनी लिहिणाऱ्यांना खोटे-खोटे प्रोत्साहन देणाऱ्यांचा खोटेपणा उघड केला आहे. मानवी स्वभावही मुळात असाच आहे. त्याला खुप मस्कऱ्याची, मतलबी चेहऱ्याच्या लोकांची मोठी हौस असते. मित्र, प्रेम, नाती, शेजारी यांच्यामध्ये कुठेतरी हा 'मतलबी' चेहरा लपलेला असतो. समाजातील ही बेरकी स्वभावाची माणसे कवीने अचूक हेरली आहेत. म्हणून ते म्हणतात -
'मैत्री असो की प्रीती, नाती असो घरोबा
पाहून मतलबाचा घे चेहरा कुठेही '
(पृ.७)
समाजाचे बिघडते वास्तव गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी अनुभवाने मांडले आहे. ते चिंतनशील गझलकार असल्यामुळे ते अधिकच गडदपणे मांडले गेले आहे. प्रत्येकालाच आपण फार मोठे झाल्यासारखे वाटते आहे. जसे बेडकाला बैल, दिव्याला सूर्य, थेंबाला सागर ही उदाहरणे कवीने शेरातून मांडली आहेत. आत्महत्या हा शेतकऱ्यासंबंधी बोलला जाणारा विषय; कुणी त्यास पाप संबोधते. कुणी त्याला रिकामे सल्ले देतात. आभाळ फाटल्यावर काय करावे हेही त्यास सल्लागार सांगत असतातच, पण हे निव्वळ सांगून होत नाही. 'जावे त्याच्या वंशा 'हेही महत्त्वाचे असते. कुणाच्या भावना फक्त व्याकरणाच्या शुद्ध-अशुद्धतेच्या चुका काढून मांडता येत नसतात. 'उंच सारखा' ह्या गझलेत ते एका शेरात म्हणतात -
'प्रेम भावना वाच शहाण्या
व्याकरणाच्या चुका काढतो '
(पृ.१०)
घरातील माणसांचा एकमेकांशी संवाद कमी होतोय आणि बाहेरच्यांशी वाढतो आहे. त्यामुळे घर तुटत चाललंय असंही कवीला वाटत आहे.
गझल कवीचा जीव की प्राण आहे. गझल जगणं आणि मरणंही आहे. गझल ओठावर आली ती प्रेयसी होऊन, इतकी ती त्याला प्रिय आहे. म्हणूनच कवीने गझल हा प्रकार स्वीकारला आहे. येथील दांभिक समाजाच्या वागण्यावर तो असूड ओढतो आहे. जसे
'नको वाचू कधी पोथी, नको जाऊ तीर्थाला
उपाशी लेकरांना तू तुझ्या दे घास थोडासा '
(पृ.१४)
किंवा-
'परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची
मला सांगू नको रामा, तुझा वनवास थोडासा '
(पृ.१४)
आज माणूस एकसारखा धावतो आहे. त्याला थांबण्याची, चिंतन करण्याची गरज वाटत नाही. खाण्यापुरते सर्वजण आहेत. म्हणून त्याला कवी 'भोजनभाऊ' म्हणतात. माणूस हा प्रत्येक गोष्ट नंतर करू म्हणून पुढे ढकलत असतो. बोलघेवडे-चिकणचोपडे लोक बोलत असतात. घोटाळे करीत असतात. जे घरात नाही ते बाहेर शोधत असतात. यशोधरेलाही गौतमाविषयी हीच शंका होती.
कवीच्या गझला मनुष्य स्वभावाभोवती घुमताहेत. त्याला आजूबाजूची परिस्थिती कशी आहे याची पूर्ण जाण आहे. माणसे जातीत, धर्मात वाटलेली आहेत. मानवा-मानवात भेद निर्माण करीत आहेत. त्याला आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे, श्वास घेता आला पाहिजे. आपण एकमेकांचे शत्रू नाही. दोषांचे रवंथ करण्यापेक्षा रस्त्यातले काटे बाजूला करणे आवश्यक आहे असे त्यांना वाटते. जितेपणी उपवासी ठेवणारी मुलेबाळे मायबापांना मेल्यावर घास भरवितात. या ढोंगीपणावर ते उपहासात्मक रीतीने तुटून पडतात
'जितेपणी उपवास किती
मेल्यावरती घास किती '
(पृ.२५)
माणसाची खरी कमाई कोणती तर जोडलेली माणसे. अखेरच्या निर्वाणीच्या वेळी चार खांदे व दोन उष्ण अश्रू एवढीच ती असते. माणसाच्या माणुसकीवर कवीची निष्ठा आहे.
'देव मेले तरी द्या मरू
माणसे वाचवा शेवटी'
(पृ. ३०)
येथील माणूस साधा आहे, भोळा आहे तसाच तो नाटकी सुद्धा आहे. वर्षातून दोन-चारदा रस्ते झाडून फोटो छापवून आणतो. म्हणून कवीला गाडगेबाबाचा तो खराटा नको आहे. तो उद्गारतो हे ढोंगधतुरे आपणास नको. कवी पारदर्शकतेचा भोक्ता आहे. त्याचे मन पारदर्शक आहे. जे आहे ते मांडण्याची प्रवृत्ती आहे. जगताना असा अनेक परस्परविरोधी गोष्टी त्यास दिसत आहेत.
'फाटक्या पदरास बांधे गाठ लक्ष्मी'
लेक झुरते एक साध्या फुलझडीला'
(पृ.४६)
येथे एकाची दिवाळी असते आणि एकाचं दिवाळं निघत असते. असे अनेक शेर या गझल संग्रहात दिसतात. या गझल संग्रहातील काही उल्लेखनीय शेर येथे पाहू या
'पुजाऱ्याच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा विठोबाला हवी तुमची अता काठी तुकारामा '
(पृ.४७)
'पेटले तुझ्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी
धगधगत्या संघर्षाने शब्दांना फुटली वाणी '
(पृ.४९)
'प्रत्येकाच्या पापणीतला अथांग सागर जेव्हा कळला थेंब एकही अश्रूचा मग मला ढाळणे जमले नाही '
(पृ.५३)
'घासतोस तू कपाळ रोड पत्थरावरी
पावला कुणास देव ठोकरून माणसे '
(पृ.५४)
'भेट तुझी घेताना माझेच काय मी सांगू ?
तुझ्या खुशालीमागे मी दुःख लपवले माझे '
(पृ.६१)
'करणार बहुजनांचे कल्याण अर्थक्रांती
राहून अर्धपोटी गुणगूण गात जा तू '
(पृ.६४)
'तू सूर्य उगवतीचा आकाश जिंकणारा
गातोस तू कशाला पोरा, उदास गाणी '
(पृ.६७)
'मिळेल समता भाड्याने अन्
इथे ठेवला न्याय विकाऊ '
(पृ.७५)
'सोन्यास काय चाटू, खाऊ कसे हिऱ्याला
श्रीमंत देव तुमचे लखलाभ ते तुम्हाला '
(पृ.८०)
'शस्त्र हाती दिले तुकोबाने शब्द तोलून वापरू आपण'
(पृ.८४)
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची गझल सामाजिक, राजकीय व प्रेमविषयक भाष्य करते. तथाकथितांचा बुरखा फाडते. श्रीकृष्ण राऊत बोलीभाषेचाही अचूक वापर करतात म्हणून ती आपली वाटते. त्याचे प्रभावीपण वाढते. जसे 'चिकणचोपडे ' वगैरे शब्द यातून दिसून येते.
आज गझल मोठ्या प्रमाणात लिहिली जात आहे. ती लिहिली जावी यात वाद नाही. त्यामुळे मराठी गझल निश्चितच समृद्ध होईल. गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या मार्गदर्शनात असे कितीतरी गझलकार तयार होत आहेत. विदर्भातील गझलेची परंपरा ते निष्ठेने पुढे नेत आहेत. सातत्य हा त्यातील एक महत्त्वाचा गुण आहे. तो त्यांच्यात आहे. अंकुर साहित्य संघाच्या कुंभारी येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गझलेचे ते अभ्यासक आहेत. तेव्हा त्याविषयी अधिक लिहिण्यापेक्षा त्या गझलाच वाचल्या पाहिजेत. आपल्या पत्नीच्या समर्पणाला कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेला हा गझलसंग्रह वसंत केशव पाटील यांच्या पाठराखणीने निर्दोष व गोळीबंद झाला आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी उत्कृष्टपणे रेखाटले आहे. छपाई व बांधणीही मजबूत आहे. नांदेडच्या सूर्यमुद्रा प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा गझल संग्रह सुबक झाला आहे.
□□
सतीश म. जामोदकर
मु.पो.हिवरा बु।।, ता.मानोरा, जि.वाशिम - ४४४४०३ भ्र.९४२३३७४६७८
□
'अक्षर वैदर्भी ' फेब्रु. २०२१
□□
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा