कविवर्य श्रीकृष्ण राऊत हे नाव संपूर्ण मराठी साहित्यविश्वाला आता नवीन नाही. गझलचे अभ्यासक आणि शास्त्रशुद्ध गझल लिहिणारे गझलकार म्हणून डॉ. श्रीकृष्ण राऊत हे संपूर्ण मराठी साहित्यविश्वाला परिचित आहेत .आपल्या शारीरिक दुखण्यावर मात करून गझल साठी संपूर्ण आयुष्य वेचणारे श्रीकृष्ण राऊत यांनी सुरेश भटानंतरची मराठी गझल फुलण्यासाठी ,बहरण्यासाठी आणि सजविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य दिले आहे . नुकताच कारुण्य माणसाला संतत्व दान देते ....हा गझल संग्रह प्रकाशित झाला आहे..या गझल संग्रहात जवळपास 80 नव्या दमाच्या, संवेदनशील मनाला विचार प्रवृत्त करणाऱ्या गजलांचा समावेश आहे. गझल अभ्यासक-समिक्षक वसंत केशव पाटील श्रीकृष्ण राऊत सरांबद्दल लिहितात की, सुरेश भटांनंतरच्या पिढीतील गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत सरांचे स्थान उल्लेखनीय आहे.
गझल हा काव्यप्रकार अभिव्यक्तीचा व शिल्प रचनेचा एक शिस्तबद्ध प्रवास आहे .त्यामुळे आपल्या कवित्वाचा कस सिद्ध केलेल्या कोणाही कवीला तो हाताळणे तसे सहज सोपे नसते, ही गोष्ट अनेकदा प्रमाणित झाली आहे .म्हणूनच शुद्ध कविता आणि शुद्ध गझल अशा दोन्ही प्रांतांमध्ये श्रीकृष्ण राऊत आपल्या प्रतिभेचा प्रसन्न असा प्रत्यय देतात ,ही बाब विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखे आहे .
आजपर्यंत गझल म्हणजे प्रेम ,मोहब्बत आणि शराब- शबाब यांच्याभोवतीच रुंजी घालत होती .परंतु मराठी गझलने अनेक विषयांना स्पर्श केला आहे. मराठी गझलमध्ये सुरेश भटांचे जे योगदान आहे ते मैलाच्या दगडासम आहे. सुरेश भटांनी मराठी गझल फुलवली, बहरली आणि अनेकांना गझल लिहिण्यास प्रोत्साहित केले. सुरेश भटांनी यांच्यावर मनापासून प्रेम केले अशा गझलकारांपैकी प्रा. डॉ.श्रीकृष्ण राऊत सर हे एक वैदर्भीय गझलकार आहेत .आज त्यांना मराठी गझलचे विद्यापीठ म्हटलं तर वावगं ठरणार नाही एवढा गझलचा तंत्रशुद्ध अभ्यास श्रीकृष्ण राऊत सरांनी केला आहे. यापूर्वी एकविसाव्या शतकात जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुलास... हा कवितासंग्रह, गुलाल हा गझल संग्रह सरांचा प्रकाशित झाला आहे. सर्वसामान्यांची दुःख ,त्यांच्या भावना तसेच सामाजिक जाणीव व्यक्त करणारी गझल राऊत सर लिहीत असतात. कोणत्याही गटातटात न राहता, साहित्यिक कम्पूमध्ये न वावरता एका निष्ठेने ते कविता व गझल लेखन करीत आले आहे. चार ओळी तुझ्यासाठी.. हा ब्रेल लिपीतील कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे.त्यांच्या कारण या माणसाला संतत्व दान देते... या गझल संग्रहातील काही गझल खरोखरच वाचकांना मोहित करतात,विचारांना प्रवृत्त करतात ...
एका गझलमध्ये ते म्हणतात...
नको वाचू कधी पोथी,
नको जाऊस तीर्थाला
उपाशी लेकरांना तू
तुझा दे घात थोडासा
आज मानवी संवेदनाच सर्वत्र बोथट झालेल्या दिसत आहेत.रक्ताचे नातेवाईक सुद्धा एकमेकाच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत असताना कोणी कोणावर विश्वास ठेवावा असे विश्वास पात्र व्यक्तिमत्व दिसत नाही .अशा वेळेस आपण कोणाला पुजावे हा प्रश्न पडतो .कवी म्हणतात-
संसदेचे कान करते ठार चर्चा
वांझ ठरते शेवटी गर्भार चर्चा
एक साधी नोकरी नाही मिळाली शिक्षणाला झोंबली बेकार चर्चा
जीव गेला घेत फाशी जो अभागी
त्या चितेला लावते अंगार चर्चा
अशा पद्धतीने आजच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक दुरावस्थेला कशी कीड लागलेली आहे याचे चित्रण अतिशय समर्पक शब्दात कवी गझलच्या माध्यमातून करतांना दिसतात...
समाजात विश्वास पात्रता कमी होत चाललेली असले तरी आपण इतरांवर विश्वास व्यक्त केला पाहिजे ...माना दुनियाॅ बुरी है, सब जगह धोखा है ,लेकिन हम तो अच्छे बने ,हमे किस ने रोका है.... या तत्वावर विश्वास व्यक्त करून कवी म्हणतो...
मृत्यू समोर दिसता विसरून वैर जावे बसण्या जवळ घडीभर मित्रास बोलवावे
बोलून सांगण्याचा नसतात सर्व गोष्टी राहून मुक तेव्हा हातात हात घ्यावे
कारुण्य माणसाला संतत्व दान देते आपापल्यापरीने हृदयात वाढवावे
शब्दास पाजले मी जे रक्त रोज माझे
तू वाचशील तेव्हा डोळ्यातूनी गळावे
या गझलसंग्रहाच्या शेवटी काही सुटे शेर सुद्धा दिलेले आहेत .यातील काही शेर खरोखरच काळजावर कोरण्यासारखे आहेत.
पाण्यात मारतो का काठी हजारवेळा दिसणार ना कधीही सागर दुभंगलेला
एक आंधळा दुसरा फुटका
दावा करती भविष्य पाहू..
छातीस लाव माती,शब्दात बांध हत्ती डरपोक माणसाला गजलेत स्थान नाही
घास घासातला रोज ज्यांना दिला
तीच तोंडे मला चावली शेवटी
उंची हिमालयाची आधीॅ कमी करा रे
जाणीव फार छळते आम्हा खुजेपणाची
अशा प्रकारे आजच्या सगळ्या समाजव्यवस्थेची चिरफाड करणारा हा संग्रह आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या गझल ह्या मानवी मनाला प्रफुल्लित करतात, संवेदनशील मनाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात तर रसिक म्हणाला मोहित करतात .अशा हा देखणा गझल संग्रह नांदेडच्या सूर्यमुद्रा प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे .सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे मुखपृष्ठ असून नयन बाराहाते यांचे अक्षरलेखन या संग्रहाला लाभले आहे .
आज समाजामध्ये जी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विसंगती आहे , सोबत सवॅत्र विषमता, अन्याय ,अत्याचार नि वैर -विरोध या सर्व बाबींना आपल्या गझलच्या माध्यमातून धारदार शैलीमध्ये मांडण्याचे काम श्रीकृष्ण राऊत सरांनी केले आहे. हा गझलसंग्रह प्रत्येक जाणकार रसिकांनी जरूर मिळवून वाचला पाहिजे. यातील अनेक गझला आपल्या हळव्या मनाला साद घातल्याशिवाय राहणार नाहीत, कारण मानवी संवेदनांना कवेत घेऊ पाहणारा हा गझलसंग्रह आहे...
- नरेंद्र लांजेवार,
ग्रंथपाल भारत विद्यालय बुलडाणा
मो.न.९४२२१८०४५१
पुस्तकाचे नाव :- कारूण्य माणसाला
संतत्व दान देते
कवी :- श्रीकृष्ण राऊत (८६६८६८५२८८)
प्रकाशक:-सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड
पुष्ठे ८८ किंमत १०० रू.
(११ऑगस्ट, २o१९ / दै.लोकमत/ अकोला -बुलडाणा )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा