'गुलाल आणि इतर गझला’ मधील सामाजिक जाणीव : प्रा. अशोक रा. इंगळे


आजच्या घडीला कवी सुरेश भटानंतर मराठी गझलप्रांतात श्रीकृष्ण राऊत हे नाव एक सिद्धहस्त गझलकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे.'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाया तान्ह्या मुला' (२००१) या मुक्तछंदातील बहुचर्चित काव्यसंग्रहापूर्वी त्यांचा 'गुलाल आणि इतर गझला' (१९८९) हा गझलसंग्रह आणि 'चार ओळी तुझ्यासाठी' (२००३) हा प्रतिष्ठित मुक्तक संग्रह त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. 'गुलाल आणि इतर गझला' या पहिल्या गझलसंग्रहातील गझलरचना काव्य आणि तंत्रशुद्धता हया दोन्ही दृष्टीने अव्वल दर्जाची आहे. या संग्रहाची कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, ना.घ.देशपांडे, मंगेश पाडगांवकर यासारख्या मान्यवरांनी याआधीच दखल घेतली आहे. प्रस्तुत लेखात श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलामधून व्यक्त झालेल्या सामाजिक जाणीवांचा प्रामुख्याने विचार केला आहे.

श्रीकृष्ण राऊत यांना बांधण जनप्रतिष्ठान नवी मुंबई तर्फे गझलेसाठी दिल्या जाणारा 'जीवनगौरव' हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून, येत्या नऊ जानेवारी २०११ रोजी अमरावती येथे आयोजित 'गझलोत्सव' या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. खरं तर कवी सुरेश भटानंतर श्रीकृष्णराऊत यांच्या उत्तुंग गझल प्रतिभेमुळे'गझल' या काव्य प्रकाराला हा जो बहुमान मिळवून दिला आहे,त्याचा मनस्वी आनंद, तमाम गझलप्रेमी व साहित्यरसिकांना झाला आहे. मराठी गझलरचनेकडे आजपर्यंत काव्य समीक्षक,तथा अभ्यासक काहीशा 'उपया' दृष्टीने पाहत होते, असे असले तरी 'गझल' या काव्यप्रकाराला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी जी काही नावे घ्यावी लागतील त्यात श्रीकृष्णराऊत यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. म्हणून आजच्या घडीला तरूणवर्गात गझलेविषयी जबरदस्त आकर्षण व क्रेझ निर्माण होऊन युवा वर्ग मोठ्या प्रमाणात 'गझल' ह्या काहीशा तंत्रदृष्ट्या अवघड काव्यप्रकाराकडे वळलेला दिसतो हे मोठे आशादायक चित्र आहे. खरं तर गझल हा एक तंत्रप्रधान काव्यप्रकार असल्यामुळे गझलेची तंत्रशुद्धता जपतांना त्यातील काव्य आणि सौंदर्य कोणत्याही परिस्थितीत लोप पावणार नाही ह्याची दक्षता घेणे गरजेचे असते. वर्तमान स्थितीत गझलेतील काव्य आणि सौंदर्य पुरेपूर जपून तंत्रशुद्ध गझल लिहिणारा मराठी साहित्यातील जो मातब्बर कविवर्ग आहे, त्यात श्रीकृष्ण राऊत यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो.

 ‘नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या
 मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या ’ (पृ.५२)

अशी आश्वासक मनोभूमिका व्यक्त करणारी ही कविता प्रखर सामाजिक जाणिवेचा आशय व्यक्त करते. खरं तर गझल म्हणजे 'प्रेमकविता' असेच समीकरण दृढ असले तरी प्रेमाशिवाय देशप्रेम, मानवतावाद, सामाजिक विषमता, दुष्टरूढी, जातीयता इ. विषयामधून समष्टीचा जीवनाशय निश्चितच साकारू शकतो. अशा आशयाची चौफेर समृद्धता सुरेश भट यांच्या गझलेमधून सर्वाथाने व्यक्त झाली आहे. सुरेश भटांच्या गझलेप्रमाणे श्रीकृष्ण राऊतांच्या गझलेतही असा सामाजिक जाणिवेचा सर्वस्पर्शी जीवनाशय समर्थपणे व्यक्त झालेला आहे. इथे सुरेश भट यांच्यासोबत तुलना करण्याचा हेतू नसून श्रीकृष्ण राऊतांच्याही कवितेत सामाजिकता प्रकर्षाने कशी व्यक्त होते. हे सांगण्यासाठी सुरेश भटांच्या गझलेचा सातत्याने उल्लेख केला आहे, हे जाणकारांनी लक्षात घ्यावे. बबन सराडकर, धम्मपाल रत्नाकर,गौरवकुमार आठवले, सिद्धार्थ भगत, किशोर बळी इत्यादींच्या गझलाही हाच जीवनाशय व्यक्त करतांना सशक्तपणे सामाजिक जाणीवा व्यक्त करतात. 'नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या' या ओळीमधून कवीचा सामाजिक गतकाळ कसा अंधारमय होता हे लक्षात येते. पंरतु 'मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या' हा अदम्य आशावादच जीवन जगण्याची इर्षा प्रबळ करतो व आपल्याला कवीच्या सामाजिक जीवनप्रवासाकडे घेऊन जातो, हे तितकेच खरे आहे. कविता ही संवाद साधण्यासाठी असते मग हा संवाद कधी प्रेमविषयक असतो तर कधी सामाजिक स्वरूपाचा असतो. जुन्या विचाराला तिलांजली दिली तरच नव्या विचाराला वाव मिळणार आहे, म्हणूनच कवी म्हणतो -

‘ पंचाग सांगते की होईल खूप वर्षा
 नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले’

‘वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे 
तेव्हा कुठे इथेही उगवेल पेरलेले.’(पृ.२१)

श्रीकृष्ण राऊत यांची गझलरचना ही तंत्राच्या अंगाने कुठेही उणी पडत नाही. उलट ती सरसच ठरते. अभिव्यक्तीच्या संदर्भात ही रचना मोलाची आहेच परंतु आशयाच्या संदर्भातही ह्या गझलेतील कवीची निरीक्षणे सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. अर्थात हा आशय सामाजिक जाणिवेचा आहे, विशेष म्हणजे नवी दृष्टी प्रदान करणारा आहे. एकूणच भारताच्या सामाजिक इतिहासात आपण डोकावून पाहिले तर पंचांग अर्थात भविष्यावर विसंबून राहणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. जिथे हवामान खाते अचूक अंदाज व्यक्त करू शकत नाही तिथे पंचांग काय करणार ? परंतु तरीही पंचांगावर विसंबून राहिल्यामुळे मानवाचा पुरूषार्थच र्‍हास पावत चाललेला आहे. त्यामुळे समाजातील नवजात अशा नवनव्या पिढीचे संपूर्ण जीवनच वाळून गेलेले दिसते. इथे भविष्यकथनीला प्रखर विरोध दर्शवीत ‘वाफ्यातले जुने बियाणे’ अर्थात समाजातील जुने विचार बदलण्याची नितांत गरज व्यक्त केली आहेच; याशिवाय उद्याच्या सुंदर पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी जीर्ण विचाराला तिलांजली देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले आहे. कारण'तेव्हा कुठे इथेही पेरलेले उगवू शकते, नवी पिढी स्वैरपणे बहरू शकते. इथे कवीने उपदेशापेक्षा सूचीत करण्यावर अधिक भर दिलेला दिसतो. भारतीय मानसिकता संपूर्णपणे बदलून टाकायची असेल तर कुठेतरी ह्या व्यवस्थेला धक्का दिलाच पाहिजे, असा परिवर्तनवादी विचार व्यक्त करतांना सुद्धा काव्यात्मकता कुठेही लोप पावलेली नाही, हे वैशिष्ट्य आपण इथे लक्षात घेतले पाहिजे. आज फुले-आंबेडकरांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीमुळे कालचा मुका असलेला माणूस आज बोलू लागला. तो इथल्या व्यवस्थेची चिकित्सा करू लागला; तेव्हा ह्या व्यवस्थेची ‘पोल’ त्याच्या लक्षात येऊ लागली. म्हणून तो हिम्मत एकवटून म्हणू लागला. -

‘ तोंडास काय टाळे लावून बैसला तू ;
 सोसू नको मुक्याने तू आज बोल काही.

जे मान्य पावले ते संपूर्ण सत्य नाही; 
बाहेर येत आहे त्यातील पोल काही.’ (पृ.२४)




आजपर्यंत मराठी साहित्य विश्वात काही महत्वपूर्ण गोष्टींची योग्य तिथे नोंद घेतल्या गेली नाही. अर्थात प्रस्थापित असलेल्या साहित्यकांचाच दबदबा मराठी साहित्य सृष्टीत दिसून येतो. त्यांचेच लेखन मान्यता पाऊन रसिकमान्य झाल्याचे आढळून येते. आणि ज्यांनी खया अर्थाने इतिहास घडविलासामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली त्यांची मात्र दखल न घेता त्यांना उपेक्षित ठेवल्या गेले आहे. अशा मराठी साहित्य विश्वातील अनेक सुटलेल्या दुव्यांचा संदर्भ आपल्याला सांगता येईल. आजपर्यंत आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून मराठी वाड्‌.मयाच्या इतिहासात केशवसुतांना संबोधल्या गेलेपरंतु केशवसुतांच्या पूर्वी १८६९ मध्ये ज्योतीराव फुले यांनी अखंडादी काव्यरचना केलेली आढळते. प्रा. अशोक चोपडे लिहितात - '' ज्योतीराव आधुनिक मराठी साहित्याचे जनक तर ठरतातच पण आदिवासी,ग्रामीणदलितजन साहित्याचेही ते आद्यजनक ठरतात. कारण केशवसुतापूर्वी फुल्यांनी दोन अडीच दशके काव्यलेखनाला सुरूवात करून आशयशैलीभाषाप्रतिमा इत्यादी क्षेत्रात समग्र परिवर्तन घडवून आणले. 'बाहेर येत आहे त्यातील पोल काही ह्या ओळीतून हे सत्य अतिशय समर्पक व काव्यात्मकतेने व्यक्त झाले आहे. याचा अर्थ मान्य पावलेला कुठलाही इतिहास हा संपूर्ण सत्य असू शकत नाही हे वास्तव कवीने उजागर केले आहे. 
कवीची इथल्या माणसांवर अतुट अशी श्रद्धा आहे म्हणून माणसांचे गीत गातांना मानवी मूल्ये जपण्यासाठी तो म्हणतो -
 

  मी पुजारी माणसांचा दुःखितांचा भक्त मी 
आंधळयांना वाट दावी तीच माझी अर्चना.' (पृ.३९)
 

खरं तर सामान्य माणूस आणि त्याचे जगणे हा श्रीकृष्ण राऊत यांच्या चिंतनाचा व आस्थेचा विषय आहे. म्हणून आंधळयांना वाट दाखविण्यासाठी मी अर्चना करतो असे ते म्हणतात. कारण दुःखीकष्टी जनांना पाहून कवी तळमळतो,तुकोबाप्रमाणे कळवळतो. कारण दुःखितांचा खया अर्थाने कवी भक्त आहे. म्हणून आंधळयांना अर्थात अज्ञानी जनांना दुःखातून मुक्ती मिळूवन देणे हे कवीच्या कवितेचे प्रयोजन आहे. कवी मानवतेचा पुजारी असल्यामुळे त्याला जिथेजिथे दुःखाला तोंड द्यावे लागतेतिथेतिथे कवी अशा दुःखी अंतःकरणातून पोखरलेल्या माणसांचा कैवार घेतांना दिसतो. खरं तर इथल्या दलितशोषितबहुजन समाजाच्या माणसाच्या वाट्याला आलेलं हे दुःख सामाजिक आहे. याचा अर्थ इथल्या दुःखाची मुळे समाजव्यवस्थेत आणि ही व्यवस्था भक्कम करणाया मूलतत्ववादात आहेतहे आपण जाणून घेतले पाहिजे. कवी ह्या समाजव्यवस्थेला मुळातून समजून घेतो म्हणून तो माणसाचे दुःख चितारू शकतो. त्याला कुठल्याही 'माणसाची पूजा'अर्थात सेवा करण्यातच ईश्वराची सेवा केल्यासमान वाटते हा जो संत गाडगेबाबांचा विचारसंदेश आहेतो विचार प्रस्तुत कवितेमधून नेमकेपणाने अधोरखित झाला आहे. अंधश्रद्धेवर भाष्य करतांना कवी म्हणतो -
 

 पिंडदानादी विधींनी घाण केली
  छान होता हया नदीचा घाट राजा
 

घे दखल जनसागराच्या मंथनाची
 येत आहे धर्मवेडी लाट राजा.' (पृ.६६)
 

ना.घ. देशपांडे यांना या गझलसंग्रहात अनेक ठिकाणी विरोधी विधाने परस्परांना जोडलेली दिसतात. उदा. 'सेंटेड माणसाची भलतीच घाण वस्तीह्यासारख्या काव्यपंक्ती आपले लक्ष वेधून घेतात. त्याप्रमाणे वरील काव्यपंक्तीही परस्पर विरोधी अशा स्वरूपाच्याच आहेत. नदी आणि नदीचा घाट अत्यंत सुंदर होता पण पिंडदानादी कर्मविधींनी नदीचा घाटच घाण करून टाकलेला आहे. अंधश्रद्धा कुठलीही असो ती वाईटच. तरीही धर्माने वेड्या झालेल्या माणसांची लाट जनसामान्य माणसांच्या मंथनाची दखल न घेता धर्मांधता वाढवितच आहे. अशी धर्मांधतेतून आलेली अंधश्रद्धा समाज विघातकच असते. कारण धर्मांधता ही व्यक्ती वा समाजाचा विकास करू शकत नाही. म्हणून ह्या धर्मवेड्या लाटेपासून आपण सामान्य माणसांना वाचविले पाहिजे. समाजमनात रूजलेल्या खोट्या,अंध समजुतीवर कवीने आपल्या लेखणीद्वारे हल्ला केला आहे. 

  स्वर्ग छान कल्पनामोक्ष फालतूपणा; 
चालला कुठे असा शोधण्या दिगंत तू.' (पृ.६९)
 

इथे 'स्वर्ग,मोक्षह्या कल्पनेची वैय्यर्थता पटवून दिली आहे. स्वर्ग-नरक हे वास्तवात नसून मानवाने निर्माण केलेले ते कल्पनाचित्र आहे. आर्यांनी मनाने स्वर्गाची कल्पना करून त्याविषयी तर्काच्या बळावर धर्मग्रंथात कल्पनाचित्रे नमूद केली. प्रत्यक्षात स्वर्ग नाही. तो कोणी पाहिला नाही. तो कुठे आहे तेही कुणाला माहीत नाही. कोणी पाहिला असेल तर त्याने स्वर्ग दाखवून द्यावा. स्वर्गाविषयीची माहिती इतरांना देऊन त्यांचा भ्रम दूर करावा पण असे घडत नाही. म्हणून कवीला स्वर्ग,मोक्ष ह्या कल्पना फालतू वाटतात. त्यामुळे दिगंतात अर्थात सर्वत्र पसरलेल्या ह्या पृथ्वीच्या सीमेपर्यंत तो आपल्याला कुठेही सापडणार नाही. म्हणून अशा भ्रामक कल्पनेच्या पाठीमागे लागण्यात अर्थ नाही. संत तुकोबांनीसुद्धा अशा भोंदू व भ्रामक प्रव्‌त्तीवर आपल्या अभंगातून प्रखर प्रहार केले आहेत. परंतु अशा संतांच्या विचारांचे व कार्याचेही विकृतीकरण इथल्या अभिजन वर्गाने केलेले दिसते.
 

 अहोज्ञानेश्वराटाका जुन्या ओव्या दुरूस्तीला;
 
फुकाचा मारूनी रंधा इथे देतात मंबाजी. 

तुकारामाअरे हयांना जरा तू हाण पैजारा;
 
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी.’ (पृ.७४)
 

हजारो वर्षापासून इथल्या मंबाजी अर्थात पुरोहित प्रवृत्तीने संपूर्ण बहुजन समाजाला छळलेले आहे. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर वा तुकारामासारखे संत सुटलेले दिसत नाहीत. म्हणूनच ह्या ‘मंबाजी’प्रवृत्तीला पैजारा हाणून ताळ्यावर आणले पाहिजे,असे कवीला वाटते. कारण ह्या मंबाजींनीच ज्ञानेश्वरासारख्या संताचा छळ केला. संन्यास्याची मुले म्हणून त्यांना वाळीत टाकलेतुकोबासारख्या विद्रोही संताला वैकुंठात पाठविले. एवढे होऊनही वेदसंस्थेला प्रमाण मानून त्यांचेच गोडवे गाणाया ओव्या दुरूस्तीला टाकण्याची गरज वाटते. अशा ढोंगी व मतलबी लोकांना आपण ओळखूही शकत नाही. कारण असे मंबाजी तुकोबाचा मुखवटा परिधान करून तुकोबाच्याच वेषात सतत वावरताना दिसतात. अशा लोकांपासून समाजाला सदैव धोका असतो. त्यांच्यापासून सावध झाले पाहिजे असेच कवीला सूचवायचे आहे. उपहास व उपरोध ही शस्त्रे वापरून कवीने इथे मंबाजी प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेतला आहे. 
वर्तमान युगाचा आणि सभोवतालच्या बदलत्या वास्तवाचा विचार करून आपल्याला जगावं लागणार आहे. जोपर्यंत आपण बदलत्या काळाचे आकलन करून घेऊन तो संदर्भ लक्षात घेणार नाहीतोपर्यंत तरी शोषितांच्या दुःखमुक्तीचा सामाजिक लढा आपल्याला लढता येणार नाही. तो लढा लढता यावा यासाठी प्रवाहाची धार वळवून देण्याची निकड निर्माण झाली आहे.श्रीकृष्णराऊत यांनी हे समकालीन वास्तव डोळसपणे लक्षात घेऊन आंधळयांचा अंधार चित्रित केला आहे. खालील गझलच्या ओळीतून हे वास्तव अतिशय परिणामकारक रीतीने मांडले आहे.
 

 दरसाल पूर येतो वाहून गाव जाते; 
द्याना अशा नदीची वळवून धार आधी.
 

डोळ्यात डोळसांच्या लावू नकोस ज्योती
 
अंधार आंधळयांचा थोडा चितार आधी.’ (पृ.३१)
 

अशी लक्षणीय गझल श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिली आहे. त्यांच्या 'गुलाल आणि इतर गझलाह्या गझलसंग्रहात सामाजिक आशयाच्या गझला प्रेमकवितेच्या तुलनेत अल्प असल्या तरी त्या अतिशय सुंदर व रसिकवाचकांच्या काळजाला हात घालणाया आहेत.श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांचा सुंगध आता अकोला जिल्ह्याच्या सीमा ओलांडून मुंबईत दरवळला आहे.श्रीकृष्ण राऊत यांना बांधण जनप्रतिष्ठान नवी मुंबई तर्फे जाहीर झालेल्या 'जीवनगौरव'पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व गझल रसिकांकडून अभिनंदन व पुढच्या लेखनकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो.

__________________________________________
संदर्भ - 
१)गुलाल आणि इतर गझला (गझलसंग्रह)
श्रीकृष्णराऊतजठारपेठअकोला द्वितीय आवृत्ती२००३ 
२) महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा - संपादकहरी नरके,

महाराष्ट्र शासन मंत्रालयमुंबईपाचवी आवृत्ती२००६ पृ. २३९ 
_________________________________________
प्रा. अशोक रा. इंगळे 
(मराठी विभाग प्रमुख)

डॉ.एच.एन.सिन्हा महाविद्यालय,पातूर,जि.अकोला. 
( जनमाध्यम / दि. ९ जाने. २०११ )
You might also like:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा